शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत सर्वोच्च न्यायालय बुधवारपासून अंतिम सुनावणी घेणार आहे. शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. यासंदर्भातील मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांचे खंडपीठ अंतिम युक्तीवाद ऐकून घेणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मुभा दिली होती. आयोगाने 2022 मध्ये दिलेला तो निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती आहे. त्यामुळे आयोगाचा तो निर्णय रद्द करण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकरण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निकाली काढण्यास न्यायालय तयार झाले आहे. त्या अनुषंगाने दाखल केलेल्या अंतरिम अर्जासोबत मूळ याचिकेवर बुधवारपासून अंतिम सुनावणी होणार आहे.
खंडपीठ दोन्ही बाजूकडील अंतिम युक्तीवाद ऐकून घेणार आहे. आवश्यकतेनुसार सलग सुनावणी घेणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी हे प्रकरण अंतिमतः निकाली काढण्यास तयार आहोत, असे खंडपीठाने गेल्याच महिन्यात म्हटले होते.
गद्दार आमदारांची ‘पात्रता’ कळणार
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रकरणाबरोबर गद्दार आमदारांच्या पात्रतेबाबतही सर्वोच्च न्यायालय एकत्रित सुनावणी घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले होते. त्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. त्या अपिलावर देखील न्यायालयाने सुनावणी निश्चित केली आहे. त्यामुळे गद्दार शिंदे गटातील आमदारांच्या ‘पात्रते’चाही लवकरच फैसला होणार असल्याने सुनावणीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List