दर्शनासाठी जाताना टेम्पो आणि ट्रेलरची समोरासमोर धडक, 6 भाविकांचा मृत्यू; 14 जखमी
दर्शनासाठी चाललेल्या भाविकांचा टेम्पो आणि भरवधाव ट्रेलरची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 125 वर बालेसर जवळील खारी बेरी गावाजवळ रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घडली. मृत आणि जखमी सर्व गुजरातमधील बनासकांठा आणि धनसुरा भागातील रहिवासी होते आणि रामदेवरा येथे दर्शनासाठी जात होते.
टेम्पोमध्ये 20 भाविक होते. पहाटेच्या सुमारास, वाहन खारी बेरी गावातून जात असताना, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वेगवान ट्रेलरने टेम्पोला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तीन महिलांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतदेह बालेसर सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सर्व जखमींना स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना जोधपूरच्या एमडीएम रुग्णालयात पाठवण्यात आले.
ट्रेलर अतिवेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात घडला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ट्रेलरमध्ये धान्याच्या पोती भरलेली होती. अपघातानंतर रस्त्यावर धान्याची पोती विखुरली गेल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List