परीक्षण – अस्वस्थतेचे विदारक चित्रण

परीक्षण – अस्वस्थतेचे विदारक चित्रण

>> प्रा. डॉ. नारायण पाटील

परिवर्तनाच्या इतर माध्यमापेक्षा साहित्याचे माध्यम प्रभावी, परिणामकारक आणि शाश्वत स्वरूपाचे असते. साहित्याद्वारे होणारे परिवर्तन हे मनोनिष्ठ स्वरूपाचे असते. साहित्य अकादमी पुरस्कार मिळविणारे लेखक कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘बाभूळकांड’ या संग्रहातील कथा मानवतेचा शोध घेतात.

कथासंग्रहाचं शीर्षक ठरलेली ‘बाभूळकांड’ ही सर्वसामान्यांच्या संघर्षाची गाथा आहे. आजच्या सामाजिक, राजकीय जाणिवांचे भीषण समाजवास्तव कथानकातून चित्रित केले आहे. कथेतील पशुपक्ष्यांचे जीवन आणि संवाद पंचतंत्राची आठवण करून देणारे. हा संघर्ष संपलेला नसून सृष्टीचक्रात पुनपुन्हा तेच घडत आहे, ही  वास्तवदर्शी जाणीवही वाचकांना अंतर्मुख करते. ‘अंगठय़ाचा ठसा’ या कथेत साध्या सरळ निष्कलंक स्वभावाच्या सावजीला त्याचा बेरकी आणि स्वार्थी भाऊ आयुष्यातून उठवतो, उद्ध्वस्त करतो, याचे वास्तवदर्शी चित्रण आले आहे. ‘सुक्याची गाय’ कथेतील सुक्याचे गायीवरील नितांत आणि अढळ प्रेम जगावेगळेच व्यक्त झाले आहे. एक दिवस अचानक गाय गोठय़ातून गायब होते. तिची चोरी झाली की निघून गेली? हे समजले नाही. गाईचा शेवटपर्यंत तपास लागत  नाही. या दुःखाच्या धक्क्याने सुक्या वेडा होतो आणि तोही परागंदा होतो. गाईप्रमाणेच बेपत्ता झालेल्या सुक्याची ही करुण कहाणी वाचकांच्या मनाचा ठाव घेते.

‘शिळ्या भाकरीचं विमान’ या कथेतून अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेला बाप आपल्या मुलाला प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करतो. तो मुलगा जेव्हा प्रदेशात जातो तेव्हा गावमातीला अन् बापालाही विसरतो. या गोष्टीचा त्या बापाच्या मनावर एवढा परिणाम होती की, तो वेडा होतो अन् आयुष्यभर बस स्टँडवर आपला मुलगा परतून येण्याची वाट पाहतो. हृदय पिळवटून टाकणारं दुःख लेखकाने अशा तऱहेने मांडले की, वाचक सुन्न झाल्यावाचून राहणार नाही.

‘रघु मोर्चात मेला’ ही लघुकथा असली तरी कथेचा आशय हा अनंत समस्यांचा धागा आहे. आजच्या राजकीय, सामाजिक चळवळीमध्ये ग्रामीण भागातील अनेक युवक दिशाहीन नेतृत्वाच्या आहारी जाऊन स्वतच्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतात. राजकीय सत्ता आणि नेते कार्यकर्त्यांचा कढीपत्त्याप्रमाणे वापर करून घेतात. हे वास्तव लेखकाने या कथेद्वारे शब्दांच्या चिमटीत नेमके पकडले आहे.

‘आलकीच्या आजीचा आरसा’ या कथेतील शेवंताईकडे जादूचा आरसा आहे, जो तिच्या पश्चात आपल्याला मिळावा यासाठी सर्व मुली आणि नाती यांच्यात असलेली चढाओढ दाखवताना लेखकाने कुटुंब जीवनातील प्रत्येक नात्यात व व्यवहारात असलेली स्वार्थलोलुप वृत्ती तसेच दिखाऊपणा, कोडगी सामाजिकता, भावनांचा उथळ आविष्कार अशा जाणिवांचे यथार्थ दर्शन घडवले आहे.  ‘मरणूक’ ही कथा आजच्या वैद्यकीय क्षेत्रातील विदारक वास्तव  समोर आणणारी आहे. हॉस्पिटलचा खर्च सर्वसामान्य माणसाच्या ऐपती बाहेरचा आहे. दवाखान्याअभावी मरण परवडले, पण दवाखाना नको अशी भावना सामान्यजनांच्या मनात उत्पन्न होते. नवनाथ पानसरेची पत्नी आजारी पडते तो तिला शहरातल्या मोठय़ा दवाखान्यात भरती करतो. तिसऱया दिवशी ती मरते. तेव्हा त्याच्या तोंडचे वाक्य खूप काही सांगून जाणारे. तो म्हणतो, “या हास्पिटलनं त माझे दोन्ही खिशे रिकामे केले. बायकोची डेडबाडी गावी न्यायची कशी?”  हा सवाल अगतिक होऊन स्वतःला जरी विचारला असला तरी तो व्यवस्थेला आहे.

‘साहेबराव करपे’ ही कथा आज ऐरणीवर असलेल्या बळीराजाच्या आत्महत्यांवर प्रखर भाष्य करते. साहेबरावने सहकुटुंब स्वतची जीवनयात्रा संपवली. त्यातून तरी व्यवस्थेला जाग येईल. मात्र व्यवस्था संवेदनहीन झाली आहे. या वास्तवाला लेखक खूप चांगल्या पद्धतीने समोर आणतो. एकूण अठरा कथा या संग्रहात आल्या आहेत. त्या प्रत्येक कथेला वास्तवाची किनार आहे. ‘तात्याची हाडे’, ‘अंगठय़ाचा ठसा’, ‘वाटणी’ आदी कथांचा उल्लेख करायला हवा.

‘बाभूळकांड’मधील कथेतील पात्रे ग्रामीण बोलीत तथा लोकभाषेत संवाद साधतात. लोकभाषेवरून व्यक्त झालेली ग्रामीण लोकसंस्कृती हे या कथासंग्रहाचे वैशिष्टय़ म्हणता येईल. निवेदनाची प्रमाणभाषा प्रवाही स्वरूपाची असून पात्रांच्या बोलीवरून कथानक हुबेहुब वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहते. आजी किंवा आजोबाने आपल्या नातवाच्या डोक्यावरून मायेने अलगद हात फिरवून शहाणपणाच्या चार गोष्टी सांगाव्यात त्याच शैलीने पाटेकर वाचकांना कथा सांगतात. त्यामुळेच ती अतिशय परिमाणकारक उतरली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, रेखाटणे, मांडणी अतिशय उत्कृष्ट आणि अर्थपूर्ण झाली आहे. या कथा निश्चितच वाचकांचे लक्ष वेधून घेतील यात कुठलीही शंका नाही.

बाभूळकांड

लेखक ः ऐश्वर्य पाटेकर

प्रकाशक ः लोकवाङ्मय गृह

पृष्ठे ः 172, ह मूल्य ः 250 रुपये

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News