Nanded News – हदगावच्या नायब तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; गुन्हा दाखल
प्राप्त झालेला रेशन पुरवठा इपॉस मशीनवर अपलोड करण्यासाठी व नवीन लाभार्थ्याचे नाव ऑनलाईन करण्यासाठी ७५०० रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या हदगाव तहसीलच्या पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार सुमन कर्हाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हदगाव तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कर्हाळे (४४) शनिवारी लाचलुचपत प्रतिबंध विभाग नांदेड यांच्या वतीने कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांच्यामार्फत ७५०० रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदार यांचे स्वतःचे नावावर रेशन वितरण दुकान आहे. तक्रारदार यास मागील चार महिन्याचे जो धान्य पुरवठा झाला होता त्यांचे कमिशन म्हणून ५७ हजार रुपये मिळणार होते. माहे नोव्हेंबर २०२५ चे राशन प्राप्त झाले असून, पुरवठा निरीक्षक यांनी ते मशीनवर अपलोड देणे गरजेचे होते. परंतु अपलोड करण्यास टाळाटाळ होत असल्याने तसेच २७ नवीन लाभार्थी यांचे नाव ऑनलाईन करण्यासाठी तक्रारदार यांनी पुरवठा निरीक्षक सुमन कर्हाळे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव त्यांचे समक्ष तक्रारदार यांना माहे नोव्हेंबर २०२५ चे रेशन ईपॉस मशीनवर अपलोड करण्यासाठी व नवीन २७ लाभार्थ्याचे नाव ऑनलाईन करण्यासाठी कमिशन पोटी शासनाकडून मिळालेल्या ५७ हजार रुपयावर २० टक्के रक्कम लाच म्हणून मागितली व गोविंद जाधव यांनी देखील तीच मागणी केली.
सदर बाबीची पडताळणी दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रतिबंधक विभाग नांदेडकडून सापळा कारवाई दरम्यान पुरवठा निरीक्षक अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कर्हाळे यांनी शासकीय पंचासमक्ष तडजोडीअंती कमिशनचे दहा टक्के प्रमाणे रुपये सात हजार पाचशे लाच मागणी करून कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांच्याकडे लाच देण्याचे सांगितले. त्यांनी तक्रारदार यांचेकडून ७५०० लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवून कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. तेव्हा कंत्राटी गोविंद जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी व पुरवठा निरीक्षक अधिकारी तथा तहसीलदार सुमन कर्हाळे यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने यांना रंगेहात पकडले.
आरोपी नायब तहसीलदार सुमन कर्हाळे यांना ताब्यात घेण्यात आले असून कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांना वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याकामी सापळा पथक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीती जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल अरशत अहमद खान, गजानन राऊत, सय्यद खदिर यांनी प्रयत्न केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List