“या माप घेतो..”; ‘देवमाणूस’ परत येतोय, पहा थरारक प्रोमो
झी मराठी वाहिनीवर अत्यंत लोकप्रिय मालिका परत येतेय. किरण गायकवाडची मुख्य भूमिका असलेल्या ‘देवमाणूस’ या मालिकेचे दोन्ही सिझन गाजले. आता त्याचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘देवमाणूस- मधला अध्याय’चा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय. या थरारक प्रोमोची सुरुवात सरू आज्जीच्या शिव्यांनी होते. त्यानंतर ‘देवमाणूस’ किरण गायकवाड एका नव्या भूमिकेत समोर येतो. या नव्या सिझनमध्ये तो टेलरच्या भूमिकेतून नवा थरार प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
प्रोमोच्या सुरुवातीला सरू आज्जी देवमाणसाची कहाणी सांगते. “मी सांगते त्याची असली कहाणी.. या गावात डॉक्टर बनून आला, देवमाणूस झाला अन् बायकांची कलमं लावत सुटला. मग बातमी आली.. अपघातात जळून मेला म्हणून, पण कशाचं काय? मुडदा परत आला गावात अन् सुटला बायकांना गंडा घालत. पण एक गोष्ट मला अजून कळली नाही, ह्यो मधे गायब होता, तेव्हा ह्यो लांडगा कुठं वणवा पेटवत फिरत होता,” असा प्रश्न ती विचारते. त्यानंतर ‘देवमाणूस’चं नवीन रुप पहायला मिळतं. या प्रोमोमध्ये त्याच्या तोंडी असलेला ‘या माप घेतो..’ हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.
मालिकेच्या तिसऱ्या सिझनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार, यात कोणकोणते कलाकार असणार, याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. देवमाणसाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड आणि त्याच्यासोबत आधीचे दोन्ही सिझन गाजवणारी आणि तिच्या अस्सल गावरान भाषेने प्रेक्षकांची मनं जिंकलेली सरू आज्जी म्हणजेच रुक्मिणी सुतार सुद्धा असणार आहेत. तसंच या मालिकेत पहिल्या दोन सिझनप्रमाणेच गावातली अनेक नवीन इरसाल पात्र पाहायला मिळणार आहेत.
‘देवमाणूस- मधला अध्याय’ या मालिकेची कथा ही पहिल्या आणि दुसऱ्या सिझनच्या मधली आहे. डॉक्टर अजितकुमार देव कातळवाडीतून निघून जातो. तो परत आल्यानंतर त्याला फाशी होते. परंतु यादरम्यान तो कुठे होता, काय करत होता, तिथेही तो कसा पोहोचला, त्याने कुणाला फसवलं, माणसांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला.. हे सगळं प्रेक्षकांना ‘देवमाणूस- मधला अध्याय’ या मालिकेत बघायला मिळणार आहे.
आधीच्या दोन्ही सिझनप्रमाणे या सिझनचंही लेखन स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम हीच जोडगोळी करणार आहे. स्वप्नील गांगुर्डे पटकथा तर विशाल कदम संवाद लेखन करणार आहेत. त्यामुळे पहिल्या दोन्ही सिझनप्रमाणे याही मालिकेत उत्कंठा वाढवणारे कथानक आणि अस्सल गावरान म्हणी, खुसखुशीत संवाद असणार आहेत. या मालिकेचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजू सावंत करत आहेत. त्यांनीच आधीच्या दोन्ही सिझनचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे देवामाणूसची जादू कायम राहणार हे निश्चित.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List