साऊथ सुपरस्टार महेश बाबू अडचणीत; रिअल इस्टेटशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीची नोटीस
हैदराबादमधील दोन रिअल इस्टेट गुंतवणूकदारांच्या फसवणुकीशी संबंधित कथिक मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात ईडीने साऊथ सुपरस्टार महेश बाबूला समन्स बजावले आहेत. महेश बाबूला 28 एप्रिल रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. त्याच्यावर साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपच्या काही संशयास्पद प्रकल्पांच्या जाहिराती केल्याचा आरोप आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साई सूर्या डेव्हलपर्सच्या प्रकल्पांच्या जाहिरातीसाठी त्याला 5.9 कोटी रुपये मिळाले होते. त्यापैकी 3.4 कोटी रुपये त्याला चेकद्वारे आणि उर्वरित 2.5 कोटी रुपये रोख देण्यात आले होते. ही रोख रक्कम फसवणुकीद्वारे जमा झालेल्या रोख रकमेचा एक भाग असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. भाग्यनगर प्रॉपर्टीज लिमिटेडचे संचालक नरेंद्र सुराणा, साई सूर्या डेव्हलपर्सचे मालक के. सतीश चंद्र गुप्ता आणि इतरांविरुद्ध तेलंगणा पोलिसांनी एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता.
संबंधित कंपन्यांनी अनधिकृत लेआऊट आणि चुकीच्या नोंदणीद्वारे एकाच जमिनीची अनेकदा विक्री करून खरेदीदारांकडून कोट्यवधी रुपये ॲडव्हान्स वसूल केल्याचा आरोप आहे. साई सूर्या प्रकल्पांची जाहिरात महेश बाबूने केली होती. केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशभरात महेश बाबूचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याने केलेल्या जाहिरातींमुळे अनेक लोकांना गुंतवणूक करण्यात भाग पाडलं गेलं. त्यांना यामागील मोठ्या फसवणुकीची पूर्णपणे माहिती नव्हती. जरी महेश बाबू थेट या घोटाळ्यात सहभागी नसला तरी त्याला विकासकांकडून जाहिरातींसाठी पैसे मिळाले आहेत. त्याच पैशांबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने महेश बाबूला समन्स बजावले आहेत.
रिअल इस्टेट गुंतवणूकदारांच्या या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने 16 एप्रिल रोजी अनेक ठिकाणी छापे टाकले होते. सुराणा ग्रुप आणि साई सूर्या डेव्हलपर्सवर ही कारवाई करण्यात आली होती. सिकंदराबाद, जुबली हिल्स आणि बोवेनपल्ली इथल्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले होते. यावेळी ईडीने सुराणा ग्रुपचे प्रमुख नरेंद्र सुराणा आणि साई सूर्या डेव्हलपर्स यांच्या घरातून कागदपत्रे आणि रोख रकमेच्या स्वरुपात पुरावे जप्त केले आहेत.
जप्त केलेल्या कागदपत्रांमधून 100 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांशी संबंधित मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता दिसून येत असल्याचा दावा ईडीने केला आहे. फसवणूक करून मिळवलेले पैसे इतरांकडे वळवण्यात आले होते, ज्यामध्ये जाहिरातींचे ऑफर्स स्वीकारलेल्या सेलिब्रिटींचाही समावेश होता, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. या फसवणुकीने गोळा केलेल्या पैशातून मिळवलेल्या मालमत्ता जप्त करण्याची तयारी ईडी करत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List