‘रागाच्या भरात मर्यादा विसरलो..’; अनुराग कश्यपचा ब्राह्मण समाजाला माफीनामा
दिग्दर्शक अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागितली आहे. इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला आहे. ‘रागाच्या भरात मी माफी मर्यादा विसरलो आणि ब्राह्मण समाजाला बरंवाईट म्हणालो’, असं त्याने लिहिलंय. अनुरागने सोशल मीडियावर एका ट्रोलरला उत्तर देताना ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर अनेकांकडून त्याच्यावर जोरदार टीका झाली. इतकंच नव्हे तर मुंबई पोलीस आयुक्तांकडे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याता आली होती. ब्राह्मणांबद्दलच्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर अनुरागने याआधीही माफी मागितली होती. परंतु आता पुन्हा एकदा त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अनुराग कश्यपची पोस्ट-
‘मी रागाच्या भरात एकाला उत्तर देताना माझी मर्यादा विसरलो आणि संपूर्ण ब्राह्मण समाजाला वाईट म्हणालो. असा समाज, ज्याचे लोक माझ्या आयुष्यात कायम राहिले आहेत, आजसुद्धा आहे आणि त्यांचं माझ्या आयुष्यात बरंच योगदान आहे. आज ते सर्वजण माझ्यामुळे दुखावले गेले. माझे कुटुंबीयसुद्धा माझ्याने दुखावले आहेत. अनेक बुद्धिजीवी लोक, ज्यांचा मी आदर करतो ते माझ्या रागाने आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीने दुखावले आहेत. मी स्वत: तसं वक्तव्य करून स्वत:च्याच मुद्द्यावरून भरकटलो’, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.
त्याने पुढे म्हटलंय, ‘मी या समाजाची मनापासून माफी मागतो, ज्यांना मला तसं म्हणायचं नव्हतं. परंतु रागाच्या भरात एकाच्या घाणेरड्या टिप्पणीचं उत्तर देताना मी तसं लिहिलं. मी माझ्या सर्व मित्रांची, माझ्या कुटुंबीयांची आणि त्या समाजाची, माझ्या बोलण्याच्या पद्धतीसाठी, अभद्र भाषेसाठी माफी मागतो. यापुढे असं पुन्हा होणार नाही, यावर मी काम करेन. माझ्या रागावर काम करेन आणि एखाद्या मुद्द्याबद्दल बोलायचं असेल तर योग्य शब्दांचा वापर करेन. तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे.’
अनुराग कश्यपच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. ‘मी माफी मागतो. परंतु ही माफी मी माझ्या पोस्टसाठी नाही तर त्या एका ओळीसाठी मागतोय, ज्याला चुकीच्या पद्धतीने समजलं गेलं आणि द्वेष पसरवला गेला. कोणतंही ॲक्शन किंवा भाषण हे तुमच्या मुलगी, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि ओळखीच्या व्यक्तींपेक्षा मोठं नाही. त्यांना बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. जे स्वत:ला संस्कारी म्हणवतात, तीच लोकं हे सर्व करत आहेत,” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List