अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा माढ्यात ‘आक्रोश’, अद्याप सरकारी मदत मिळाली नाही; पंचनामे करताना निकषांची पायमल्ली
अतिवृष्टी व महापुराने बाधित शेतकऱयांना अनुदानाची रक्कम कमी करून शासनाने शेतकऱयांची फसवणूक केली आहे. तसेच माढा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना योग्य निकष वापरले जात नाहीत, दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱयांना अनुदान मिळावे, यासाठी आज माढा तहसील कार्यालयावर शेतकऱयांनी आक्रोश मोर्चा काढत महसूल खात्याच्या कार्यपद्धतीचा पंचनामा केला. या मोर्चामध्ये म्हैसगाव, चिंचगाव, उपळाई, रिधोरे, दारफळ, मानेगाव भागातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते
उपळाई बु, म्हैसगाव येथील शेतकऱयांच्या समस्या आंदोलनकर्ते शेतकरी शंभूराजे साठे यांनी महसूल प्रशासन व कृषी अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र, परंतु योग्य ती कारवाई महसूल व कृषी विभागाकडून झाली नसल्याने आज माढा बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढत योग्य पद्धतीने पंचनामे व्हावे, अनुदान रक्कम बागायत शेतीसाठी 27000 व जिरायत शेतीसाठी 18,000 मिळावे तसेच संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
म्हैसगाव मंडळअंतर्गत चिंचगाव येथील शेतकऱयांना अतिवृष्टीचा फटका बसूनही कृषी सहायक अधिकारी मोठय़ा उसाचा पंचनामा करण्यास नकार देत असल्यामुळे या भागातील पंचनामे योग्य रीतीने व्हावे, अशी मागणी या भागातील शेतकऱयांनी केली.
उपळाई बु., येथील शेतकऱयांना अजूनही न्याय मिळाला नाही. मे 2025मध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे झालेल्या 639 शेतकऱयांची नावे यादीत दाखल असताना आता 495 शेतकऱयांचीच नावे आहेत. काही शेतकऱयांची नावे महसूल प्रशासनाने वगळल्यामुळे शेतकऱयांनी आक्रमक घेत जाब विचारला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, तहसीलदार संजय भोसले व तालुका कृषी अधिकारी चंदनकर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱयांबरोबर चर्चा करून सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List