मराठी माणसांमध्ये फूट पडू देणार नाही! उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; मुंबई अदानीच्या चरणावर धरणाऱ्या भाजपवरही बरसले, शिवतीर्थावर धगधगली शिवसेनेची मशाल
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा… याचा प्रत्यय आज महाराष्ट्राला शिवतीर्थावरील निष्ठावंत शिवसैनिकांच्या दसरा मेळाव्यात आला. आकाशातून जलधारा कोसळत असताना देखील शिवसैनिकांनी शिवतीर्थ खच्चून भरले होते. पावसात, चिखलात निष्ठावंत शिवसैनिक पाय रोवून उभा होता.
शिवसैनिक, शिवतीर्थ आणि दसरा मेळावा ही पंरपरा आजही कायम आहे याचा प्रत्यय आज शिवतीर्थावर आला. सूर्यास्ताच्या वेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक, शिवसेना प्रेमी यांची पाऊले शिवतीर्थाकडे धाव घेऊ लागली. पाऊस, वादळ, वाऱ्यांची पर्वा न करता शिवसैनिकांचे जत्थे शिवतीर्थावर दाखल झाले. ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’, ‘उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…’, अशा घोषणांनी शिवतीर्थाचा सारा परिसर दणाणून सोडला होता. भगवे झेंडे, भगव्या पतका, भगवे वस्त्र घालून आलेले शिवसैनिक यामुळे शिवतीर्थावर भगव्या लाटा उसळत असल्यासारखं जणू भासत होतं. जिकडे नजर जाईल तिथे शिवसैनिक दिसत होते.
विराट, अति विराट सभेला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर दाखल झाले. आधी शस्त्र पूजन, महापुरुषांना आदरांजली वाहण्यात आली. ज्वलंत हिंदुत्त्व आणि महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखणारे उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहताच शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उद्धव ठाकरेंच्या तुफानी भाषणाला शिवसैनिक उत्स्फुर्त प्रतिसाद देत होता. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनतेविरोधी- शेतकरी विरोधी धोरणांना उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केलं. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर त्यांनी हल्लाबोल केला.
एका बाजूला कोसळणारा पाऊस सुरू असताना दुसऱ्या बाजूला व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांच्या शब्दाशब्दातून मिळणारा ज्वलंत हिंदुत्त्वाचा विचार ऐकण्यासाठी जागा मिळेल तिथे आणि पावसात भिजत कोणताही गोंधळ न घालता शिवसैनिक उभा असल्याचे चित्र शिवतीर्थावर दिसले.
बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेल्या गाढवाचं चित्र आज पहिल्यांदा पाहिलं
”घरून येताना मी आजुबाजुला पाहत होते. वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्यांची गोष्ट आपल्याला माहित आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेल्या गाढवाचं चित्र आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवाववर कितीही शाली टाका. गाढव ते गाढवच. अमित शहांच्या जोड्याचं भार वाहणारं हे गाढव. जनता पण त्यांना जोडे मारणार तो दिवस लांब नाही, उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच अशा प्रकारे तुफान फटकेबाजीने केली. यावेळी जोरदार शिट्या व टाळ्यांचा कडकडाट झाला.
कमळाबाईने जनतेच्या आयुष्याचा चिखल केलाय
आज सगळीकडे चिखल झालाय. त्याचं कारण कमलाबाई आहे. कमलाबाईने तिच्या कारभाराने स्वत:ची कमळं फुलवली पण जनतेच्या आयुष्याचा चिखल केलाय. शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल केला आहे. शेतकऱ्याची शेतजमीन वाहून गेली आहे. घरादाराचा चिखल झालाय. जो शेतकरी आपल्याला खायला देतोय तो विचारतोय की आम्ही खायचं काय? अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. आजपर्यंत मराठवाडा अवर्षन ग्रस्त होता. आता तिथे अतिवृष्टी झालीय. मी शिवसैनिकांना आवाहन करतोय की हे संकट मोठं आहे. भूकंप झालेला तेव्हा शिवसेनेने एक गाव दत्तक घेतलेलं. आपल्याकडे सरकार नाहीए पण फूल नाही तर फुलाची पाकळी तरी देऊ. हे करायला पाहिजे. आजचे जे मुख्यमंत्री आहेत. माणसं कशी बदलतात बघा. आपलं राज्य असताना ओला दुष्काळ जाहीर करा आता ते मुख्यमंत्री झाल्यावर बोलतात की ओला दुष्काळ ही संज्ञाच नाहीए. खड्ड्यात घाल्या तुमच्या संज्ञा पण शेतकऱ्यांना मदत करा. सगळं निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत केलीच पाहिजे, मी मुख्यमंत्री असताना कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी केली होती. तशी कर्जमुक्ती करा. यांची 2017 ला जाहीर केलेली कर्जमुक्ती जाहीर करा. नियमित कर्जफेड करणाऱ्याला 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली होती. तेव्हाच गद्दार पळून गेले सुरतला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही फक्त देशप्रेमी देशद्रोही अशा दोघांनाच ओळखतो
संघाचा दसरा मेळावा झाला. शंभर वर्ष थोडी थोडकी नाही. संघाची शंभर वर्ष पूर्ण होतायत आणि गांधी जयंती देखील आहे. आज एक ज्येष्ट स्वातंत्र्यसेनानी जीजी पारेख यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांना आपल्या सर्वांकडून आदरांजली वाहतो. अशी लढणारी माणसं कमी झाली आहेत. जो लढेल तो तुरुंगात जाईल. कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला. सगळ्यांनी विरोध केला. विरोध केलाच पाहिजे. तो कायदा लागू होता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या चेल्यांनी त्याची मखलाशी केली.हा कायदा एकट्यासाठी नाही. हा कडवे डाव्यांसाठी आहे. आम्ही कडवे डावे ओळखत नाही. आम्ही देशप्रेमी, देशद्रोही अशा दोघांनाच ओळखतो. लडाखमधील सोनम वांगचूक एक चांगला देशभक्त. या माणसाने अतिशय दुर्गम भागात, हाड मोडणाऱ्या थंडीत आपले जवान नीट नेटके राहावे त्यामुळे सोलार टेक्नॉलॉजीवर त्यांना छावण्या बांधून दिल्या. पाणी मिळावं म्हणून आईस स्तुपाची योजना आली. लडाखच्या न्यायहक्कासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं. उपोषण सुरू होतं. पण सरकार ढुंकून बघायला नाही. त्यामुळे जेनझी लेह लडाखमध्ये रस्त्यावर आले. त्यानंतर मोदीबाबांनी त्यांना रासूकाखाली तुरुंगात टाकलं. जनसुरक्षा कायदा म्हणजे हम करे सो कायदा. तोच तोडून मोडून टाकायचा आहे. जेव्हा वांगचूक मोदींची स्तुती करत होते तेव्हा ते देशद्रोही नव्हते, पण आता त्यांच्यावर पाकिस्तानला जाऊन आलात म्हणून अटक होत असेल तर नवाझ शरीफचा केक गुपचूप जाऊन खाणाऱ्या मोदींना काय म्हणायचं.
मोदींना मणिपूरमधला ‘मणि’ दिसला पण तिथल्या जनतेच्या डोळ्यातील अश्रू नाही दिसला
तीन वर्ष मणिपूर जळतंय, पण आता काल परवा मोदी मणिपूरमध्ये गेले. तिथल्या महिलांच्या अब्रुचे धिंडवडे निघत होते त्यावेळी ना मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार. एवढं झाल्यानंतर मोदी जेव्हा गेले तेव्हा आम्हाला वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील. अत्याचार झालेल्यांच सांत्वन करतील. पण तिथलं त्यांचं भाषण ऐकून हसायचं की रडायचं हे समजत नव्हतं. ते म्हणतात मणिपूरच्या नावातंच ‘मणि’ आहे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूरमधला ‘मणि’ दिसला पण तिथल्या जनतेच्या डोळ्यातील अश्रू नाही दिसला. तिथली जनता रडतेय, तिथली जनता आक्रोश करतेय पण आमचे पंतप्रधान मणिपूरच्या नावातील मणि आहे सांगतायत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मोदींवर निशाणा साधला.
भाजप म्हणजे अमिबा
भाजप म्हणजे अमिबा झाला. वाटेल तसा वेडा वाकडा पसरतो. जिथे गरज वाटेल तिथे युती करतो. शरीरात गेला की पोट बिघडतो. तसे हे समाजात घुसले की शांती नाहीसी होती. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतो
नशीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत दहावे आले… नाहीतर फडणवीस म्हणून विसावे आले असते
इंडिया टुडेने एक सर्व्हे केलाय. देशातील सर्वात पॉप्युलर मुख्यमंत्री. आपल्यावेळी पहिल्या पाचात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. माझं कर्तृत्व नव्हतं. ते महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं. दहाव्या स्थानावर आमचे मुख्यमंत्री. नशीब दहावे आले नाहीतर फडणवीस म्हणून विसावे आले असते. सगळी बजबजपुरी करून ठेवली आहे. काय केलंत काय तुम्ही आजपर्यंत. आज एका अधिकाऱ्याला पकडलंय. काही दिवसांपूर्वी वसई विरारच्या अधिकाऱ्याला पकडलंय. अधिकाऱ्यांना अटक होतेय पण जे मंत्री राजरोस बॅगा उघडून बसलेयत त्यांना हात लावायची हिंमत होत नाही. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जातायत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जातायत. पुरावे सादर केले तरी मुख्यमंत्री त्यांना समज देऊन सोडून देतायत. हा तुमचा कारभार, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली.
आमचा देश हाच आमचा धर्म ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे
निवडणूक तुम्ही लावाच. जनता वाटच बघतेय. मुंबईच्या रस्त्याची चाळण झाली आहे, अख्खी मुंबई भोगतेय. जरा पाऊस झाला तर मुंबई भरतेय. मेट्रो मोनो सुरू ठेवण्यापेक्षा बोट सेवा सुरू करा. आणि याचे अमित शहा मुंबईत भाजपचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे असं बोंबलून दिल्लीला परत जातायत. निवडणूका जवळ येतात तसे भाजपवाले पुन्हा हिंदू मुस्लीम करायला लागले आहेत. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आहे की धर्म कुणाचाही कोणताही असला तरी राष्ट्र धर्म एकच असला पाहिजे तो म्हणजे हिंदुस्थान. आमचा देश हाच आमचा धर्म ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. तुमचं काय हिंदुत्व. जे भाजपवाले आमच्या अंगावर येतायत यांनी मुंबई जिंकली तर खान महापौर होईल. तुम्ही मुंबई जिंकली तर ती अदानीच्या चरणावर समर्पयामी कराल. जानवं घालाल शेंडी ठेवाल आणि म्हणाल अदानीला समर्पयामी. तुम्ही व्यापारी म्हणून मुंबईकडे बघतायय आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतोय, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List