राहुल गांधींनी मतचोरी उघडी पाडून भाजपचा बुरखा फाडलाय, त्यांचं ढोंग-सोंग उघडं पाडलंय! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

राहुल गांधींनी मतचोरी उघडी पाडून भाजपचा बुरखा फाडलाय, त्यांचं ढोंग-सोंग उघडं पाडलंय! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

मुंबईत दादरमध्ये श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघात केला. जे जिंकले त्यांनी मतचोरी कशी केली? हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे. यांचा बुरखाच फाडलेला आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

मुंबई शिक्षक मतदारसंघातून आपल्या हक्काचा शिवसेनेचा आमदार आपण सगळ्यांनी मेहनत करून निवडून दिला. आज त्यांच्या कार्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. आणि कार्याचा अहवाल ज. मो. अभ्यंकरसाहेब प्रकाशित करताय. मला नाही वाटत यापूर्वी कधी शिक्षक मतदारसंघातल्या आमदाराने त्याचा कार्याचा अहवाल प्रकाशित केला असेल. आपल्या लोकप्रतिनिधीने आपल्या कार्याचा अहवाल प्रकाशित करावा हा दंडक शिवसेनाप्रमुखांचा आहे. आपले नगरसेवक, आमदार, खासदार सगळेच जण आपण गेल्या वर्षी काय-काय केलं. नाहीतर असं होतं की निवडणुकीत वारेमाप आश्वासनं दिली जातात. आणि पाच वर्षांनी तीच आश्वासनं नव्या नावानं पुन्हा दिली जातात. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं तसं नाही. जर तुम्ही एखादं काम करणार असाल तरच बोला आणि जे बोलाल ते करून दाखवा आणि त्यानुसार अभ्यंकरसाहेब तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या त्या शिस्तीला जागून आपल्या पहिल्या वर्षाचा कार्यअहवाल प्रकाशित करताय. अहवाल पूर्ण भरलेला आहे. पोकळपणा त्याच्यात काही नाही. अगदी पुराव्यानिशी अहवाल आहे. कारण त्याच्यामध्ये फोटो आहेत, असे कौतुक उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

“आपली उंची हिमालयाची असली तरी जिगर सह्याद्रीची आहे”

तसा मी विधिमंडळात फार कमी जातो. पहिल्यांदा मुख्यमंत्री होतो तेव्हा दोन्ही सभागृहात मला येता-जाता यायचं. आता मंत्रीपद नाहीये. आणि परिषदेचा सदस्य आहे. त्याच्यामुळे मी आणि अभ्यंकरसाहेब एका सभागृहातले. मी जास्त बोलत नाही. पण अभ्यंकरसाहेब ज्या-ज्या वेळेला बोलतात तेव्हा मुद्देसूदपणे आणि प्रशासकीय अनुभव असल्यामुळे कोणता जीआर कधी काढला हे बरोबर माहिती आहे. वर्मावर कसं बोट ठेवायचं हे त्यांना अगदी अचूक माहिती आहे. समोरच्या मंत्र्याला थातूरमातूर उत्तरं देता येत नाही. प्रशासकीय कारकीर्द झाल्यानंतर अनेकजण असे असतात की लोकप्रतिनिधी होता किंवा काहीतरी एखादं पद भूषवतात. जाऊ दे ना मला काय करायचंय? आजचा आला दिवस गेला दिवस मला काय फरक पडतोय. पण तसं नाही, त्यांनी संपूर्ण तो जो काही अनुभव आहे तो पणाला लावून शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत. असा कोणताही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. फक्त उत्तर देण्याच्या अवस्थेत दुर्दैवाने किंवा नाइलाजाने नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता तुम्ही सांगितल ना की, प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला उद्धवजी ठाकरे हिमालयासारखे पाठी उभे असतात. हिमालयासारखा जरूर आहे पण तेवढा थंड नाहीये. आपलं म्हणजे उंची हिमालयाची असली तरी जिगर सह्याद्रीची आहे. नाहीतर उगाच महाराष्ट्र गीत गायचं आपण? काळ्या छाती वरी कोरीली अभिमानाची लेणी… ही तशी ती वाक्य आपल्या महाराष्ट्राचं वर्णन आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“गुरू म्हणजे तुमच्या घरातला गुरं नाही” 

शिक्षकांचं काम फार महत्त्वाचं आहे, विद्यादान… पण त्याच्यासाठी स्वतःला सुद्धा काही ना काहीतरी विद्या तुम्हाला घ्यावी लागते. आणि मग ती तुम्हाला द्यावी लागते. त्या विद्येच्या देण्या आणि घेण्यामध्ये तुम्हाला खरंच किती वेळ मिळतो? कारण पूर्वी वृत्तपत्रात बातम्या यायच्या, तेव्हा आपली शिक्षक सेना नव्हती. पण जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांना गहू आणि तांदूळ सुद्धा निवडायला लावायचे. आता निवडायला लावतात की नाही काही कल्पना नाही. पण नको ती कामं, म्हणजे कलेक्टरसुद्धा उद्या तुम्हाला वाट्टेल ती कामं सांगायला लागला तर मला असं वाटतं त्यांचे सगळे आदेश घेऊन या आपण त्याची जाहीर होळी करू. कारण आम्ही वेडंवाकडं काम करणार नाही. ज्याना गुरूदेव भवं असो म्हणतो तो गुरू म्हणजे तुझ्या घरातलं गुरं नाहीये की कसंही हाकावं आणि कसंही राबतोय. एवढा काही शिक्षकाचा दर्जा हा खालावलेला नाही. शिक्षणाचा दर्जा आपल्याला वाढवायला पाहिजे.

सोयीच्या प्रभाग रचनांसाठी मिंधे गट, भाजप कोणत्याही थराला जावू शकतात; संजय राऊत यांचा हल्लाबोल

“महाराष्ट्रामध्ये तुमच्या आजूबाजूला दंभांचा मेळा, सगळे ढोंगी”

आज सर्व भाषेतले शिक्षक इकडं आलेत. उर्दू, मराठी, हिंदीचे आणि इतर अनेक भाषांचे असतील. आपण शिक्षणाच्या दर्जावरती लक्ष देण्याच्या ऐवजी भाषेच्या सक्तीवरती का लक्ष देत आहोत. शिक्षणाचा दर्जा वरती करा. आमचा कोणत्याही भाषेला विरोध किंवा आमचा द्वेष नाहीये. पण सक्ती कशासाठी पाहिजे? मध्ये मी दिल्लीत गेलो होतो तेव्हा हा प्रश्न मला अपेक्षित होताच, हिंदी का विरोध क्यों कर रहे है? विरोध करत नाहीये. जबरदस्ती आम्ही स्वीकारणार नाही. आणि ज्याला जी पाहिजे ती भाषा तो शिकतोच. हा प्रश्न मला हिंदी पत्रकाराने विचारल्यानंतर मी हिंदीत त्याला उत्तर देत होतो. मी त्याला म्हटलं आता हे उत्तर तुला कोणत्या भाषेत दिलेलं आहे? हिंदी. मग माझी हिंदी कळतेय ना तुला? तो बोलला होता. पण मला पहिलीपासून हिंदी सक्तीची नव्हती. तरीपण दुसऱ्याला समजवू शकतो एवढी मला हिंदी येते. आता माझ्याही पेक्षा जास्त चांगले आपले पंतप्रधान बोलतात. आता ते कोणत्या शाळेत शिकले? त्यांना पहिलीपासून हिंदी सक्तीची होती का? पण थापा नाही, आश्वासनं देण्यापुरती तरी हिंदी त्यांना येते की नाही? मी काही खोटं बोललो का? कालच ते बिहारमध्ये गेले. बिहारमध्ये बाजूला नितीशकुमार. तिकडे आपले पंतप्रधान म्हणाले की, विरोधक म्हणजे महाविकास आघाडी कींवा इंडिया आघाडी हे भ्रष्टाचाऱ्यांना आणि घुसखोरांना रक्षण देण्यासाठी, त्यांच्या बाचव करण्यासाठी म्हणून पुढे आलेले आहेत. मला पंतप्रधानांना सांगायचं आहे की, तुम्ही महाराष्ट्रामध्ये याल तेव्हा तुमच्या आजूबाजूला जो दंभमेळा आहे, कुंभमेळा वेगळा, हा दंभमेळा दंभाचा… सगळे ढोंगी. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, ते तुम्हीच केलेलेत. 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप तुम्हीच केलेला. तिकडे आदर्श घोटाळ्याचा आरोपही मोदीजींनीच केला. आणि दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण बाजूला. मग कोण कोणाला रक्षण करतंय? आणि घुसखोरांना म्हणजे कोणाला नक्की करताय तुम्ही? आम्ही कोणाला घुसखोरांना ठेवतोय घरात? शेख हसिनाला तुम्हीच आश्रय दिला, आम्ही नाही. बांगलादेश यांना विरोध करतंय आणि त्यांच्या तिकडनं पळून आलेल्या पंतप्रधानांना तुम्ही आश्रय देताय आणि आम्हाला सांगताय घुसखोरांचं रक्षण तुम्ही करताय. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना उपमुख्यमंत्रीपद बाकीची पदं, मंत्रीपदं ही तुम्ही देताय, असे म्हणत उद्धव ठाकरे बरसले.

मला खरोकर कीव येते, पण कोणाची करायची? गेल्या वेळच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मी जेव्हा गाडीतनं उतरत होतो तेव्हा शाळेतल्या विद्यार्थ्यांना गॅलरीत कामकाज पाहण्यासाठी आणतात. आणि ती मुलं बाहेर पडत होती. कोणाचाही चेहरा असा हसरा नव्हता. सगळे असे धक्कादायक अवस्थेमध्ये होते. कारण तिकडे ते काय बघून आले होते, देव जाणे. तरी नशिब त्या दिवशी संध्याकाळी विधानभवनाच्या लॉबीमध्ये मारामारी झाली. विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवताय? कशाला नेताय तुम्ही तिकडे? असे काय तुम्ही तुमच्या अकलेचे दिवे पाजळताय, ज्याच्यातनं विद्यार्थी चांगलं शिकतील? आपल्या राज्याच्या विधिमंडळात उद्याचे भावी आधारस्तंभ असलेली मुले ही आताची आधारस्तंभ बघतायेत कसे हे एकमेकाच्या उरावरती बसतायेत, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

पाणी, व्यवहार बंद केले, मग पाकिस्तानशी क्रिकेट कशासाठी? भाजप समर्थक सट्टेबाजांसाठी? संजय राऊत कडाडले

“पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायला परवानगी देताय, मग त्या गरम सिंदूरचं आता काय कोल्ड्रिंक झालं?”  

कबुतरांसाठी हजारोंच्या संख्येने लोकं रस्त्यावरती उतरतात, चांगली गोष्ट आहे. कुत्र्यांसाठी हजारोंच्या संख्येने उतरतात, चांगली गोष्ट आहे. हत्तीणीसाठी उतरतात, चांगली गोष्ट आहे. माणूसकी पाहिजे, भूतदया पाहिजे. पण ही भूतदया ही माणूसकी पहेलगाममध्ये आपले नागरीक मारले गेले, जे सैनिक शहीद झाले, ज्या आपल्या माता-भगिनींचा सिंदूर पुसला गेला… त्या सिंदूरसाठी आपली माणूसकी कुठे जाते. अजून दोन ते तीन महिनेही नाही झाले. पहलगाममध्ये ही घटना घडली त्याच्यानंतर संरक्षणमंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर अबतक रूका नही है ओ चालूही रहेगा. मग आपले पंतप्रधान म्हणाले खून और पानी एकसाथ बह नही सकता. मेरे रगो मे खून नाही गरम सिंदूर बह रहा है. मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? गेला कुठे तो गरम सिंदूर? पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय? आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार. मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता? तो सिंदूर गेला कुठे? कशा या भाकड कथा करताय तुम्ही? तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी, श्रेय घेतायेत हे. सोफिया कुरेशी आपल्या सैन्याच्या महिला अधिकारी त्यांना सुद्धा हे भाजपवाले गधडे आतंकवाद्यांची बहीण म्हणेपर्यंत यांची मजल गेली. तरी सुद्धा डोक्यावरती मंत्री म्हणून बसलेत. लाज वाटत नाही या लोकांना देशभक्तीचं थोतांड गाताना, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या देशभक्तीचा समाचार घेतला.

“जर नेत्यालाच चांगला गुरू नाही मिळाला तर, तो नेता तुमचं नेतृत्व तरी काय करणार”

देशापेक्षा तुम्हाला अमित शहाचा पोरगा क्रिकेटचा अध्यक्ष आहे म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जय शहासाठी? कोण आहे जय शहा? तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते आपले नागरिक मारले गेले त्यांच्या पेक्षा हा मोठा आहे? त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठं आहे? मग आपल्याला शिकवतात, खून आणि पानी एकत्र नाही, खून आणि क्रिकेट कैसे बह सकता है साथ मे? क्रिकेटचा चेंडूसुद्धा लालच असतो, रक्तसुद्धा लालच असतं. पण आम्हाला खेळ महत्त्वाचा वाटतोय, देश महत्त्वाचा वाटत नाही, हेच तर आपल्या देशाचं दुर्दैवं आहे. आणि असेच हे बोगस जनता पक्षाचे लोकं हे आपल्या डोक्यावरती घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे. ही बोगस जनता पार्टी आहे. जर का आपण ठणकावून सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशामध्ये घुसखोर पाठवायचं थांबवत नाही, जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये दहशतवादी पाठवण्याचं आणि आतंकवादी हमले थांबवत नाही तोपर्यंत कोणताही मोठा खेळ असो आम्ही पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही, आम्ही त्याचा तुकडा पाडतो. सांगा ना, धमक दाखवा? 1980 सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली देशांनी बहिष्कार टाकला होता. रशिया अफगाणिस्तानमध्ये घुसली होती म्हणून अमेरिका आणि तिच्या नेतृत्वाखाली काही देशांनी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता. त्याच्या पुढच्या ऑलिम्पिकमध्ये लॉस एंजेलिसला झालं त्याच्यावरती रशियाने बहिष्कार टाकला. 2022 मध्ये काही देशांनी चीनमधल्या विंटर ऑलिम्पिकवरती राजनैतिक बहिष्कार टाकला होता. दाखवा ना तुम्ही देश म्हणून काहीतरी एक ठाम आहात. एकदा सांगायचं की पाकिस्तान जो आपल्या विरुद्ध लढतोय आम्ही पाकिस्तान जिंकलचं. रावळपिंडी, कराची, लाहोरवरती बॉम्ब टाकले, अभिमान वाटला आम्हाला. सैन्याचा अभिमान वाटतोय आम्हाला. पण त्या वेळेला जी दुसरी माहिती आली की पाकिस्तानने जो प्रतिकार केला त्या प्रतिकारामध्ये त्यांच्यासोबत चीनसुद्धा होता. मग पाकिस्तान शत्रू आहे की नाही? चीन हा शत्रू आहे की नाही? कारण पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला जाताय. चीनमध्ये तर आता मोदी आणि डोवल जाऊन येताय. मग नक्की आम्ही नागरिकांनी काय करायचं? पाकिस्तानचा निषेध करायचा, चीनचा निषेध करायचा? हे सगळं न शिकल्याचे परिणाम आहेत. हे जर का शाळेत गेले असते तर यांना तिकडे चांगले शिक्षक मिळाले असते तर पहिली देशभक्ती काय आहे? हे त्यांना कळलं असतं. कारण आयुष्यामध्ये चांगला गुरू, गुरू म्हणजे आयुष्य घडवत असतो आपलं. जर नेत्यालाच चांगला गुरू नाही मिळाला तर तो नेता तुमचं नेतृत्व तरी काय करणार, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या”

तुम्ही जे आता म्हणालात, तुमच्या हातात निवडणुकीचं काम आहे. पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या. हजेरीपट घेऊन बसा. आणि कोण डबल-डबल हजर झालेत, अरे तू दोनदा कसा हजर झालास? आता हे जे काही सगळं चाललंय. कारण यांनी लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तर हे जिंकूच शकत नाही. अजिबात जिंकू शकत नाही. आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही. जे जिंकले त्यांनी मतचोरी कशी केली? हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे. यांचा बुरखाच फाडलेला आहे. ढोंग उघडं पाडलेलं आहे, सोंग उघडं पाडलेलं आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट