भाजपने हेलिकॉप्टरवर खर्च केले 30 कोटी रुपये; बिहार निवडणुकीत हवाहवाई प्रचार, नेत्यांची 1200 तास आकाशात राइड्स
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार थंडावला आहे. उद्या 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या दोन टप्प्यांच्या मतदानासाठी भाजप, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससह अन्य पक्षांनी जोरदार प्रचार केला. भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी हवाहवाई प्रचारावर भर दिला. नेत्यांच्या दिमतीला हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड प्लेन होते. भाजपने प्रचारासाठी वापरलेल्या हेलिकॉप्टरवर 30 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. 12 चार्टर्ड प्लेनचा खर्च वेगळा आहे. महागठबंधनने 10 कोटी रुपये हेलिकॉप्टरवर खर्च केले.
पहिल्या टप्प्यासाठी 121 जागांसाठी मतदान पार पडले. या निवडणूक प्रचारावेळी 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत 210 वेळा हेलिकॉप्टरचा आणि खासगी चार्टर्ड प्लेनचा वापर करण्यात आला. बिहार निवडणुकीत दररोज 15 ते 18 वेळा हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला, तर दुसऱ्या टप्प्यात 122 जागांसाठी निवडणूक प्रचारात 1 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत 240 वेळा हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. दिवसाला सरासरी 20 ते 23 वेळा हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. शेवटच्या दिवशी 26 वेळा प्रचार करण्यात आला. निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या 25 हेलिकॉप्टरपैकी 15 हेलिकॉप्टरमधून भाजप नेत्यांनी प्रचार केला, तर जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेस नेत्यांनी प्रत्येकी दोन हेलिकॉप्टरमधून प्रचार केला. लोकजनशक्ती पार्टी, हिंदुस्थानी आवाम मोर्चा (सेक्युलर) यांच्यासह अन्य काही नेत्यांनी एका-एका हेलिकॉप्टरमधून प्रचार केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List