नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन, पंतप्रधानांनी दि.बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केलीच नाही; डिसेंबरपासून विमान उड्डाण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन, पंतप्रधानांनी दि.बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केलीच नाही; डिसेंबरपासून विमान उड्डाण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पंतप्रधानांच्या विमानाने दुपारी तीनच्या सुमारास विमानतळावर लँडिंग केले. सायंकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी विमानतळासह मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक 3 चा अंतिम टप्पा या प्रकल्पाचे लोकार्पण केले. विमानतळाचे उद्घाटन झाले असले तरी प्रत्यक्षात प्रवासी आणि मालवाहतूक विमानसेवा ही येत्या डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मोदी आज या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करतील अशी अपेक्षा होती; परंतु वीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी दि. बा. पाटील यांचा ओझरता उल्लेख केला, पण त्यांच्या नावाची कोणतीही घोषणा केली नाही.

गेल्या वर्षभरापासून उद्घाटनाची तारीख आणि लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सतत चर्चेत आहे. आज अखेर पंतप्रधान मोदींच्या हस्ते या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या विमानतळाचे प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी भूमिपुत्रांचे अनेक मोर्चे निघाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत बैठका झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळासाठी दि.बां.च्या नावाचा एकच प्रस्ताव असल्याने त्यांचेच नाव या विमानतळाला मिळेल तसेच केंद्र सरकार त्याला अनुकूल आहे असे सांगितले. त्यामुळे आज विमानतळाचे उद्घाटन करताना या प्रकल्पाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले जाईल अशी पंतप्रधान घोषणा करतील याकडे सर्वांचेच डोळे लवले होते. मात्र आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या कार्याचा फक्त ओझरता उल्लेख केला. मात्र त्यांचे नाव या विमानतळाला देण्याबाबत कोणतीही सुतोवाच मोदी यांनी केले नाही. त्यामुळे भूमिपुत्रांची निराशा झाली.याप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, रामदास आठवले, वनमंत्री गणेश नाईक, आशिष शेलार आदी उपस्थित होते.

आंध्रच्या मंत्र्यांचे मराठीत भाषण

केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू हे आंध्र प्रदेशातील आहेत. मात्र त्यांनी आज नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात मराठीमध्ये भाषण केले. हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातील अनेक नागरिक स्वताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्ननगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहरात येतात. अनेकजण विदेशात जाण्यासाठी याच शहरातून गरुडझेप घेतात. त्या सर्वांच्या स्वप्नांना भेट देणाऱ्या एका अमूल्य भेटीचे आज लोकार्पण होत आहे, असे नायडू मराठी म्हणाले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मुंबई शहर आशियातील हवाई कनेक्टिव्हिटी हब

मुंबई शहराला आता दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. त्यामुळे मुंबई हे आशिया खंडातील सर्वात मोठे कनेक्टिव्हिटी हब बनले आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले. नवी मुंबई विमानतळ संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच, देशात 2014 पूर्वी फक्त 74 विमानतळ होते ते आता 107 पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे देशांतर्गत हवाई सेवा देणारा हिंदुस्थान जगात तिसऱया क्रमांकाचा देश ठरला आहे असेही मोदी यांनी सांगितले. यावेळी नेहमीप्रमाणे मोदी यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसवर आरोप केला.

दिबांचे पुत्र अतुल पाटील म्हणाले, वाईट वाटतेय

दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची प्रतिक्रिया माध्यमांनी विचारली असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात दिबांचा उल्लेख केला.. पंतप्रधानांनीही केला, पण भाषणात दि.बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल असा उल्लेख होईल असे वाटत होते, पण ते झालेच नाही. याबद्दल वाईट वाटतेय अशी प्रतिक्रिया अतुल पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. पुढची तीन महिने वाट पाहूया, असेही ते म्हणाले.

कफ परेडपर्यंत मेट्रो

मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक तीन अंतिम टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे मेट्रो आता थेट कफ परेडपर्यंत धावणार आहे. मेट्रोमुळे रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण कमी होणार आहे. भुयारी मेट्रोचे काम करताना मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना धक्का लागला नाही. मेट्रोचा शेवटचा टप्पा सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना आता आरेपासून ते कफ परेडपर्यंत प्रवास करता येणार आहे, असे ते यावेळी म्हणाले.

हवाई चप्पल घालणारा हवाई प्रवास करणार

सरकारने फक्त देशात विमानतळांची निर्मितीच केली नाही, तर उड्डाण योजनाही सुरू केली आहे. त्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. विमान प्रवासाचा पर्याय सहज उपलब्ध झाल्यामुळे आता हवाई चप्पल घालणाराही हवाई प्रवास करणार आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.

तिसरा विमानतळ वाढवण बंदराजवळ

वाढवण बंदराची वेगाने उभारणी सुरू आहे. त्यामुळे वाढवण बंदराच्या परिसरातही तिसरा विमानतळ मुंबईसाठी उभा करण्यात येईल असे मोदी यांनी स्पष्ट केले. यावेळी आयटीआय आणि तांत्रिक माध्यमिक विद्यालयांमध्ये रोजगारक्षम कार्यक्रम या उपक्रमाचेही अनावरण झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ही’ आसने करा अन् डोकेदुखीला दूर पळवा, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय ‘ही’ आसने करा अन् डोकेदुखीला दूर पळवा, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय
तुमच्यापैकी अनेकजण डोकेदुखीने त्रस्त असाल. काही लोक डोकेदुखीकडे दुर्लक्ष करत असतात, मात्र हे मायग्रेन किंवा हाय ब्लड प्रेशर या गंभीर...
संजय गांधी नॅशनल पार्कात हिट अँड रन, दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
IND W Vs NZ W – दिवाळी धमाका; स्मृती आणि प्रतिकाने न्यूझीलंडला फोडून काढलं, खणखणीत शतके आणि ऐतिहासिक भागीदारी
बिहारनंतर पाच राज्यांत होणार SIR, निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू
IND W Vs NZ W – टीम इंडियाची धुवांधार फटकेबाजी सुरू असतानाच पावसाची हजेरी, सामना थांबला
तेजस्वी यादव महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, पाटण्यात झाला एकमुखी निर्णय
अमेरिकेत हिंदुस्थानी ट्रक चालकाने अनेक गाड्यांना उडवलं, तिघांचा मृत्यू; घटनेचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद