पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा; अन्यथा सरकार विरोधात वारकरी भूमिका घेतील; कॉरिडॉरविरोधी सभेत महाराज मंडळींचा इशारा
प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर हा वारकरी किंवा विकासकामांसाठी नसून पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून राबविण्याचे नियोजन शासन व प्रशासन करीत आहे. या विरोधात संपूर्ण राज्यात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आवाज उठविणार असून, प्रसंगी सत्ता बदलासाठी प्रचारदेखील करणार असल्याच्या तीक्र भावना कॉरिडॉर विरोधात आयोजित सभेमध्ये विविध महाराज मंडळींनी व्यक्त केल्या.
कॉरिडॉर तसेच डीपीला विरोध करण्यासाठी येथील संभाव्य बाधितांच्या वतीने स्थापित समितीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेचे आयोजन केले होते. यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. अध्यक्षस्थानी वडगावकर महाराज होते. यावेळी शिरवळकर महाराज, संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. महेश महाराज देहूकर, शंकर महाराज गलगलकर, रामकृष्ण महाराज वीर, कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, डॉ. प्राजक्ता बेणारे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, व्यंकटेश गलगलकर, ऍड. आशुतोष बडवे, सुमित शिंदे आदी उपस्थित होते.
देहूकर महाराज म्हणाले, वारकरी, महाराज मंडळींनी मोठय़ा श्रद्धेने आपल्या परंपरा टिकवल्या. मात्र, याचा मोबदला म्हणून थेट आमच्या मठांवर घाला घातला जाणार असेल तर आम्ही आक्रमकपणे या विरोधात राज्यभर प्रचार करू, असा इशारा दिला. याचप्रमाणे वडगावकर महाराज, शिरवळकर महाराज व वीर महाराज यांनीदेखील हा अन्यायकारी कॉरिडॉर भाविकांसाठी नाही, तर व्यावसायिक फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला. वारकऱयांसाठी आवश्यक विकासकामे करण्यापेक्षा ज्याची मागणी नाही तो कॉरिडॉर का लादला जात आहे, असा प्रश्न केला. सरकार आमच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळत असेल तर हे सरकार पाडण्यासाठी आम्हाला गावागावांत प्रचार करावा लागेल, असा इशारादेखील महाराज मंडळींनी दिला.
बालिश बुद्धीचे राज्यकर्ते प्रत्येक तीर्थक्षेत्राला एकाच तराजूत तोलत आहेत, असा आरोप करीत तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर म्हणाले, आम्ही शासनाला शहरातील अनेक मोकळ्या जागा दाखविल्या आहेत. 200 एकर जागा विनावापर पडून असल्याचा दावा करून येथे कॉरिडॉर राबवावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बाबाराव महाजन, वैभव बडवे, आशिष राजहंस, अनिल जुमाळे, ऍड. विनायक उंडाळे, बालाजी महाजन, सुलभा वट्टमवार आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List