लग्न ठरताच पतीचे निधन, आयुष्यभर राहिली अविवाहित; ही मराठमोळी अभिनेत्री विधवेसारखे जगली आयुष्य
ही कथा आहे एक मनमोहक अभिनेत्रीची. जिच्यासोबत अनेक सुपरस्टार्सने काम केले आहे. करिअरमध्ये तिने खूप नाव कमावले, पण जेव्हा तिच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो तेव्हा ते फक्त दु:ख, वेदना आणि एकटेपणाने भरलेले होते. विचार करा, त्या स्त्रीचे आयुष्य कसे गेले असेल जिच्या लग्नाआधीच पतीचा मृत्यू झाला. होय, या अभिनेत्रीचा साखरपुडा झाला होता. पण लग्नाआधीच तिच्या होणाऱ्या पतीचा मृत्यू झाला आणि ही नायिका आयुष्यभर विधवेसारखे जीवन जगली. आता तुम्ही अंदाज लावू शकता की इतके नाव कमावणाऱ्या अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्यात किती एकटेपणा होता.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘शोर’ सारख्या हिट चित्रपटात मनोज कुमारसोबत काम करणारी अभिनेत्री नंदा आहे. तिने बॉलिवूड करिअरमध्ये 70 हून अधिक चित्रपटात काम केले. ती खूप सुंदर आणि दमदार अभिनय करणारी अभिनेत्री होती. दिलीप कुमारची पत्नी सायरा बानोही तिचा खूप आदर करायची. नंदा ही सायरा बानोच्या कुटुंबातील सदस्यासारखी होती. विशेष म्हणजे, आता नंदा या जगात नाहीत. 75 व्या वर्षी 25 मार्च 2014 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
नंदाचे खरे नाव, जन्म, ओळख
नंदाचे खरे नाव नंदिनी कर्नाटकी होते. तिचा जन्म 8 जानेवारी 1939 रोजी झाला. तिला नंदा या नावाने ओळख मिळाली. तिने हिंदी चित्रपटांसह मराठी चित्रपटांमध्येही काम केले. ती एका मराठमोळ्या कुटुंबातील होती. तिचे वडील मराठी अभिनेते-चित्रपट निर्माते होते. तिचा भाऊही चित्रपटसृष्टीत होता. पण अभिनेत्याच्या रूपात नव्हे तर सिनेमॅटोग्राफर म्हणून. तिच्या कुटुंबाचे दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्याशीही नाते होते. ते तिचे काका होते. नंदा जेव्हा सात वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाला खूप कठीण काळातून जावे लागले. अशा परिस्थितीत ती बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करू लागली आणि चित्रपटांतून मिळणाऱ्या पैशांनी कुटुंबाला आधार मिळाला.
नंदाचे चित्रपट आणि काम
नंदाने 1948 मध्ये आलेल्या ‘मंदिर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1948 ते 1956 पर्यंत तिने बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर तिचे काका आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांनी तिला मोठी संधी दिली आणि 1956 मध्ये ‘तूफान और दीया’ चित्रपटात तिला कास्ट केले. हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या कथेवर आधारित होता. त्यानंतर तिने ‘भाभी’ चित्रपट केला आणि यासाठी तिला पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले. पुढे ती मुख्य भूमिकांमध्ये दिसू लागली. तिने ‘छोटी बहन’, ‘हम दोनों’, ‘कानून’, ‘आंचल’, ‘जब जब फूल खिले’, ‘आशिक’, ‘बेटी’, ‘इत्तेफाक’, ‘शोर’, ‘उम्मीद’, ‘भाभी’, ‘परिणीता’, ‘अधिकार’, ‘मजबूर’ आणि ‘प्रेम रोग’ अशा चित्रपटांमध्ये काम केले. त्या काळात ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनली होती. ‘जब जब फूल खिले’ चित्रपटात ती शशी कपूरसोबत दिसली होती. हा चित्रपट एका श्रीमंत मुली आणि गरीब मुलाच्या कथेवर आधारित होता.
नंदासाठी आलेले लग्नाचे स्थळ
नंदाच्या भावाने सांगितले होते की, एक साधे आणि साध्या पद्धतीने लग्नाचे स्थळ आले होते. त्यानंतर त्याच्या बहिणीने विचार केला. एक दिवस वहिदा रहमानला फोन केला आणि नंदाने या स्थळाला होकार दिला.
वहीदा रहमान यांनी जुळवलं होतं नंदाचं लग्न
एकदा नंदाच्या भावाने, जयप्रकाश यांनी, नंदा आणि मनमोहन यांचं प्रेमप्रकरण याबाबत चर्चा केली होती. पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, या दोघांच्या प्रेमकथेत वहीदा रहमान यांचीही भूमिका होती. एकदा त्या दोघांना भेटवण्यासाठी वहीदा रहमान यांनी एक डिनरचं आयोजन केलं होतं. त्यांनी दीदी (नंदा) आणि मनमोहनजी यांना एकटे सोडलं. जेणेकरून दिग्दर्शक आपल्या मनातली गोष्ट नंदाला सांगू शकेल. त्या डिनरच्या रात्रीच मनमोहनजींनी नंदाला सांगितलं की, ते तिच्याशी लग्न करू इच्छितात.
साखरपुड्यानंतर पतीचा मृत्यू
त्यानंतर मनमोहनसोबत नंदाचा साखरपुडा झाला. नंदाचा स्वभाव खूप लाजाळू होता. तिला आयुष्य खाजगी पद्धतीने जगायला आवडायचे. तिने 1992 मध्ये मनमोहन देसाई यांच्यासोबत साखरपुडा केला. पण तिला कल्पनाही नव्हती की तिच्या आयुष्यावर संकट कोसळणार आहे. ती लग्नासाठी अनेक स्वप्ने बघत होती. पण साखरपुड्यानंतर दोन वर्षांनी मनमोहन देसाई यांचे निधन झाले आणि या घटनेने नंदाला मोठा धक्का बसला.
विधवेसारखे जगली आयुष्य
नंदाचा भाऊ जयप्रकाश याने सांगितले की, होणाऱ्या पतीच्या मृत्यूनंतर ती आयुष्यभर विधवेसारखे जीवन जगू लागली. त्या दिवसानंतर तिने कधीही रंगीत कपडे घातले नाहीत. ती म्हणायची, ‘मी त्यांना पती मानले आहे. ते नेहमीच माझे पती राहतील.’ आयुष्यभर नंदाने स्वतःला पांढऱ्या कपड्यांमध्ये बंदिस्त केले. कोणीही लग्नाचा प्रस्ताव आणला तरी तिचे पांढरे कपडेच तिचे उत्तर होते. मनमोहन देसाई यांच्या निधनानंतर तिने स्वतःला बंदिस्त करून घेतले. ती कोणाला भेटत नसे, कोणाशी बोलत नसे. तिने थिएटरला जाणेसुद्धा बंद केले होते. तिला हिरे खूप आवडायचे, पण ती इच्छाही तिच्या मनात मरून गेली. नंदाच्या भावाच्या म्हणण्यानुसार, ती म्हणायची, ‘आता काय राहिले आहे.’ ती सन्यासीणीसारखे जीवन जगत होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List