नेपाळ अजूनही धुमसतेय… अंतरिम पंतप्रधानपदी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की
हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नेपाळमध्ये तरुणांनी उठाव केल्यानंतर देशात अराजक पसरले असून हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. या ‘जेन झी’ क्रांतीने पंतप्रधान के. पी. ओली यांना राजीनामा देऊन पलायन करावे लागले, तर उपपंतप्रधानांपासून अनेक मंत्र्यांना आंदोलकांनी सळो की पळो करून सोडले. त्यानंतर मंगळवार रात्रीपासून देश लष्कराच्या ताब्यात असला तरी हिंसाचार सुरूच आहे. दरम्यान, तख्तपालटानंतर अंतरिम सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असून अंतरिम पंतप्रधान पदासाठी देशाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नावावर आज एकमत झाले.
जेन झी आंदोलकांची आज व्हर्च्युअल बैठक झाली. या बैठकीत अंतरिम सरकारच्या प्रमुख म्हणून सुशीला कार्की यांनी जबाबदारी सांभाळावी, अशी विनंती करण्यात आली. त्यासाठी त्यांनी होकारही दिला आहे.
कोण आहेत सुशीला कार्की…
सुशीला कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून मास्टर्स केले. नेपाळच्या त्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होत्या. जुलै 2016 ते जून 2017 या दरम्यान त्या या पदावर राहिल्या. न्यायपालिका लोकशाहीची राखणदार आहे, अशी त्यांची नेहमीच ठाम भूमिका राहिली. संसदेच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप ठेवून त्यांच्याविरुद्ध 2017 मध्ये महाभियोग आणण्यात आला होता.
हिंसाचारात 30 ठार
नेपाळ लष्कराच्या ताब्यात गेल्यानंतरही हिंसक घटना सुरूच असून हिंसाचारात आतापर्यंत 30 ठार झाले असून 1 हजार जण जखमी झाले आहेत. सर्वात आलीशान हॉटेल हिल्टन आंदोलकांनी पेटवून दिले. आगीत पूर्ण हॉटेल जळून खाक झाले आहे.
जेलमधून 13 हजार कैदी पळाले
अराजकादरम्यान नेपाळच्या विविध कारागृहांमधून तब्बल 13 हजारांहून अधिक कैदी पळून गेले आहेत. अनेक कारागृहांना आग लावण्यात आली असून काही ठिकाणी पोलिसांवरही हल्ले करण्यात आले आहेत. पश्चिम नेपाळमध्ये गोळीबारात पाच कैदी ठार झाले आहेत. फरार कैदी हिंदुस्थानात घुसण्याची शक्यता लक्षात घेऊन सीमेवरील राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List