कधी कधी गमतीत… बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांकडून बचाव
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्र्यांचे बेताल वागणे व बेताल वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत येत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीधर्म पाळत त्यांच्या बेताल मंत्र्यांचा बचाव केला आहे.
”मंत्री आपल्या भाषणामध्ये कधीकधी गमतीने देखील बोलतात, प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करु लागलो तर हे योग्य नाही”, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या मंत्र्यांचा बचाव केला. एबीपी माझाने याबाबच वृत्त दिले आहेत. मुख्यमंत्री यांनी याबाबत बोलताना सांगितले की, संजय शिरसाट जे बोलले ते चुकीचं वाटत नाही तर मेघना बोर्डीकर यांच्यासोबत मी बोललो त्यांचं वक्तव्य माध्यमांनी अर्धवट दाखवल्याचे त्यांनी सांगितले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील मंत्र्यांचे कारनामे सध्या राज्यभरात गाजतआहेत. माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमीचा डाव, विधानभवनातील आमदार समर्थकांची हाणामारी, आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीन चालकाला मारहाण ही प्रकरण सध्या गाजत आहेत. यावरुन सध्या महायुती सरकारवर जोरदार टीका होत आहे.
युती धर्माच्या हतबलतेमुळे… आदित्य ठाकरे यांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज ट्विट करत महायुती सरकारला जोरदार चिमटा काढला आहे. युती धर्माच्या हतबलतेमुळे शिरसाटांना अर्थ खातं मिळणारच, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ”हॅपी फ्रेंडशिप डे CMO MAHARASHTRA… असे दोस्त असताना… बरं, आता रमी खेळणाऱ्यांना क्रीडा खाते मिळतं, युती धर्माच्या हतबलतेमुळे, तर यांना अर्थ खाते मिळणारच”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List