नवरात्र दहावा दिवस – अष्टसिद्धींची अधिष्ठात्री असणाऱ्या सिद्धिदात्री देवीचे जाणून घ्या स्वरूप; अशी आहे महती…
सिद्धिदात्री देवी ही नवदुर्गांपैकी एक असून ती नववी देवी आहे. यंदा 10 दिवस नवरात्र असल्याने यंदा दहाव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करण्यात येणार आहे. सिद्धिदात्री देवी हे महाशक्तीचे नवदुर्गांपैकी नववे स्वरूप आहे. ही देवी अष्टसिद्धीची अधिष्ठात्री देवी आहे. या देवीच्या उपासनेने दैवी आणि अष्टसिद्धी सिद्धी प्राप्त होतात, असी मान्यता आहे.
सिद्धीदात्री देवीच्या नावाचा अर्थ ‘सिद्धी देणारी’ असा असून, ती अलौकिक शक्ती, अष्टसिद्धी, नवनिधी, बुद्धी आणि विवेक प्रदान करते असे मानले जाते. चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातात कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन चक्र असते आणि ती कमळावर विराजमान असते. सिद्धिदात्री देवी सर्व सिद्धींची अधिष्ठात्री आहे. ती उपासकाला अष्टसिद्धी आणि नवनिधी प्रदान करते. तिच्या उपासनेमुळे मोक्षप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. ती बुद्धी आणि विवेकाची प्राप्ती करून देते, असेही मानले जाते. देवीच्या शरीराचा एक भाग शिवाचा आहे, म्हणून तिला अर्धनारीश्वर असेही म्हणतात. तसेच ही देवीचे पूर्णरुप असून तिला नवदुर्गा असेही म्हणतात. काही पैरीणीक कथांनुसार या देवीची पूजा करून शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या, असे सांगितले जाते.
सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रुप मानले जाते. सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता आहे. नवरात्रात मनोभावे पूजन केल्यास सिद्धिदिनी देवी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे. नवरात्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच महानवमीला सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सिद्धिदात्री देवीची षोडशोपचार पूजा करावी. यावेळी देवीला नवरसयुक्त नैवेद्य दाखवावा. तसेच नऊ प्रकारची फुले देवीला अर्पण करून नवरात्राची सांगता करावी, असे सांगितले जाते. देवीला फळे, साखर-फुटाणे, पुरी, काळे चणे, खीर आणि श्रीफळ अर्पण करावे, असे सांगितले जाते.
नवरात्रातील सिद्धिदात्री देवीचे पूजन महत्त्वाचे मानले गेले आहे. दुर्गा देवीच्या या स्वरुपाचे पूजन केल्यास अनेक सिद्धी तसेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो, अशी मान्यता आहे. देव, यक्ष, किन्नर, दानव, ऋषि-मुनी, साधक आणि भाविक सिद्धिदात्री देवीचे पूजन करतात. देवीच्या पूजनाने यश, बल आणि धन प्राप्ती होते, असे म्हटले जाते. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे सांगितले जाते. तसेच नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिका पूजनही करण्यात येते. या दिवशी कुमारिकांचे मनोभावे पूजन, मान-पान करावे आणि नवरात्राच्या विशेष व्रताची सांगता करावी, असे सांगितले जाते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List