Pahalgam Attack: ‘एकसुद्धा निर्दोष व्यक्तीला मारणं म्हणजे..’; पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर सलमानची प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम इथल्या मंगळवारच्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरावरून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होत आहे. पहलगाममधील बैसरन याठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या हल्ल्याचा शोक व्यक्त केला. अभिनेता सलमान खाननेही सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. पृथ्वीवरील स्वर्ग मानला जाणारा काश्मीर नरकात बदलतोय, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. सलमानसोबतच शाहरुख आणि आमिर खाननेही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केलाय.
सलमान खानची पोस्ट-
‘काश्मीर.. पृथ्वीवरील स्वर्ग नरकात बदलतंय. निरपराध लोकांना लक्ष्य केलं जातंय. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. एकसुद्धा निर्दोष व्यक्तीला मारणं हे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखं आहे,’ अशी पोस्ट सलमानने लिहिली आहे.
शाहरुख खाननेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ‘पहगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवीय हिंसाचाराबद्दलचं दु:ख आणि संताप शब्दांत व्यक्त करता येत नाही. अशा वेळी आपण फक्त देवाकडे पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो. मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. एक राष्ट्र म्हणून आपण एकजूट, मजबूत उभं राहूया आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवूया’, अशी त्याने पोस्ट लिहिली.
Kashmir,heaven on planet earth turning into hell. Innocent people being targeted, my heart goes out to their families . Ek bhi innocent ko marna puri kainath ko marne ke barabar hai
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 23, 2025
दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरत पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्यास भारताने सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस बैठकीत 1960 च्या ‘सिंधू जल करारा’ला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय उच्चायुक्तालयातील कर्मचारी घटविण्यापासून सीमा बंद करण्यापर्यंत अनेक कठोर निर्णय यावेळी घेण्यात आले.
पाकिस्तानविरोधात संभाव्य लष्करी कारवाईबाबतही चर्चा झाल्याचं मानलं जातंय. मात्र पाकिस्तान सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवत नाही, तोपर्यंत पंजाब प्रांताची पाण्याची गरज भागवणाऱ्या सिंधू जल कराराला इतिहासात पहिल्यांदाच स्थगिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1965, 1971 आणि 1999 या तीन युद्धांमध्येही भारताने सिंधू जलकराराला धक्का लावला नव्हता. यावेळी पहिल्यांदाच केंद्र सरकारने पाकिस्तानचं पाणी अडवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताचं आक्रमक धोरण अधोरेखित झालंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List