शिवसेनेची जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांवर धडक; तुटपुंजे पॅकेज नको, शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे!

शिवसेनेची जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांवर धडक; तुटपुंजे पॅकेज नको, शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे!

अतिवृष्टीमुळे राज्यात लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमाफी आणि पीक विम्याचे निकष पूर्ववत करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. घरे, जनावरे, दुकानांच्या नुकसानासाठी मुबलक भरपाई मिळावी यासाठी बळीराजा टाहो फोडत आहे. मात्र सरकारने तुटपुंजे आणि फसवे पॅकेज जाहीर करून शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसली. त्याच्या निषेधार्थ आणि बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आज राज्यव्यापी आंदोलन केले. मराठवाड्यासह सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. 11 ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेचे हे आंदोलन सुरू राहणार असून, केवळ कागदोपत्री मदत दाखवता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती मदत द्या, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

अमरावती जिह्यात पश्चिम विदर्भ संपर्क नेते, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर भगवामय झाला होता. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन एक वर्ष उलटले तरी त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या महायुती सरकारचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. शिवसेना आमदार गजानन लवटे, जिल्हाप्रमुख पराग गुडधे, मनोज कडू, नरेंद्र पडोळे, आसावरी देशमुख, प्रतिभा बूब शेट्टी, अभिजित ढेपे, मनीषा ठेंबरे, ज्योती अवघड, सृष्टी वाघमारे, प्रतिभा बोपसेरी, प्रफुल्ल भोजने, ओमकार ठाकरे, महेंद्र दिपटे, तालुकाप्रमुख प्रमोद धनोकार, कपिल देशमुख, नितीन हटवार, रामदास बैलमारे, दिलीप केणे, प्रमोद कोहाडे, शहरप्रमुख प्रवीण हरमकर, राजू आकोटकर, विजय ठाकरे, बाळा सावरकर, नरेंद्र शेळके, कुचीन पैतवास यांच्यासह शेकडो शिवसैनिक व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

 छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा!

राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी शिवसेनेने केली. यावेळी शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता सरकारने मंगळवारी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अत्यल्प आहे. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही त्याबाबत सरकारने घोषणा केली नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात महायुती सरकारबद्दल प्रचंड संताप निर्माण झाला आहे. तो संताप शिवसेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून व्यक्त झाला. ठाणे, पनवेल, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशीव, सोलापूर, धुळे, बुलढाणा, नांदेड आदी जिह्यांमध्ये मोर्चे, धरणे, रास्ता रोको अशा स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.

धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

धुळे येथे शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शासनाला लाज नाही, त्यामुळेच शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

बुलढाण्यात शेतकरी बांधावरून रस्त्यावर

बुलढाण्यात सरकारी मदत तोकडी असून सरकारने कर्जमुक्तीच्या आश्वासनाची पूर्ती करावी असा आग्रह धरत बुलढाण्यातील शेतकरी शिवसैनिकांसह आज रस्त्यावर उतरला. हेक्टरी 50 हजार मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

नांदेडमध्ये ढोल बजाव आणि रास्ता रोको

नांदेडमध्ये शिवसैनिकांनी निर्दयी महायुती सरकारच्या नावाने ढोल बडवले. तसेच रास्ता रोको करण्यात आला. मराठवाडय़ात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही असे सांगत सरकारला जागे करण्यासाठी नांदेडच्या किनवटमध्ये शिवसैनिकांनीढोल बजावआंदोलन केले.

विम्याची रक्कम शेतकऱयांच्या खात्यात त्वरित जमा करावी  

नागपूरमध्ये हिंगणा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी नागपूरचे संपर्क नेते, शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव,  उपसंपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांच्या नेतृत्वात हिंगणा तहसील कार्यालयात शेकडो शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशा घोषणा देत आंदोलन केले. पीक विम्याचे कठीण निकष पूर्ववत करून विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा, अशा मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल
पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे निश्चितच लावले जातात. पूजेदरम्यान शुद्ध देशी तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले...
नॉनवेज,पिझ्झा-बर्गरपेक्षादेखील हा गोड पदार्थ लिव्हरसाठी असतो सर्वात धोकादायक
माजी आमदार मुन्ना शुक्ला यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक
ये डर अच्छा है! सोन्याचा स्ट्रॉ हरवल्याचे दुःख नाही; बायकोच्या शिक्षेची भीती वाटते…जाणून घ्या घटना
लक्ष लक्ष दिव्यांनी कोकणची दक्षिण काशी उजळली ! कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा