परकीय आक्रमणापेक्षा केंद्र सरकारचे आश्चर्यकारक मौन हीच मोठी समस्या! H1B व्हिसाच्या शुल्क वाढीवरून आदित्य ठाकरे यांची खरमरीत टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी H1B व्हिसा शुल्कवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. परकीय आक्रमणापेक्षा केंद्र सरकारचे धक्कादायक मौन ही खरी मोठी समस्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
X वर एक पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले, “ही समस्या केवळ परकीय आक्रमणाची नाही, तर त्यापेक्षा मोठी समस्या आहे केंद्र सरकारचे आश्चर्यकारक मौन. जर ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ यासारख्या घोषणा खरोखरच प्रत्यक्षात उतरल्या असत्या, तर आज इतका गोंधळ झाला नसता.”
“डॉलरच्या तुलनेत कमकुवत होणाऱ्या रुपयाने आणि करवाढीने देशाला आधीच मोठा फटका बसला आहे. सत्ताधारी पक्षाचे बोलणे धाडसी वाटत असेल, तरी कठोर वास्तवाकडे पाहणे गरजेचे आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
H1B व्हिसा शुल्कवाढीच्या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले, “या शुल्कवाढीचा फटका केवळ हिंदुस्थानातील लाखो नोकरदारांना नाही, तर त्यांना कामावर ठेवणाऱ्या कंपन्यांनाही बसणार आहे. तसेच, करिअर आणि चांगले जग निर्माण करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या हजारो तरुणांच्या आकांक्षांनाही याचा मोठा धक्का बसेल.”
आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गेल्या ११ वर्षातील परदेश दौऱ्यांचा देशाच्या परराष्ट्र धोरणात उपयोग होतोय की नाही, यावर मी भाष्य करणार नाही. पण आम्हा हिंदुस्थानींना आपल्या सरकारने आपल्याशी आणि अमेरिकेशी संवाद साधताना ऐकायला हवे,” असे ते म्हणाले.
हिंदुस्थान-अमेरिका यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंध जगासाठी फायदेशीर आहेत, पण केंद्र सरकारचे मौन त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो हिंदुस्थानींसाठी अंधारासमान आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
The problem isn’t only the onslaught, the bigger problem is the stunning silence of the Union Government.
If “Atmanirbhar Bharat”, “Make in India” and such other slogans would have been actually implemented, it wouldn’t have been so chaotic.
The weakening rupee against the…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 20, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List