महाराष्ट्राची लूट थांबवून पुन्हा मराठीला वैभव आणि दरारा मिळवून देऊ! शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध

महाराष्ट्राची लूट थांबवून पुन्हा मराठीला वैभव आणि दरारा मिळवून देऊ! शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध

मोदी सरकारला महाराष्ट्राविषयी आकस आणि द्वेष वाटतो. त्यामुळेच महाराष्ट्राचं वैभव लुटून ते गुजरातला पळवलं जातंय. पण, देशात इंडिया आघाडीचं आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्राची ही लूट थांबवू आणि मराठीला तिचं वैभव, दरारा आणि महत्त्व पुन्हा मिळवून देऊ, असं प्रतिपादन करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला.

मातोश्री येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. वचननामा प्रसिद्ध करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या हुकूमशाही धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक टप्प्याटप्प्याने पुढे सरकतेय. महाराष्ट्रातला दुसरा टप्पा होतोय. लहानपणी सगळ्यांनी ऐकलं आहे की भूताची भिती वाटली की रामाचा जप करावा, भूतं पळतात असं म्हणायचे. खरं खोटं मला माहीत नाही. अशीच भाजपची अवस्था झाली आहे. भाजपला पराभव समोर दिसू लागल्याने ते आता राम राम म्हणताहेत. हा नेहमीचा उद्योग आहे. सुरुवातीच्या काळात ठीक होतं. 2014 साली जेव्हा आम्ही युतीत होतो आणि युतीतला सहकारी पक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेलो होतो. सगळीकडे आश्चर्याचं वातावरण होतं. कारण बऱ्याच वर्षांनंतर एका पक्षाची सत्ता आली होती. त्यानंतर भाजपने नोटबंदी केली. 2019मध्ये सत्ता आल्यानंतर 370 कलम काढलं तेव्हाही आम्ही सोबत होतो. आता मात्र त्यांना पाशवी बहुमत हवं आहे, जेणेकरून ते देशाची घटना त्यांना बदलायची आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

वचननामा प्रसिद्ध करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसने, इंडिया आघाडीने आणि राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. तेव्हाही मी म्हणालो होतो की गरज वाटेल तेव्हाच आम्ही शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करू. याचं कारण इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे, त्यात शिवसेना घटकपक्ष असेल. मात्र महाराष्ट्रातील ज्या गोष्टी देशात सरकार आल्यानंतर व्हाव्यात असं आम्हाला वाटतंय, त्या शिवसेनेच्या वचननाम्यातून आम्ही प्रसिद्ध करत आहोत.’

‘या वचननाम्याच्या सुरुवातीला मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणणार नाही. कारण दुसरी एसंशि म्हणजे मिंधेंची आहे. त्याविषयी मी बोलणार नाही. वचननाम्यातील ठळक मुद्दे मी इथे मांडू इच्छितो. गेल्या दोन अडीच वर्षांत महाविकास आघाडीचं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एककलमी कार्यक्रम हे पोकळ इंजिन सरकार करतंय. त्याला केंद्राचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राचे आणि येणारे उद्योग पळवताहेत, हिरेबाजार, क्रिकेट मॅच, फिल्मफेअर फंक्शन सगळंच पळवलं जातंय. महाराष्ट्राचं वैभव लुटलं जातंय. ती लूट इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर प्रथम थांबवू. जे महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचं वैभव वाढत होतं, ते अधिक पटीने वाढवू. कारण, तेव्हाचं मोदी सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीही मदत करत नव्हतं. पण इंडिया आघाडीचं सरकार देशात येईल. येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येईल. सरकार आल्यानंतर जो काही खड्डा महाराष्ट्रात पाडलाय, तो भरून काढून अधिक जोमाने आम्ही महाराष्ट्राचं वैभव पुन्हा एकदा मिळवून देऊ. आम्ही गुजरातचं काहीही ओरबाडून घेणार नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर गुजरातच्या हक्काचं त्याला देऊ. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आसाम अशी जी जी राज्यं आहेत, त्या सगळ्या राज्यांचा आदर ठेवून त्यांना आवश्यक ते सगळं देऊच. पण वित्तीय केंद्र नव्याने महाराष्ट्रात उभं करू जेणेकरून रोजगाराची संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना स्थलांतर करावं लागत आहे. अनेक तरुण देश सोडून जात आहेत. त्यांना तिथेच स्वतःच्या जिल्ह्यातच, गावातच रोजगार कसा निर्माण करता येईल, याच्यावर भर देऊ.’

‘कोरोनावेळी आरोग्य सेवांमध्ये असलेली उणीव प्रकर्षाने जाणवली. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आधुनिक उपकरणं आणून ती अद्ययावत करण्यात येतील. ग्रामीण भागातील प्राथमिक उपचार केंद्रांमध्ये थर्मामीटर्स पण नाहीत. नर्सेस, डॉक्टरची वानवा आहे. नांदेड, नागपूर, ठाण्यात औषधाविना रुग्णांचे मृत्यू झाले. असं आता होणार नाही. शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमुक्ती. महाराष्ट्रात फक्त कर्जमुक्ती करून नाही थांबणार पण शेतकऱ्यांना जो पीकविमा मिळतो. त्याचे निकष विचित्र असून ते कंपन्यांनी ठरवलेले आहेत. ते बदलले जातील. आणि शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी याकडे लक्ष असेल. सध्या एका योजनेचा गवगवा केला जातोय ती शेतकरी सन्मान योजना. मात्र, शेतकऱ्यांनीच मला सांगितलं होतं की शेतीच्या विविध अवजार, बियाणं, खतं यांवर केंद्र सरकार पैसा घेतं आणि फक्त सहा हजार वर्षाला देतं. ही लूट थांबवण्यासाठी या सगळ्या गोष्टी जीएसटी मुक्त करू. शेतीला हमीभाव आम्ही स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार देऊ. शेतमाल साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना गोदामं, शीतगृह देऊ. जे विकेल ते पिकेल या योजनेसाठी विशेष सर्वे करून जगभरातील माहिती जमा करून तेच पीक घ्यायचं. जेणेकरून शेतकऱ्यांना बाजारभाव मिळेल. ज्या मालाला मागणी असेल त्याचं पीक. शेतकरी हा केंद्र बिंदू ठेवत आहोत.’

‘उद्योगस्नेही वातावरण जे सध्या राज्यात नाही. ते निर्माण करून जास्त परवानग्यांची कटकट लागू नये, त्याच सोबत पर्यावरण स्नेही उद्योग वाढवू. विनाशकारी प्रकल्प राज्यात येऊ देणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परवानग्यांमध्ये घटनेनुसार जी संघराज्य पद्धत अवलंबलेली आहे. त्याचा अर्थ केंद्र आणि राज्य यांना समान अधिकार आहेत. सध्या जी एकाधिकारशाही सुरू आहे, ती मोडून काढून स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यातील संस्था यांचं विकेंद्रीकरण करू. सध्या सुरू असलेला कर दहशतवाद तो थांबवू. जीएसटीमधील त्रासदायक अटीशर्ती आहेत, त्या सल्लामसलत करून पूर्णपणे काढून टाकू. महिलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण, सुरक्षितता देऊ. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ. राज्यातल्या युती सरकारच्या काळात पाच जीवनावश्यक गोष्टींचे भाव स्थिर ठेवले होते. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर याच गोष्टींचे भाव स्थिर राहतील यासाठी आग्रही राहू. संविधानाचं रक्षण करणं ही सरकारची प्राथमिकता. महाराष्ट्राची लूट थांबवून मराठीचा दरारा वैभव आणि महत्त्व काय आहे, हे दाखवून देऊ. आम्ही आघाडी केली म्हणजे पक्ष विलीन केले नाहीत. युतीच्या काळातही आमचा वचननामा वेगळा होता. आम्हाला ज्या महत्त्वाच्या आहेत असं वाटलं, ते यात नमूद आहे.’

मोदी आणि शहा अजून तुळजाभवानीच्या मंदिरात का गेले नाहीत?

महाराष्ट्र, मराठी भाषा आणि भवानी माता यांच्याविषयी मोदी आणि शहांच्या मनात आकस आहे. त्यामुळे ते सगळ्या मंदिरात जाऊन आले. पण, तुळजाभवानी मंदिरात गेले नाहीत. मला राम मंदिरावरून प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की तुम्ही अजून तुळजा भवानी मंदिरात का गेला नाहीत? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऐश्वर्याच्या हाताला झालं तरी काय?; मतदानाच्या रांगेत कुणाशी बोलत होती? ऐश्वर्याच्या हाताला झालं तरी काय?; मतदानाच्या रांगेत कुणाशी बोलत होती?
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या हिने कोट्यवधीची संपत्ती अभिनय आणि जाहिरातीमधून कमावलीये. ऐश्वर्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला...
हजारो नागरिकांचे नाव मतदार यादीतून गायब, भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ
मतदान संपताच चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना जाहीर पत्र; भावनेला हात घालत म्हणाले…
मतदानाला मुद्दाम उशीर केला? ढिसाळ नियोजनावरून रोहित पवारांचा सवाल
VIDEO: विरोधातलं मतदान कमी करण्यासाठी मोदी सरकारचा डाव; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
Whatsapp आणणार नवीव फिचर, आपल्या आवडीप्रमाणे बदलता येणार चॅट बबलचा रंग
नगरमधील डॉक्टरांची कमाल ! तीन वर्षीय मुलीचा कापला गेलेला पंजा शस्त्रक्रियेने पुन्हा जोडला