सामना अग्रलेख – या मृत्यूंना जबाबदार कोण?

सामना अग्रलेख – या मृत्यूंना जबाबदार कोण?

मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेबाबत झालेल्या कारवाईविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसण्याला आणि गेंड्याच्या कातडीच्या वरिष्ठ प्रशासनाचे ‘नाक दाबण्या’ला विरोध असण्याचे कारण नाही, मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने नाक दाबले प्रशासनाचे, पण जीव गेले प्रवाशांचे. मुंब्रा येथे जूनमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृत्यूचा दोष रेल्वे कर्मचाऱ्यांना अमान्य आहे. मग गुरुवारी त्यांच्या आंदोलनातून उडालेल्या गोंधळामुळे सॅण्डहर्स्ट रोड स्टेशनजवळ ज्या दोन निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला, त्यासाठी जबाबदार कोणाला ठरवायचे?

उपनगरी रेल्वे सेवा लाखो सामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटली जाते. ते खरेदेखील आहे, परंतु हीच जीवनवाहिनी अनेकदा प्रवाशांच्या दुर्दैवी मृत्यूचेही कारण ठरते. गुरुवारी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन दोन प्रवाशांच्या जिवावर बेतले. इतर तीन प्रवासी इस्पितळात मृत्यूशी झुंज देत आहेत. नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासन या दुर्घटनेचा दोष प्रवाशांवर ढकलून हात वर करेल, परंतु जे घडले त्याची जबाबदारी रेल्वेला कशी टाळता येईल? रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन पुकारले नसते तर लोकल सेवा ठप्प झाली नसती. लोकल बंद पडल्या नसत्या तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मध्य रेल्वेच्या सर्वच स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली नसती. प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत जाण्याचा पर्याय निवडला नसता आणि मशीद बंदर-सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान लोकलने चालणाऱ्या प्रवाशांना उडविण्याची दुर्घटनाही घडली नसती. गुरुवारी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा उद्रेक झाला तो जूनमध्ये मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेवरून झालेल्या कारवाईमुळे. या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. या

प्रकरणाची चौकशी

‘व्हीजेटीआय’ने केली. त्यांच्या अहवालात मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्याच विरोधात रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खदखदत असलेल्या असंतोषाचा गुरुवारी भडका उडाला. मुंब्रा दुर्घटनेची चौकशी, त्यातील निष्कर्ष आणि त्यानुसार रेल्वे पोलिसांनी केलेली कारवाई ‘पक्षपाती’ आहे आणि त्याच्याच विरोधात आपण आंदोलन केले, हे कर्मचाऱ्यांचे म्हणणे वादासाठी मान्य करता येईल, परंतु त्यांनी निवडलेली आंदोलनाची वेळ आणि मार्ग संयुक्तिक कशी म्हणता येईल? आंदोलनासंदर्भात जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार कर्मचारी शांततेत निषेध पत्र वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना देणार होते. मग अचानक ‘काम बंद’ करून लोकल सेवा ठप्प कशी केली गेली? रेल्वे प्रशासन ढिम्म आहे, गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यामुळे ‘टेढी उंगली’ करण्याशिवाय पर्याय नसतो, असे कारण रेल्वे कर्मचाऱ्यांकडून नेहमीच दिले जाते. त्यात नक्कीच तथ्य आहे, परंतु हा अनुभव सर्वसामान्य लोकल प्रवाशांनाही रोजच येत असतो. मध्य रेल्वेची

उपनगरी सेवा पुरती बदनाम

आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांची अनेक दशकांपासून दुरवस्था आहे, परंतु हतबल प्रवाशांना रोजचा त्रास, गर्दीतील रेटारेटी, अकारण होणारा विलंब सहन करीत आला दिवस ढकलण्याशिवाय पर्याय कुठे असतो? रेल्वेचा गलथान कारभार असो की प्रशासन-कर्मचाऱ्यांमधील वाद, दोघांच्या भांडणात सामान्य मुंबईकरच भरडला जातो. याचे उत्तरदायित्व कोणाचे? मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेबाबत  झालेल्या कारवाईविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसण्याला आणि गेंड्याच्या कातडीच्या वरिष्ठ प्रशासनाचे ‘नाक दाबण्या’ला विरोध असण्याचे कारण नाही, मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने नाक दाबले प्रशासनाचे, पण जीव गेले प्रवाशांचे. मुंब्रा येथे जूनमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृत्यूचा दोष रेल्वे कर्मचाऱ्यांना अमान्य आहे. मग गुरुवारी त्यांच्या आंदोलनातून उडालेल्या गोंधळामुळे सॅण्डहर्स्ट रोड स्टेशनजवळ ज्या दोन निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला, त्यासाठी जबाबदार कोणाला ठरवायचे?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement