सर्व 140 आमदार माझेच! शिवकुमार यांचा सूचक इशारा, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाचे बंड शमले
कर्नाटकचे मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीवारी केल्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात भूकंप येणार का, अशी स्थिती निर्माण झाली होती. सर्व 140 आमदार माझेच आहेत, असे सूचक विधान करून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी बंडाचा झेंडा उगारला असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, गटबाजी माझ्या रक्तात नाही असे म्हणत स्वतः शिवकुमार यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आणि कर्नाटकमधील राजकीय वादळ शमले.
कॉँग्रेसने 2023 मध्ये झालेली कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद दिले. त्यावेळी अडीच वर्षांनी तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, असे आश्वासन त्यांना दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे आता अडीच वर्ष पूर्ण होत आले असताना शिवकुमार यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचेही संकेत दिले होते. मात्र, आता त्यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट टाकून म्हणाले की, मी पक्षश्रेष्ठीचा आदेश मानणारा आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. मी त्यांना शुभेच्छा देतो.
सर्वांना मंत्रीपद हवे, मी काय म्हणू? शिवकुमार
शिवकुमार यांनी या संपूर्ण वादावर पडदा टाकून सांगितले की, सर्वांना मंत्रिपद हवे आहे. ते दिल्लीत जाऊन नेत्यांना भेटले. त्यांचा तो अधिकारच आहे. काही जण खरगे यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनाही भेटले. त्यात चुकीचे काय? असे म्हणत सर्व 140 आमदार माझेच आहेत, असा सूचक इशारा शिवकुमार यांनी दिला.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी सिद्धरामय्या यांची दिल्लीवारी
सिद्धरामय्या हे 16 नोव्हेंबर रोजी दिल्लीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले होते. ही भेट मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शिवकुमार यांच्या जवळचे आमदार देखील दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठाRना भेटून आले. त्यांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनविण्याची मागणी केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List