बोरिवलीतील समस्यांविरुद्ध मोर्चात भाजप उतरणार! आमदार भाजपचा, खासदार भाजपचा, सत्ता भाजपची
बोरिवलीतील विविध समस्यांवर बुधवारी इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर ते गोयल शॉपिंग सेंटरपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. व्यापारी संघटना हा मोर्चा काढणार असली तरी त्यावर भाजपच्या नेत्यांचे फोटो झळकल्याने नागरिक अचंबित झाले आहेत.
बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय भाजपचे आहेत. स्थानिक खासदार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल भाजपचे आहेत. गेल्या पालिका निवडणुकीत या भागातील बहुतेक नगरसेवकही भाजपचेच निवडून आले होते. असे असताना या भागातील अनेक समस्या ’जैसे थे’ आहेत आणि त्यावरच भाजपच्या साथीने व्यापारी आता रॅली या गोंडस नावाखाली आवाज उठवण्यासाठी मोर्चा काढत आहेत. त्यामुळे सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्यापाऱ्यांच्या रॅलीच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, गोयल, उपाध्याय, गोपाळ शेट्टी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. ज्यांना जाब विचारायचा आहे तेच मोर्चात उतरणार आहेत. ही व्यापाऱ्यांची दिशाभूल आहे, असा आरोप मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी केला.
इंद्रप्रस्थमधील व्यापारी त्रस्त
बोरिवलीतील प्रमुख व्यापारी केंद्र मानले जाणारे इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरबाहेरचे क्रॉसिंग महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले आहे. या शॉपिंग सेंटरमध्ये 300 शॉप असून समोरच रस्त्यावर बॅरिकेड्स लावल्याने येथील लोकांना व वाहनांना वळसा घालून यावे लागत आहे. त्याचा व्यापारावर परिणाम होत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. सकाळी 9.30 ते 12.30 असे तीन तास शॉपिंग सेंटर बंद ठेवून व्यापारी रस्त्यावर उतरणार आहेत.
या आहेत समस्या
- बोरिवली रेल्वे स्टेशनजवळ रिक्षांची गर्दी
- एस. व्ही. रोडवरील बॅरिकेड्स
- इंद्रप्रस्थ गेटवरील रेलिंग
- फेरीवाल्यांचा मोठा वावर
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List