मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरीच; सरासरी तीन मुंबईकरांपैकी एकाची गैरसोय
देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईत आजही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरीच पडत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने केलेल्या नवीन सर्वेक्षणात मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अपुरेपणा समोर आला आहे. संपूर्ण शहरात सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता खूपच असमान आहे. सरासरी तीनपैकी एक मुंबईकर खराब वाहतूक कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात राहत असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या 31.8 टक्के म्हणजेच जवळपास 40 लाख मुंबईकरांना बस, मेट्रो सेवा आणि उपनगरीय रेल्वे यांसारख्या वाहतूक पर्यायांचा लाभ घेताना संघर्ष करावा लागत आहे. जवळच्या अंतरावर सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे या मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे सर्वेक्षणात आढळले. आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक गोपाळ पाटील, सिंगापूरमधील ए स्टार इन्स्टिट्यूट ऑफ हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंगच्या डॉ. राखी मेप्रम्बथ आणि संशोधन अभ्यासक मनीष यादव यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले. त्याअंतर्गत वाहतुकीची आकडेवारी आणि लोकसंख्याशास्त्रीय नमुन्यांचा वापर करून मुंबईतील वाहतुकीच्या प्रवेशयोग्यतेचे मॅपिंग करण्यात आले.
मुंबईचे वेगवेगळे भाग सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने किती चांगले जोडले आहेत हे निर्धारित करण्यासाठी संशोधकांनी सार्वजनिक वाहतूक सुलभता पातळी, वाहतूक पुरवठ्यातील तफावत आणि सामाजिक असुरक्षितता निर्देशांकाचे मूल्यांकन केले. झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना आजही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी धावाधाव करावी लागत असल्याचे उघड झाले आहे. सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांतील भागांना रेल्वे, मेट्रो आणि बस नेटवर्कचा चांगलाच फायदा झाला आहे. याउलट उत्तर मुंबई आणि पूर्व उपनगरांतील एम पूर्व (गोवंडी), पी उत्तर (मालाड), एस (भांडुप) आणि टी (मुलुंड) अशा प्रभागांतील नागरिकांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअभावी परवड कायम आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List