माणुसकी मदतीला धावली, कनिष्काच्या उपचारासाठी मुस्लीम समाजाने जमा केले दोन लाख रुपये
अभ्यास करताना इमारतीच्या टेरेसवरून पडून गंभीर जखमी झालेल्या कनिष्का लोभी (14) या मुलीच्या उपचारासाठी मुस्लीम समाज पुढे आला आहे. मशिदीत नमाज पढल्यानंतर या मुलीच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर कनिष्काच्या उपचारासाठी दोन लाख रुपये जमा झाले आहेत. कनिष्काच्या उपचाराचा खर्च तिच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असल्याने दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कनिष्का ही नेरळच्या राजेंद्र गुरू नगर भागात राहते. अभ्यास करत असताना ती इमारतीच्या टेरेसवरून तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला, जबड्याला, कंबरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर परळ येथील ग्लिनिगल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सुरुवातीला २५ लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. मात्र आता हा खर्च ४० लाखांपर्यंत होणार सांगण्यात आल्यानंतर तिच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. इतका खर्च कसा कराचा या चिंतेने तिच्या कुटुंबाला ग्रासले आहे.
प्रवाशी वाहन चालवून उदरनिर्वाह
कनिष्काचे वडील प्रकाश लोभी हे नेरळ-माथेरान दरम्यान प्रवाशी वाहन चालवून घर सांभाळतात. घरात पत्नी आणि इतर लहान मुली, वडील आहेत. त्यांचे उत्पन्न अत्यंत कमी असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List