गुरुपौर्णिमा! गुरुवंदनेसाठी  शिवसैनिकांची ‘मातोश्री’वर रीघ

गुरुपौर्णिमा! गुरुवंदनेसाठी  शिवसैनिकांची ‘मातोश्री’वर रीघ

मराठी माणसांमध्ये आत्मसन्मानाचा धगधगता अंगार पेटवणारे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गुरुवंदना अर्पण करण्यासाठी गुरुवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसैनिकांची रीघ लागली. गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निष्ठावंत शिवसैनिक आले आणि शिवसेनाप्रमुखांच्या आसनापुढे नतमस्तक झाले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मानवंदनेचा स्वीकार केला. आपण सर्वजण बाळासाहेबांनी दिलेला गुरुमंत्र लक्षात ठेवून कार्य करू, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांनी मराठी माणसाच्या जीवनाचा उद्धार केला. आजही त्यांचे विचार तमाम मराठीजनांना आणि शिवसैनिकांना नवचैतन्य देतात. न्याय्य हक्कांसाठी संघर्षाचे बळ देत असतात. त्याच जाणिवेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी असंख्य शिवसैनिक ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहचले आणि शिवसेनाप्रमुखांना गुरुवंदना अर्पण केली. सकाळपासून ‘मातोश्री’वर शिवसैनिकांची रीघ लागली होती.

शिवसेनाप्रमुखांच्या आसनावर चाफ्याची फुले अर्पण

सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण केली. शिवसेनाप्रमुखांना आवडती चाफ्याची फुले त्यांच्या आसनावर वाहून सर्वजण नतमस्तक झाले. बाळासाहेब आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या तसबिरीलाही चाफ्याचा पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, राजन विचारे, उपनेते विनोद घोसाळकर, आमदार नितीन देशमुख, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, सुधीर साळवी, उपनेते अमोल कीर्तिकर, गुरुनाथ खोत, उपनेत्या विशाखा राऊत, माजी आमदार विलास पोतनीस, आमदार रमेश कोरगावकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, गोरेगाव-दिंडोशी विभागप्रमुख शालिनी सावंत, अनिल कोकीळ, सुजाता शिंगाडे, आदींनी मातोश्रीवर हजर राहून शिवसेनाप्रमुखांना वंदन केले. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने शिवसेना आमदारांनी सकाळीच ‘मातोश्री’ निवासस्थान गाठले आणि शिवसेनाप्रमुखांच्या आसनापुढे नतमस्तक होऊन दैनंदिन कामकाजाची सुरुवात केली.

शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावरही पुष्पांजली

अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी ते शालेय जीवनापासून दरवर्षी गुरुपौर्णिमेला ‘मातोश्री’वर येत असल्याचे सांगत शिवसेनाप्रमुखांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तरुण व महिला शिवसैनिकांचीही उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी शिवसेना व शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावरही मोठय़ा संख्येने शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिकांनी पुष्पांजली वाहून वंदन केले.

बाळासाहेब हेच आपले सर्वांचे दैवत, गुरू आहेत उद्धव ठाकरे

‘मातोश्री’वर आलेल्या शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिकांचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. त्यांना नमस्कार करण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले तेव्हा उद्धव ठाकरे विनम्रपणे म्हणाले की, आपण सर्व एक आहोत. मला शाल, पुष्पगुच्छ नको. तुमच्याकडून प्रेमाचा ‘जय महाराष्ट्र’ पुरेसा आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार करतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वांचे दैवत, गुरू आहेत. आपण सर्व त्यांच्यासमोर नतमस्तक होऊया. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करूया, त्यांचे ज्वलंत विचार सदैव स्मरणात ठेवून काम करूया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;