शीSS शीSS शीSS शीSS… लाज घालवली, विधिमंडळाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले, विधान भवनात अक्षरशः टोळीयुद्ध; लॉबीत दंगल
पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनात आज अक्षरशः टोळीयुद्ध भडकले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी झाली. एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत दोघांचे कार्यकर्ते भिडले. राज्यातील 13 कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात पोटतिडकीने मांडले जात असतानाच सभागृहाच्या लॉबीतच उसळलेल्या या दंगलीने विधान भवनाच्या अब्रूचे अक्षरशः धिंडवडे निघाले.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू झाले. तेव्हापासूनच भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात अधिवेशन सुरू झाल्यापासून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर बुधवारी विधान भवनाच्या गेटजवळच पडळकर आणि आव्हाड यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. दोघांनीही एकमेकांना आव्हानाची भाषा केली होती. त्यानंतर पडळकरांच्या एका कार्यकर्त्याने व्हॉट्सअॅपवर धमकीचे मेसेज पाठवल्याचा स्क्रीनशॉट आव्हाड यांनी आज सकाळी सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि आज दुपारी विधान भवनात राडा झाला.
अहवाल येताच कारवाई – नार्वेकर
ही घटना दुर्दैवी आहे. याप्रकरण मी अहवाल मागवला असून उद्या अहवाल येताच कारवाई केली जाईल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
आधी हात वर, नंतर दिलगिरी
विधान भवनात झालेल्या राडय़ानंतर सुरू झालेल्या चौफेर टीकेमुळे भाजप आमदार पडळकर यांनी विधान भवनातून अक्षरशः पळ काढला. प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरल्यानंतर त्यांनी ‘मला यातचे काहीच माहीत नाही’, असेही ते म्हणाले. मात्र घडलेल्या राडय़ाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्याने पडळकरांना चांगलीच समज दिल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. विधान भवनाच्या प्रांगणामध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेबद्दल मला दुःख आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे पडळकर म्हणाले.
आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी आव्हाड यांनी पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचले होते. त्यानंतर बुधवारी विधान भवनाच्या गेटजवळच पडळकर आणि आव्हाड यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. दोघांनीही एकमेकांना आव्हानाची भाषा केली होती. त्यानंतर पडळकरांच्या एका कार्यकर्त्याने व्हॉट्सअॅपवर धमकीचे मेसेज पाठवल्याचा स्क्रीनशॉट आव्हाड यांनी आज सकाळी सोशल मिडियावर पोस्ट केला होता आणि आज दुपारी विधान भवनात ही घटना घडली.
ते मलाच मारायला आले होते – जितेंद्र आव्हाड
विधान भवनात गुंडांना प्रवेश मिळत असेल. असे हल्ले होत असतील. आमदार सुरक्षित नसतील, तर आमदारकी हवी कशाला? ते गुंड मलाच मारायला आले होते. हा हल्ला कोणी केला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. हा सत्तेचा माज आहे, असे आव्हाड म्हणाले.
गुंड असो वा समर्थक… त्यांना पास देणाऱ्यांवर कारवाई करा – उद्धव ठाकरे
दंगल करणारे समर्थक असोत वा गुंड, ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची दिशाभूल केली गेली का हासुद्धा विषय आहे. ही जर परिस्थिती या राज्याची आली असेल तर विधान भवनाला अर्थ काय, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. अशी गुंडागर्दी विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर अवघड आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व विषय सोडून ताबडतोब त्या गुंडांवर आणि त्यांच्या पोशिंद्यांवर कडक कारवाई केलीच पाहिजे. तर आणि तरच तुम्ही राज्याचे पालक आणि मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवण्यास पात्रतेचे आहात, असा संतप्त टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List