वेबसीरिज – सत्य-असत्याचा माग

वेबसीरिज – सत्य-असत्याचा माग

>> तरंग वैद्य

साधू, महात्म्यांच्या आपल्या देशात अनेक असे पाखंडी बाबा आहेत, काहींचे सत्य उघडकीला आले आहे, तर काही अजून आपली जागा टिकवून आहेत. त्यामुळे एका ढोंगी बाबाच्या आयुष्यावर बेतलेली ‘एक बदनाम आश्रम’ मालिका लोकांना खूप जवळची वाटली, आवडली आणि ‘आश्रम’ नावाने गाजली.

एखादा माणूस बाबा बनून स्वतच्या पाखंडाने किती मोठा होऊ शकतो, लोक कसे त्याला देव मानू लागतात, याचा विस्तारपूर्वक देखावा ‘एक बदनाम आश्रम’ या 2020 साली आलेल्या वेब सीरिजने उत्तम पद्धतीने सादर केला. हा बाबा इतका शक्तिशाली होतो की, राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे तो ठरवतो. साधू-महात्म्यांच्या आपल्या देशात अनेक असे पाखंडी बाबा आहेत. काहींचे सत्य उघडकीला आले आहे, तर काही अजून आपली जागा टिकवून आहेत. त्यामुळे एका ढोंगी बाबाच्या आयुष्यावर बेतलेली ‘एक बदनाम आश्रम’ मालिका लोकांना खूप जवळची वाटली. प्रेक्षकांना आवडलेली ही मालिका ‘आश्रम’ नावाने गाजली. या मालिकेमुळे हिंदी चित्रपटातील आघाडीचा अभिनेता बॉबी देओल घराघरांत पोहोचला आणि ‘बाबा निराला’च्या नावाने ओळखला जाऊ लागला. भोपास्वामी आणि इतर पात्रेही नावारूपास आली. पुढे 2020च्या शेवटी आणि 2022 मध्ये ‘आश्रम सीझन 2 आणि 3’ आले आणि तेवढेच लोकप्रिय झाले.

पहिल्या तीन सीझनच्या एकूण एकोणीस भागांमधून बाबा निराला कसा मोठा झाला, राजकारणी मतांसाठी आणि सत्तेत येण्यासाठी कसे त्याच्या पायाशी लोळत होते हे दाखवले. कारण समाजात त्याचा तेवढा प्रभाव होता. त्याची एक स्वतची सत्ता होती, जिथे त्याचे नियम होते, त्याचा कायदा होता आणि नियमभंग केल्यास त्याचे शासनही होते. तो स्वतला देव म्हणवून घेत होता आणि लोक तसे मानतही होते, पण शेवटी तो मनुष्यच होता. गरजा असलेला माणूस. गरजांवर, मनावर ताबा जो मिळवतो तो खरा महात्मा, पण निराला तर फक्त असे दाखवून त्याच्या भक्तांना फसवत होता. तो पाखंडी होता आणि आपली गरज पूर्ण करण्यासाठी आश्रमातील मुलींचा वापर करत होता. बदनामीच्या भीतीने मुली गप्प राहत होत्या, सहन करीत होत्या, पण पापाला कधीतरी वाचा फुटते तशी पम्मीच्या रूपाने बाबाचे सत्य समोर आलं, पण आपल्या प्रभावाचा वापर करून हा बाबा मुक्त झाला आणि मग उन्मुक्त वावरू लागला.

बाबाचे संस्थान, शिष्यवर्ग आणि आवाका एवढा भव्य दाखवला आहे की, तो काय काय करू शकतो, कुठल्या थराला जाऊ शकतो, त्याचे पाखंड उघडं पडतं का? याची उत्सुकता लोकांमध्ये कायम राहिली आणि प्रेक्षक आतुरतेने पुढच्या सीझनची वाट पाहू लागले.

26 फेब्रुवारी 2025 ला मॅक्सप्लेअर-अॅमेझॉन प्राईमवर ‘आश्रम सीझन 3, भाग 2’ या नावाने आलेल्या पाच भागांत बाबा निरालाने वसवलेल्या स्वर्गलोकाची कथा पुढे सुरू होते आणि मुख्यत्वाने बाबाची अधोगती आणि पुढे कारावास असा प्रवास दाखवला आहे. शिवाय बाबा मनसुख, जे अत्यंत निर्मळ मनाचे बाबा होते, त्यांचा भक्त बनून माँटीने कसा त्यांचा विश्वास जिंकला आणि विश्वासघात करून त्यांचा आश्रम काबीज केला आणि माँटीचा बाबा निराला झाला हा ‘फ्लॅशबॅक’ही दाखवला आहे.

बाबा निरालाने जशी आपल्या भक्तजनांवर भुरळ घातली होती तशीच भुरळ पहिले तीन सीझन बघताना प्रेक्षकांवरही होती, पण हे आलेले पाच एपिसोड काही प्रमाणात कमी पडलेत. कारण यात नावीन्य असे काहीच नाही. निरालाचा महाल, त्याची भव्यता, बाबाचा प्रभाव याआधी प्रेक्षकांनी पाहिला आहे. इथे एकच शिकायला मिळतं – अहंकार आणि अति आत्मविश्वास घातक ठरतो आणि जेव्हा काळ वाईट असतो तेव्हा तुमचा प्रभावही कामी येत नाही. राजनेतादेखील बाजू बदलून दूर होतात आणि सत्य उशिरा का होईना, पण समोर येतंच. अभिनयाबद्दल बोलायचे तर बॉबी देओल आपला प्रभाव कायम ठेवून आहे. हे त्याचे पुढचे पाऊल. अदिती पोहनकर यात पुढे वाटचाल करते एवढीच तिची भूमिका. भोपास्वामी नावाने काम करत असलेला प्रसिद्ध अभिनेता चंदन रॉय सन्यालला वेगळं काही करण्यासारखे आहे आणि त्याने ते उत्तम निभावले आहे.

अंतिम भागात बाबा निरालाला न्यायपालिका दोषी ठरवून शिक्षा ठोठावते. त्यामुळे ‘एक बदनाम आश्रम’ या मालिकेला आता कुलूप लागेल असं वाटलं होतं, पण भोपाला पुढचा बाबा अशी दृश्ये दाखवून पुढचा सीझन येणार याचे सूतोवाच केले आहे. हरकत नाही, काही वेगळेपण, नावीन्य आणि मनोरंजन असेल तर प्रेक्षक नक्कीच आवर्जून बघतील अन्यथा ‘रिमोट’ त्यांच्या हातात आहेच.

[email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट