लेख – लोकशाहिरांची शब्दकळा

लेख – लोकशाहिरांची शब्दकळा

>> डॉ. सुनीलपुमार सरनाईक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विविधांगी साहित्य सेवा करून समाजाला विषमतेच्या जोखडातून मुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न साधला. शाहीर हा लोकशिक्षणाद्वारे समाजाला पैलतीरी नेणारा असतो. अण्णाभाऊ यालाही अपवाद नाहीत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने शंकरराव खरात व अण्णाभाऊंच्या सर्व साहित्यांचे जगातील विविध भाषेत भाषांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय आपल्या मराठी माणसाच्या शिरपेचात तुरा खोवणारा आहे. अण्णाभाऊंची आज पुण्यतीथी. त्यानिमित्ताने…

साहित्य निर्मितीसाठी विशिष्ट वातावरण लागते, उच्च शिक्षण लागते, असे अनेक समज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी चुकीचे ठरविले. या महान लोकशाहिराला केवळ दीड दिवस शाळेत जाण्याचा योग आला. मात्र त्यांनी सुमारे 40 कादंबऱया लिहिल्या. त्यांच्या कथा, कादंबरींवर अनेक मराठी चित्रपट निर्माण झाले. त्यांच्या शाहिरी पोवाडय़ांनी जनसामान्यांच्या मनात गारुड निर्माण केले.

त्यांनी प्रतिपूल परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या लढवय्या स्त्रियांना आपल्या कथा, कादंबरींमध्ये नायिका बनविले. कलेसाठी कला हा दृष्टिकोन त्यांनी नाकारला. जीवनासाठी कला याची त्यांनी आयुष्यभर पाठराखण केली. कथा, कादंबरी, शाहिरी, राजकीय, लावण्या, पोवाडे आदी साहित्य प्रकार त्यांनी लीलया हाताळले. आपल्या साहित्यातून समाजाचे वास्तव चित्रण त्यांनी रेखाटले. अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीचा उपयोग समाज परिवर्तनासाठी व जनजागृतीसाठी केला. जनतेच्या लोकलढय़ासाठी त्यांनी आपली धारदार लेखणी तलवारीसारखी चालविली.

अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचे मुख्य सेनानी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी ‘मुंबईची लावणी’ लिहिली. ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतिया काहिली’ ही त्यांची लावणी त्या काळात खूप गाजली. लावणी म्हटले की, त्यामध्ये शृंगारिक शब्दांची रेलचेल असते. मात्र अण्णाभाऊंनी लावणीचा चेहरामोहरा बदलून टाकला. ‘माझी मैना’ यात मैना हे रूपक मुंबई प्रांतासाठी होते आणि ही मुंबई जर महाराष्ट्राला मिळाली नाही तर मराठी भाषिकांच्या जीवनाची काहिली होणार आहे, असा आशय या लावणीतून त्यांनी मांडला. त्यांची लावणी जनतेच्या लढय़ासाठी प्रवृत्त करते.

मराठी कादंबरीला त्यांनी दिलेला नायिकाप्रधानतेचा दिलेला नवा आयाम, पारंपरिक तमाशाचे लोकनाटय़ात केलेले रूपांतर, कलापथकाला क्रांतीचे बनविलेले हत्यार व धारदार मर्मभेदी लेखणी तसेच त्यांची तडाखेबंद शाहिरी महाराष्ट्राच्या मराठी मनामनात आजही घर करून राहिली आहे. जग बदलण्याची ताकद त्यांच्या गीतातून व्यक्त होत होती. म्हणूनच हे जग घाव घालूनच बदलावे लागेल, असा विचार त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील लिहिलेल्या कवनात मांडला. ते म्हणतात,

‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले आम्हा भिमराव’

पृथ्वी ही शेषाच्या फण्यावर उभारलेली नसून श्रमिकांच्या व कष्टकऱयांच्या तळहातावर उभारलेली आहे, अशी त्यांची धारणा होती. कष्टकऱयांना व श्रमजिवींना प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांनी आपली वाणी आणि लेखणी झिजविली. तसेच जगातील विषमतेवर, स्त्रिया व दलितांवरील अन्याय, अत्याचारावर आणि राजकारणातील पुढाऱयांच्या दांभिकतेवर प्रखरपणे प्रहार केले.

अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये मराठी मातीचे लावण्य आणि मराठी पौरुषता यांचे सामर्थ्यशाली चित्र रेखाटले आहे. त्यामध्ये शाहिरी कवने असो, पोवाडा असो किंवा कादंबरी, वग अथवा नाटय़ असो, त्या ठायी या महाराष्ट्राच्या मातीचे लावण्य व पौरुषता दिसून येते. अण्णाभाऊंनी मुंबईच्या सामाजिक विषमतेचे व गावाकडील वास्तव जीवनाचे चित्र आपल्या लेखणीद्वारे समाज मनाची पकड घेण्यासाठी फुलविले. त्यातून पिचलेल्या वंचित माणसाचे अलोट दर्शन समाजाला घडवले. मातंग समाजामध्ये जन्मलेल्या अण्णाभाऊंनी मराठी साहित्य निर्मितीला, साहित्य समीक्षेला एक वेगळी दिशा दिली. त्यांनी दलित बंडखोर साहित्य समाजापुढे आणले. मुंबईतील गिरणी कामगारांचे व झोपडपट्टीतील माणसांचे जीवन जवळून पाहिले, अनुभवले. ते वास्तव जीवन पाहात असताना त्यांच्या साहित्य निर्मितीला खऱया अर्थाने धार आली. त्यातूनच कम्युनिस्ट विचारसरणीची ओढ निर्माण झाली. कार्ल मार्क्स जगाच्या इतिहासाची व्याख्या करताना म्हणतात, ‘‘आहे रे, नाही रे यांच्यातील संघर्ष म्हणजे इतिहास. जगाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे.’’ आजच्या युगातही भांडवलदार-कामगार यांच्यातील संघर्ष किंवा गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढत चाललेली विषमतेची दरी हाच इतिहास आहे. अशा या संघर्षमय जीवनाची अनुभूती अण्णाभाऊंनी घेतली. त्यातून त्यांनी आपल्यातील शाहीर जागवला आणि समाजाला जागे करण्यासाठी संदेश दिला.

अण्णाभाऊंनी लहानपणापासून वडिलांबरोबर कल्याणला कोळसे भरण्याचे काम केले. पाठीला कपडय़ाचे ओझे घेऊन फिरले. मोरबाग गिरणीत झाडू कामगार झाले. पुढे त्रासण खात्यात कामगार म्हणून काम केले. पुढे साम्यवादी कार्यकर्ता, समाजसेवक म्हणूनही वणवण भटकंती केली. दरम्यानच्या काळात त्यांच्यातील कलावंत जागा होऊन तमाशातही त्यांनी काम केले. त्यांनी आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात कडवी झुंज दिली. दारिद्रय़ाचे चटके झेलले. त्यांनी साहित्याची शिखरामागून शिखरे पादाक्रांत केली. साहित्य रचना करीत असताना त्यांनी काही जीवनमूल्ये मानली होती, ती शेवटपर्यंत सोडली नाहीत. त्यांची मूळ प्रवृत्ती शाहिराची. शाहीर हा लोकजागृती, लोकशिक्षणाद्वारे समाजाला पैलतीरी नेणारा असतो. अण्णाभाऊ यालाही अपवाद नाहीत. त्यांचे हे वेगळेपण शाहिरी वाङ्मयात दिसून येते. त्यांच्यातील लेखक हा संकुचित नाही, तो मर्यादपलीकडेही जातो. त्यांच्या कथा, कादंबऱयांतील चित्रण हे उपेक्षितांचा भव्य मेळावाच आहे. त्यांनी श्रमिक जगाचे कलावंतांच्या चष्म्यातून रेखाटन केले. या सर्व साहित्य रचनेतून अण्णाभाऊंसारख्या लोकलेखक शाहिराचे श्रेष्ठत्व किती मोठे आहे, हे सिद्ध होते.

त्यांनी आपल्या हयातीमध्ये जवळ जवळ सव्वाशेच्या आसपास कथा लिहिल्या व चाळीस कादंबऱया लिहिल्या. तसेच ‘पेंग्याचे लगीन’, ‘इनामदार’ अशी काही गावरान नाटके, साधारण दहा-बारा लोकनाटय़े, त्याचबरोबर ‘माझी मैना’, स्टॅलिनग्राडचा पोवाडा, महाराष्ट्राची परंपरा असे लावणी व पोवाडे लिहिले. त्यांची ‘चित्रा’ कादंबरी रशियन, पोलिश व कन्नड भाषेत भाषांतरित झाली. त्याचबरोबर ‘गुजराथी शिरली’, ‘वारणेच्या खोऱयात’, ‘फकिरा’ या कादंबऱ्या हिंदी, पंजाबी भाषेत गाजल्या. तसेच ‘वारणेचा वाघ’, ‘अलगूज’, ‘बारा गावचे पाणी’, ‘माकडीचा माळ’, ‘आवडी’, ‘चिखलातील कमळ’ या कादंबऱया रूपेरी पडद्यावर आल्या. त्यांचे चित्रपट गाजले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या साहित्य सम्राटाचे सर्व साहित्य संघर्ष आणि वाङ्मय या अद्वैतांत आहे. त्यांनी विविधांगी साहित्य सेवा करून समाजाला विषमतेच्या जोखडातून मुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न साधला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने शंकरराव खरात व अण्णाभाऊंच्या सर्व साहित्यांचे जगातील विविध भाषेत भाषांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय आपल्या मराठी माणसाच्या शिरपेचात तुरा खोवणारा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वच्छता अभियानात कराड देशात दुसरे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण स्वच्छता अभियानात कराड देशात दुसरे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
स्वच्छतेच्या अभियानात सातत्याने उच्च दर्जाची कामगिरी बजावणाऱया कराड नगरपालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये देशात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 50...
शाळांतील सीसीटीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, अधिकाऱ्यांना चौकशीचा मुहूर्त मिळेना
दिल्लीनंतर आता बंगळुरूमधील 40 शाळांना बॉम्बच्या धमक्या, तपास सुरु
कालच्या प्रकाराने संपूर्ण जगभरात महाराष्ट्राची बदनामी झाली – विजय वडेट्टीवार
Juice Benefits – ‘हा’ ज्यूस आहे अनेक रोगांवर गुणकारी, वाचा
विधानभवनात गँगवॉर; महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा! संजय राऊत आक्रमक, टीम फडणवीसच्या चौकशीची मागणी
शनी मंदिराच्या विश्वस्तांना नोटिसा; आज सुनावणी