Ratnagiri News – दहा लाख खर्चूनही राजापूर पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांचे निवासस्थान रिकामेच
राजापूर पंचायत समितीच्या आवारातील गटविकास अधिकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली पंचायत समितीने गेल्या दोन वर्षांत सुमारे १० लाख रुपये खर्च केले आहेत, मात्र सद्यस्थितीत या इमारतीत गटविकास अधिकारी वास्तव्यास नसल्याने लाखो रुपये खर्च करूनही हे निवासस्थान अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेतच आहे. जर अधिकारी येथे राहणार नसतील, तर हा लाखोंचा खर्च नक्की कशासाठी करण्यात आला, असा संतप्त प्रश्न आता राजापूरच्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
गटविकास अधिकाऱ्यांच्या या निवासस्थानासाठी प्रथम पंचायत समिती सेस कार्यक्रमातून सन २०२३-२४ करिता ४ लाख १४ हजार ४९८ रुपये, तर जिल्हा परिषद सेस पदाधिकारी व अधिकारी निवासस्थान दुरुस्ती २०२४-२५ या लेखाशिर्षाखाली ५ लाख ८२ हजार ५१७ रुपये असा मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. या दोन्ही शिर्षाखालील करण्यात आलेली कामे पूर्ण करण्याची मुदत ही १५ जानेवारी २०२५ अशी आहे आणि एकाच ठेकेदाराला ही कामे देण्यात आली होती. एकीकडे अधिकारी निवासस्थानी राहत नसताना दुरुस्तीचा घाट का घालण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, दुसरीकडे केवळ छप्पर दुरुस्ती आणि इमारतीला रंगरंगोटी करण्यासाठी एवढा मोठा निधी गेला कुठे, असाही संशय व्यक्त केला जात आहे. पंचायत समितीच्या आवारात आरोग्य विभागासाठी नवीन इमारत बांधण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन इमारतीसाठी सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
आमदारांनी सुसज्ज आणि एकत्रित इमारतीची घोषणा केली असताना प्रशासनाकडून मात्र तुकड्या-तुकड्याने वेगळ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे पंचायत समितीचे अधिकारी आमदारांचे आदेश धुडकावत असल्याचे चित्र समोर येत आहे. सध्या पंचायत समितीचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्याने हा मनमानी कारभार चालू असून, जनतेच्या पैशाचा असा विनियोग आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे होणारे दुर्लक्ष यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List