Latur News – निलंगा तालुक्यातील रोपवाटिकेत एक कोटीचा भ्रष्टाचार, माहिती अधिकारातून बाब उघड
निलंगा तालुक्यातील रोपवाटीकांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विभागीय वनपरीक्षेत्र कार्यालय (विशेष कार्य) लातूर अंतर्गत येणाऱ्या लांबोटा, केदारपूर, हालसी, टाकळी भंगार, चिंचोली, पालापूर, तांबाळा, ममदापूर, कासार बालकुंदा व कासार सिरसी या रोपवाटीकांसाठी 18 महिन्यांच्या कालावधीत (30 जून 2023 ते 1 जानेवारी 2025) 24 लाख रुपये प्रति रोपवाटीका इतके बजेट मंजूर झाले होते.
शासन नियमानुसार या 24 लाखांत 16 लाख अकुशल मजुरीसाठी तर 8 लाख कुशल कामांसाठी राखीव होते. प्रत्यक्षात मात्र फक्त मजुरीवरच खर्च केला गेला, तर कुशल कामांसाठी असलेले 8 लाख रुपये कुठे गेले याबाबत माहिती नाही.
माहिती अधिकारातून मागवलेल्या कागदपत्रांनुसार, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी हे बजेट “साहित्य खरेदीसाठी” वापरल्याचा दावा केला. मात्र एमआरजीएस पोर्टलवरील नोंदी व प्रत्यक्ष तपासणीतून दिसून आले की रोपवाटीकांमध्ये कुठलेही साहित्य पोचवलेले नाही. उलट, रोपवाटिकेबाहेरील साफसफाई, गवत काढणे, घनवन लागवड यांसारखी कामेही रोपवाटीकेतील मजुरांकडून करून घेऊन त्याचे बजेट अधिकाऱ्यांनीच लाटल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते रानबा कावाले यांनी उघडकीस आणले. या प्रकारामुळे निलंगा तालुक्यातील रोपवाटीकांमध्ये एक कोटी रुपयांहून अधिक भ्रष्टाचार झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List