‘माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही’; शूज फेकण्यात आल्याच्या घटनेनंतर सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम

‘माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही’; शूज फेकण्यात आल्याच्या घटनेनंतर सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम

सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने शूज भिरकावला. सुदैवाने तो शूज सरन्यायाधीशांच्या बेंचपर्यंत पोहोचला नाही. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे विचलित न होता, सरन्यायाधीश गवई म्हणाले, ‘अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणारा होणार नाही आणि सुनावणी पुढे सुरू ठेवा’.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीशांनी दिवसाची पहिली सुनावणी सुरू केली असतानाच त्या वृद्ध व्यक्तीने ‘हिंदुस्तान सनातनचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत न्यायाधीशांच्या बेंचच्या दिशेने शूज भिरकावला. न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.

शूज फेकणाऱ्या व्यक्तीकडे सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि क्लार्क यांना दिले जाणारे प्रॉक्सिमिटी कार्ड (proximity card) होते. त्या कार्डवर किशोर राकेश असे नाव आहे. त्याने सरन्यायाधीशांना का लक्ष्य केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि सुरक्षा यंत्रणा अधिक माहितीसाठी त्याची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीशांनी रजिस्ट्रीला त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई न करण्याचे सांगितले आहे.

घटनेच्या वेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या एका वकिलाने सांगितले की सरन्यायाधीश संपूर्ण वेळ शांत होते. ते म्हणाले, ‘अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणारा नाही. कृपया (सुनावणी) पुढे चालू ठेवा’.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ इंदिरा जयसिंग यांनी या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे असे म्हटले आहे. त्यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले, ‘त्या वकिलाचे नाव जाहीर करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हा देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर झालेला जातीयवादी हल्ला असल्याचे दिसते. वैचारिक हल्ले न्यायालय सहन करणार नाही, असे संयुक्त निवेदन जारी करून सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांनी याचा निषेध केला पाहिजे. न्यायालयाच्या प्रतिष्ठेनुसार, सरन्यायाधीश गवई यांनी कोणताही व्यत्यय न येऊ देता आपले न्यायिक कार्य सुरू ठेवले’.

ही घटना सरन्यायाधीशांच्या भगवान विष्णूंबद्दलच्या एका टिप्पणीनंतर घडली आहे. ‘जागतिक वारसास्थळ’ खजुराहो मंदिर संकुलाचा भाग असलेल्या जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीचे पुनर्निर्माण करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. हे प्रकरण कोर्टाच्या नव्हे, तर पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकारक्षेत्रात येते असे नमूद करताना, ‘तुम्हीच भगवान विष्णूंकडे जा आणि त्यांच्याकडेच न्याय मागा’, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी याचिकाकर्त्याला सुनावले होते.

मी सर्वधर्मांचा आदर करतो! – सरन्यायाधीश

या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती, अनेकांनी त्यांच्यावर भगवान विष्णूच्या भक्तांच्या श्रद्धेचा अनादर केल्याचा आरोप केला. नंतर सरन्यायाधीश म्हणाले, ‘परवा कोणीतरी मला सांगितले की मी केलेल्या टिप्पणीला सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List