प्रणाम वीरा – कोटणीस घराण्यातील अखेरचा योद्धा
<<< रामदास कामत >>>
[email protected]
देशसेवा करण्याची घराण्याची परंपरा कायम राखत सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेणारा शूरवीर योद्धा लेफ्टनंट प्रकाशनारायण श्रीधर कोटणीस. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बीमोड करत असतानाच त्यांना वीरगती प्राप्त झाली.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आवाहनातून प्रेरणा घेऊन त्याने सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. सैन्यातून देशसेवा करण्याची घराण्याची परंपरा असल्याने घरूनही संमती मिळाली आणि त्याने आपला निर्धार सार्थकी लावला. युद्धबंदी असूनही पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बीमोड करत असतानाच त्याला वीरगती प्राप्त झाली. तो शूरवीर योद्धा होता लेफ्टनंट प्रकाशनारायण श्रीधर कोटणीस.
प्रकाशनारायण ऊर्फ प्रकाश कोटणीस यांचा जन्म 10 मार्च 1939 रोजी मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिरातून झाले. कोटणीस घराण्याची सैन्यात राहून देशसेवा करण्याची परंपरा आहे. त्यांचे दोन चुलत भाऊ आर्मीत होते. पैकी एक होते डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस ज्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चीनला जाऊन वैद्यकीय सेवा दिली होती. याशिवाय त्यांच्या भाऊकाकांचा मुलगा कल्याणभाई व नातू माधव हे हवाई दलात होते. प्रकाश यांचा मोठा भाऊ प्रताप हा नौदलात होता. थोडक्यात कोटणीस परिवाराने तीनही दलात राहून देशसेवा केली आहे. एकूण आठ भावंडांपैकी प्रकाश सर्वात लहान. त्यामुळे सगळ्यांचे लाडके. किरकोळ शरीरयष्टी असली तरी स्वभावाने खूप मिश्किल होते. त्यांना क्रिकेट व बॅडमिंटनची खूप आवड होती. क्रिकेटमध्ये बहुतेक वेळा ते कर्णधार असायचे.
मुंबईत त्या काळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. माहीमच्या शीतलादेवी गौड सारस्वत कॉलनीमध्ये माधव साखरदांडे व त्यांची पत्नी या चळवळीमध्ये सक्रिय होते. ते दोघे तुरुंगातसुद्धा जाऊन आले होते. त्यांनी माहीम परिसरातील सर्व मुलांचा ग्रुप तयार केला. त्याचे प्रमुख प्रकाश होते. तिथूनच त्यांच्यातील नेतृत्वगुणाची चुणूक दिसायला लागली होती. ज्या वेळी 30 एप्रिल 1960ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, त्या वेळी कॉलनीतील सर्व मुलांनी मशाली पेटवून सायकलीवरून मोर्चा काढला, ज्याचे नेतृत्व प्रकाश यांनी केले.
1 मे रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे शिवाजी पार्कवर भाषण होते. भयंकर गर्दी झाली होती. पंडित नेहरू यांनी आपल्या भाषणात सांगितले की बाकीच्या राष्ट्राच्या सैन्यदलापेक्षा आपले सैन्यदल तुलनेने कमी आहे. तरी घराघरातून प्रत्येक तरुणाने सैन्यात भरती व्हावे. त्यांची देशाला नितांत गरज आहे. पंडितजींचे ते आवाहन प्रकाशच्या मनात इतके ठसले की त्यातून प्रेरणा घेऊन घरी आल्यावर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा हट्ट धरला. त्यांनी मॅट्रिक झाल्यावर कॉलेजला जायच्या आधी व्यायाम शाळेत जाऊन शरीरयष्टी सुदृढ करण्यावर भर दिला.
रूपारेल कॉलेजमधून नुकतेच बी. एस्सी.झाले होते व इंजिनीरिंग कोर्स करत होते. वय जेमतेम 20-21 होते. घरून परवानगी मिळताच त्यांनी आर्मीची सर्व माहिती मिळवली. प्रथम त्यांना प्रशिक्षणासाठी खडकवासला येथे एक आठवडा जावे लागले. त्यानंतरच त्यांना आर्मीत प्रवेश मिळाला. डेहराडून येथे एक वर्षासाठी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. ते प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर त्यांना सेकंड लेफ्टनंट म्हणून त्यांची नियुक्ती झाली. डेहराडूननंतर त्यांची बदली कश्मीरला मराठा रेजिमेंटमध्ये झाली. 1965 साली कश्मीरमध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात त्यांची उरी पुंछ येथे चिनॉय नदीच्या पुलावर ड्युटी होती. समोरून आलेल्या हल्ल्याला ते जिद्दीने तोंड देत होते. 15 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचे मुंबईचे मित्र मेजर खडपकर त्यांना भेटले. प्रकाश यांची छावणी (तंबू) जळून गेल्याने ते बऱ्याच दिवसात आईला खुशालीचे पत्र पाठवू शकले नव्हते. त्यांनी खडपकर यांना इनलँड आणून देण्याची विनंती केली. पण आईला खुशाली कळवण्याचे त्यांच्या नशिबात नव्हते. अधिकृतपणे युद्धबंदी जाहीर होऊनसुद्धा पाकिस्तानच्या सैनिकांनी बॉम्ब हल्ला केला, ज्यात प्रकाशसोबत अजून एका जवानाला वीरगती प्राप्त झाली.
प्रकाशनारायण यांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव म्हणून माहीममधील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 2015 साली त्यांच्या हौतात्म्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारने 1965च्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचा मरणोत्तर विशेष सन्मान केला. या वर्षी त्यांच्या स्मृतिदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांना मानवंदना देण्यात आली. प्रकाश कोटणीस यांच्या पश्चात फक्त त्यांच्या भगिनी मीरा पंडित आणि त्यांचे कुटुंब असा परिवार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List