सोमनाथ सूर्यवंशींना अज्ञातांनी मारले! पोलिसांकडून न्यायालयाचाही अवमान, मध्यरात्री नोंदवलेल्या गुन्हयाचा गोलमाल
परभणी पोलिसांनी थेट न्यायालयालाही हातोहात बनवले आहे। पोलीस कोठडीत अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला, हे ढळढळीत सत्य पोलिसांनी अव्हेरले असून सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मध्यरात्री नोंदवण्यात आलेल्या या गुन्हयाचा गोलमाल पाहून परभणीकरांमध्ये पोलिसांबद्दल कमालीची घृणा तसेच संताप व्यक्त होत आहे.
परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेवरून दंगल उसळली होती. दंगलखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी घराघरात घुसून निष्पापांना अटक केली होती. यात कायद्याचे विद्यार्थी असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता, न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मारहाणीतच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी या मारहाणीबद्दल मिठाची गुळणी धरली. अखेर शवविच्छेदन अहवालाने पोलिसी क्रौर्य जगासमोर आणले.
मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू दुर्धर आजाराने झाला, अशी धडधडीत असत्य माहिती देऊन मारकुट्या पोलिसांना पाठीशी घातले. या प्रकरणात विजया सूर्यवंशी यांनी न्यायालयात धाव घेऊन अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
या आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तिथेही राज्य सरकारचे थोबाड फुटले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यामुळे लाजेकाजेस्तव परभणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात रात्रीच्या अंधारात गुन्हा दाखल केला. अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये स्पष्ट म्हटले आहे. पोलिसांच्या या मिंधेगिरीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांना नेमके कुणी मारले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List