लोभस ‘ही-मॅन’, अलविदा धरमजी!
चित्रपटसृष्टीच्या मायावी दुनियेत कमालीचे यशस्वी होऊनही धर्मेंद्र यांचे पाय सदैव जमिनीवरच राहिले. ‘मुझे लोगों ने हिरो बनाया, पर मै तो सिर्फ इन्सान बनना चाहता हूँ,’ असे धरमजी म्हणत. फिल्मी चमक-दमक आणि फिल्मी पार्थ्यांमध्ये न रमता स्वतःची एक वेगळी दुनिया धर्मेंद्र यांनी निर्माण केली होती. ‘बॉलीवूड’च्या इतिहासावर अमिट छाप सोडणारा हा दिलखुलास व रांगडा नायक आता रुपेरी पडदा सोडून गेला असला तरी जनतेच्या मनःपटलावर मात्र हा लोभस रोमँटिक ‘ही-मॅन’ सदैव रुंजी घालत राहील. अलविदा धरमजी!
धर्मेंद्र ऊर्फ धरमपाजी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणा, राजबिंडा व उमदा नायक. गेली सहा दशके हिंदी सिनेमाचा रुपेरी पडदा गाजवणारा हा रांगडा अभिनेता रुपेरी पडदा सोडून गेला आहे. सत्तरच्या दशकात केवळ तरुणीच नव्हेत, तर तरुणांच्याही गळ्यातील ताईत असलेला धर्मेंद्र ते चरित्र अभिनेत्याच्या एकापेक्षा एक सरस भूमिका वठवणारे धरमजी किंवा धीरूपाजी हा त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास विलक्षण होता. गेले अनेक दिवस धरमजींची प्रकृती नरम-गरम होती. वय झाले होते, शरीर थकले होते, पण धडधाकट धरमजींच्या आसपास फिरकण्याची कुठल्या व्याधी किंवा आजाराची काय बिशाद! या ‘ही-मॅन’ने आता जगाचा निरोप घेतला तो केवळ वार्धक्यामुळे. केवळ फिल्मी करीअरच नव्हे, तर एकूणच आयुष्याचा मनमुराद आनंद लुटूनही धर्मेंद्र यांनी आपले स्वास्थ्य नेटाने जपले होते. वयाच्या नव्वदीतही निरोगी शरीर आणि कमालीची ऊर्जा असलेले उत्साही मन यांचा अद्भुत संगम धरमजींकडे होता. खट्याळ अभिनेता, रोमँटिक हिरो आणि सळसळत्या तारुण्याचा आविष्कार धरमजींनी पडद्यावर तर साकारलाच; पण व्यक्तिगत आयुष्यात किंवा उतारवयातही हे खट्याळ तारुण्य सोबत घेऊनच ते वावरले. वार्धक्याच्या खुणांवर मात करत आपले नायकपण एका मस्तीत मिरवत धरमजी सदैव जगले ते ‘हिरो’सारखेच! सिनेमानंतर अनेकदा ‘रिऑलिटी शो’च्या निमित्ताने छोट्या पडद्यावरही ते झळकत राहिले, पण तेच लोभस, राजस रूप घेऊन. कधी फुलसाईज जीन्सची सगळी बटनं मोकळे सोडलेला शर्ट, कधी आपले मजबूत व पिळदार बाहू दाखवणारे स्लीव्हलेस जाकीट, कधी हॉलीवूडपटांतील ‘काऊ बॉईज’च्या डोक्यावर असते तशी लेदरची हॅट, अशी अस्सल मर्दानी छाप पाडणारा पोशाख हे त्यांचे वैशिष्ट्य. सिनेमासोबतच प्रत्यक्ष जीवनातही ते आपल्या या देखण्या ‘लूक’ची विशेष काळजी घेत. धर्मेंद्र यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व, त्यांची स्टाईल आणि जोरकस संवादफेकीची उत्कृष्ट शैली यांची सिनेमा
रसिकांना भुरळ
पडली होती. चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांनाही धर्मेंद्र यांच्यातील डॅशिंग व रोमँटिक नायक कायम खुणावत राहिला. एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी करण्यासाठी किंवा चित्रपट सुपरहिट ठरण्यासाठी हिरो किंवा अभिनेत्याच्या ठायी जी काही आकर्षणे असावी लागतात, तो सगळा मसाला धर्मेंद्र यांच्यात ठासून भरलेला होता. त्यामुळेच प्रारंभीचा संघर्षाचा काळ वगळता धर्मेंद्र यांच्या वाट्याला ‘बॅड पॅच’, भूमिकांचा दुष्काळ किंवा कामाची चणचण अशी कधी आलीच नाही. त्यांचे जिंदादिल व्यक्तिमत्त्व, दिलखुलास व मनमोकळा स्वभाव, तसेच उर्दू, पंजाबी, हिंदीच्या संमिश्र संभाषणातून सर्वांना जिंकून घेण्याचे कसब अलौकिक होते. आपल्या संपूर्ण फिल्मी कारकीर्दीत त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. ‘शोले’मधील त्यांचा ‘वीरू’ कुणाला विसरता येईल काय? खलनायक गब्बर (अमजद खान) बसंती अर्थात हेमा मालिनीला नाचायला सांगतो त्या वेळी साखळदंडांनी वेढलेल्या धर्मेंद्रचा ‘कुत्ते… कमिने, मै तेरा खून पी जाऊंगा’ हा अजरामर झालेला डायलॉग आणि तेवढय़ाच आवेशाने ‘बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना’, हे धर्मेंद्र यांचे संवाद रसिकांच्या मनावर कोरले गेले ते कायमचेच! ‘शोले’मध्ये ‘बसंती’ला झाडावरील आंबे पिस्तुलाने पाडण्याचे प्रशिक्षण देताना धर्मेंद्रने जो रोमँटिक खट्याळपणा केला तो अफलातूनच. हा प्रसंग आणि बसंतीच्या प्रेमासाठी, होकार मिळवण्यासाठी नशेत पाण्याच्या टाकीवर चढून धमाल करणारा ‘वीरू’ हा सगळा बॉलीवूडचा मौल्यवान ठेवा आहे. संवादफेक हे धर्मेंद्र यांचे बलस्थान होते व त्यांच्यातील नटाने त्यांना मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचे, प्रत्येक संवादाचे चीज केले. ‘शोले’बरोबरच, ‘सत्यकाम’, ‘चरस’, ‘प्रतिज्ञा’, ‘धरम-वीर’, ‘शराफत’, ‘अनपढ’, ‘यकीन’ ही त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची लांबलचक यादी होईल. ‘फुल और पत्थर’ या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाने धर्मेंद्र यांना
‘सुपरस्टार’
बनवले. सर्वार्थाने यशस्वी ठरलेल्या या चित्रपटात धर्मेंद्र पहिल्यांदाच शर्टाशिवाय बलदंड नायक म्हणून झळकले व या भूमिकेनेच त्यांना ‘ही-मॅन’ ही ओळख दिली. अॅक्शन पटांमधून तर धर्मेंद्र यांनी आपली छाप पाडलीच, पण शृंगाररसाच्या चित्रपटांतूनही त्यांनी रोमँटिक नायक म्हणून प्रदीर्घ काळ राज्य गाजवले. साठच्या दशकातील ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात धर्मेंद्र यांनी कुमकुमसोबत रोमँटिक भूमिका केली होती. त्यानंतर 1970 मध्ये त्यांनी हेमा मालिनीसोबत ‘तुम हसीन मै जवान’ ही लोकप्रिय कॉमेडी फिल्म केली. मुमताजसोबत केलेला ‘लोफर’ही तुफान गाजला. 1977 मध्ये हेमा मालिनीसोबत केलेल्या ‘ड्रीम गर्ल’ने तर लोकप्रियतेचे शिखरच गाठले. ‘मेरा गाँव मेरा देश’ या चित्रपटात ‘अॅक्शन’ आणि ‘इमोशन’ यांचा त्यांनी घातलेला सुंदर मेळ व ‘सीता और गीता’मध्ये हेमा मालिनीसोबत साकारलेला मजेदार व चार्मिंग नायक सिनेरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे चित्रपट एकापाठोपाठ सुपरहिट होऊ लागले. याचदरम्यान धर्मेंद्र-हेमा यांची ‘ऑन स्क्रीन’ व ‘ऑफ स्क्रीन केमिस्ट्री’ रंगात आली. धर्मेंद्र आणि हेमा हे जणू समीकरणच झाले. विवाहित धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत संसार थाटला, पण ते कधी वाहवत गेले नाहीत. मूळ परिवाराशी नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. सुंदर समतोल साधत त्यांनी दोन्ही संसार नेटकेपणे पार पाडले. चित्रपटसृष्टीच्या मायावी दुनियेत कमालीचे यशस्वी होऊनही धर्मेंद्र यांचे पाय सदैव जमिनीवरच राहिले. ‘मुझे लोगों ने हिरो बनाया, पर मै तो सिर्फ इन्सान बनना चाहता हूँ,’ असे धरमजी म्हणत. फिल्मी चमक-दमक आणि फिल्मी पार्थ्यांमध्ये न रमता स्वतःची एक वेगळी दुनिया धर्मेंद्र यांनी निर्माण केली होती. ‘बॉलीवूड’च्या इतिहासावर अमिट छाप सोडणारा हा दिलखुलास व रांगडा नायक आता रुपेरी पडदा सोडून गेला असला तरी जनतेच्या मनःपटलावर मात्र हा लोभस रोमँटिक ‘ही-मॅन’ सदैव रुंजी घालत राहील. अलविदा धरमजी!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List