पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची मुलीसह तलावात आत्महत्या
पतीच्या अपघाती मृत्यूमुळे नैराश्यात गेलेल्या पत्नीने मुलीसह शेताजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना 1 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पारनेरजवळील कन्हेर ओहळ शिवारात उघडकीस आली.
सुरेखा दत्तात्रेय औटी (वय 42) व शिवांजली दत्तात्रेय औटी (वय 21) अशी मृत्यू झालेल्या माय-लेकींची नावे आहेत. सुरेखा यांचे पती दत्तात्रेय औटी यांचे पारनेर रस्त्यावरील अपघातात 6 महिन्यांपूर्वी निधन झाले होते. पारनेर शहरात वास्तव्यास असलेल्या सुरेखा व शिवांजली नेहमीप्रमाणे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतात काम करण्यासाठी 31 जुलैला सकाळी गेल्या होत्या. त्यांनी संध्याकाळपर्यंत काम केले. काम संपवून घराकडे परतण्याऐवजी त्यांनी शेताजवळील तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले. सायंकाळनंतरही आई व बहीण घरी न परतल्याने सुरेखा यांचा मुलगा तेजसने शेताजवळ वास्तव्यास असणाऱ्या आपल्या चुलत्यांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी दोघींचा शोध सुरू केला. परंतु शोध न लागल्याने रात्री 11 वाजता पारनेर पोलीस ठाण्यात दोघी हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली.
पोलिसांनी सुरेखा यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, तलावाजवळ मोबाईल असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलीस व नातेवाईकांनी तलावाच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री दीड वाजता सुरेखा यांची पिशवी व त्यातील मोबाईल तलावाच्या काठावर आढळून आले. तेथून जवळच असलेल्या तलावाच्या डोहात सुरेखा व शिवांजली यांचे मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.
तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. 1 ऑगस्ट रोजी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर दोघींच्या मृतदेहावर दुपारी 4 वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेखा यांचा मुलगा तेजसवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List