सहकलाकार नदीत पोहायला उतरला अन् थेट वाहून…; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शुटींग
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची सध्या खूप चर्चा सुरु आहे. रितेश देशमुखचे सेटवरचे बरेचसे फोटो देखील व्हायरल झाले होते. पण सेटवर मंगळवारी 22 एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना घडली. मंगळवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास युनिटमधील एक ज्युनियर आर्टिस्टचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटादरम्यान धक्कादायक घटना
या चित्रपटाचे शूटिंग सध्या साताऱ्यातील संगम माहुली मंदिर परिसरात सुरू होते. शूटिंग संपल्यानंतर सिनेमातील काही आर्टिस्ट्स जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची घटना घडली. संबंधित तरुणाचे नाव सोरभ शर्मा असून तो या सिनेमात डान्स आर्टिस्ट म्हणून काम करत होता. याप्रकरणी चित्रपटाची निर्मिती संस्था मुंबई फिल्म कंपनीने निवेदनही जारी केलं आहे. त्यांनी संबंधित कलाकारासोबत घडलेल्या घटनेस दुजोरा दिला आहे. तसेच या धक्कादायत घटनेनंतर रितेशनेही काही काळासाठी चित्रपटाचं शुटींग थांबवलं आहे. या तरुणाला शोधण्याचं काम रेस्क्यू टीमकडून अद्याप सुरु आहे. दरम्यान या घटनेनंतर रितेश देशमुख आणि त्याच्या मुंबई फिल्म कंपनीने शुटींगचं काम थांबवलं आहे.
रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या निवेदनात काय म्हटलं आहे ते पाहुया.
मुंबई फिल्म कंपनीचं अधिकृत निवेदन
“अत्यंत खेदाने शूटींग दरम्यान घडलेल्या घटनेला आम्ही दुजोरा देत आहोत. संगम माहुली मंदिर, सातारा इते आमच्या आगामी चित्रपटाचं शूट सुरु असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांचं शूटिंग निर्विघ्न पार पडलं होतं. दुसऱ्या दिवशीचं पॅकअप झाल्यानंतर, सगळे हॉटेलकडे परतण्याच्या तयारीत असताना काही आर्टिस्ट्स जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. यामध्ये आमचा डान्स आर्टिस्ट सौरभ शर्मा हा देखील होता आणि दुर्दैवाने तो नदीपात्रात बुडाला.
सदर बातमी समजताच, तातडीने अभिनेता – दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्मात्या जिनेलिया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले. सौरभ ह्यांना शोधण्यासाठी विनाविलंब स्थानिक पोहणाऱ्यांची मदत घेण्यात आली आणि लगेच चित्रीकरणाच्या ड्रोनचा शोधकार्यासाठी वापर करण्यात आला. देशमुख यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील आणि इतर संबंधित यंत्रणाशी संपर्क साधून शोधमोहीम वेगवान करण्याची विनंती केली.
शोधकार्य अजुनही सुरु आहे. आम्ही ह्या शोधकार्यात संपूर्ण सहकार्य करीत आहोत. सौरभच्या कुटुंबीयांशी आम्ही सतत संपर्कात आहोत आणि त्यांना संपूर्ण मदत करत आहोत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील शूटिंग आम्ही स्थगित केलेलं आहे. – मुंबई फिल्म कंपनी. “
सौरभचे शोधकार्य सुरु आहे
मुंबई फिल्म कंपनीची ही इन्स्टाग्राम पोस्ट बघितल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सौरभ लवकर सापडावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. सातारा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते पुढील कारवाई करत आहेत. संगम माहुली नदीमध्ये भोवरा आहे. या भोवऱ्यामुळे आजपर्यंत अनेकांचा जीव गेला असल्याचं सांगितलं जातं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List