उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात दुचाकीला धडक; चार जण गंभीर जखमी
उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी धारूरवरून केजकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीचा धूनकवड फाटा परिसरात अपघात झाला. ताफा मार्गक्रमण करत असताना दुचाकीला धडक बसल्याने नवरा-बायको आणि दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले. अपघात एवढा जबरदस्त होता की, दुचाकीचा चुराडा झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून सर्व जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या धडकेत अजित पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकही जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून पंचनामा सुरू केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी ताफ्याचा वेग, अचानक आलेली दुचाकी किंवा रस्त्यावरील गर्दी यापैकी कोणत्या कारणामुळे अपघात झाला याची चौकशी सुरू आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List