सूरज चव्हाणसाठी ‘सो कॉल्ड’ सुपरस्टार्सला सिनेमे पुढे ढकलावे लागले; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण भलताच चर्चेत आहे. सूरजचा ‘झापुक झुपूक’ हा मुख्य भूमिकेतील पहिला सिनेमा २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सिनेमाची वाट पाहात आहे. आता एका अभिनेत्याने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे किरण माने. त्याने नुकताच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सूरज चव्हाण आणि गौतमी पाटीलचा उल्लेख केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आता त्याची नेमकी पोस्ट काय आहे चला जाणून घेऊया…
वाचा: लसणाच्या पाकळ्या खाऊन या मराठमोळ्या अभिनेत्याने काढले होते दिवस, विनय आपटेंनी मदत केली अन्…
काय आहे अभिनेत्याची पोस्ट?
किरण मानेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, “उच्चभ्रूंनी हेटाळणी केलेल्या गौतमी पाटीलला नंबर वन चॅनेलच्या रिॲलिटी शो मध्ये घ्यावं लागतं… आणि ज्या सुरज चव्हाणवर ‘ते’ हसले, त्याचा सिनेमा येतोय म्हणून प्रेक्षकांवर लादलेल्या ‘सो कॉल्ड’ सुपरस्टार्सना त्यांचे सिनेमे पुढे ढकलावे लागतात… ही सांस्कृतिक वर्चस्ववादाला सर्वसामान्य प्रेक्षकांनी दिलेली सणसणीत मुस्काडात आहे!” असे म्हटले आहे.
सोशल मीडियावर किरण मानेची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी सहमती दर्शवली आहे तर काहींनी कमेंट करत टीका केली आहे. काहींनी यामुळं चांगल्या कलाकारांवर अन्याय होत असल्याच्या कमेंट्सही केल्या आहेत.
गेल्या वर्षी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची एन्ट्री झाली. सुरुवातीला सूरजला खेळ समजत नव्हता. पण नंतर नंतर अनेकांनी त्याला पाठींबा दिला. सूरजला बिग बॉसच्या घरात घेतल्यामुळे अनेकांनी निर्मात्यांवर टीका केली होती. आता सूरज थेट केदार शिंदेच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमामध्ये दिसणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List