पती, पत्नी और वो…पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचला…पण अघटित घडले…
गेल्या मंगळवारी कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील इंडी शहरात एक हृदयद्रावक घटना घडली. येथे एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्याचा कट रचला. मध्यरात्री त्याचा गळा दाबून त्याची हत्या करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, कूलरच्या आवाजामुळे आणि घरमालकाच्या सतर्कतेमुळे तिच्या पतीचा जीव वाचला. मात्र आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली पण तिचा सहआरोपी असणारा तिचा प्रियकर फरार झाला. आता त्याचाच मृतदेह सापडल्याने या प्रकरणातील गुंता अधिक वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा असे आरोपी महिलेचे नाव असून सिद्धप्पा हे तिच्या प्रियकराचे नाव आहे. तर बीरप्पा मयप्पा पुजारी असे तिच्या पतीचे नाव आहे. दरम्यान सुनंदाचा प्रियकर फरार झाल्यानंतर त्याने एका अज्ञात ठिकाणाहून एक व्हिडिओ शेअर केला. आणि यामध्ये त्याने या संपूर्ण प्रकरणासाठी सुनंदाला दोषी ठरवले आहे. या सुनंदाच्या नवऱ्याच्या हत्येचा कट तिनेच रचला होता. मी सुनंदामुळेच अडकलो आहे, असे त्याने व्हिडीओमध्ये म्हटले. यानंतर बुधवारी इंडी तालुक्यातील अंजुतगी गावाच्या बाहेरील बाजूस सिद्धप्पाचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घडनास्थळावर धाव घेतली. आता पोलिसांना सिद्धप्पाने आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. परंतु त्याने केलेले आरोप, अवैध संबंध आणि हत्येचा कट यामुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. त्यामुळे सध्या पोलीस या प्रकऱणाचा सखोल तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List