मोदींचा बुरशी धरलेला माल जनता 4 जूनला केराच्या टोपलीत फेकणार, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

मोदींचा बुरशी धरलेला माल जनता 4 जूनला केराच्या टोपलीत फेकणार, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

इंडिया आघाडीची एक्पायरी डेट 4 जून आहे, असे विधान करणाऱया पंतप्रधान मोदींचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला. ‘तुमचा बुरशी आलेला माल आजवर लोकांनी पाहिला आहे. तो माल आम्ही 4 जूनला केराच्या टोपलीत फेकून देणार आहोत. तुमचं सगळंच बुरसटलेलं, गोमूत्रधारी आहे. अशी घाण लोपं नकोयत आम्हाला, असे ठणकावतानाच थापेबाज मोदी सरकार काहीही झाले तरी आम्ही परत येऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावले. 5 जून उजाडेल तेव्हा दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार आलेले असेल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

जळगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार करण पवार आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या आज झंझावाती सभा झाल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपवाले अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आईवडिलांनी संस्कार केलेत की नाहीत, असा प्रश्न आता देशातील जनतेला पडला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने मोदींसाठी मते मागितली होती. तेव्हा मोदींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. मनमोहन सिंग हे रेनकोट घालून आंघोळ करतात असे ते म्हणाले होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या मातीत असे संस्कार कुणावरही होत नाहीत, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केला.

सभेच्या व्यासपीठार महाविकास आघाडीचे उमदेवार करण पवार, श्रीराम पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत , सहसंपर्कप्रमुख (जळगाव लोकसभा) गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महानगरप्रमुख शरद तायडे, ललीता पाटील, वैशाली सूर्यवंशी, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौरी कुलभूषण पाटील तर धुळे येथील सभेमध्ये व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार अनिल गोटे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, माजी आमदार शरद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

इंडिया आघाडीचा विजय झाला तर पाकिस्तानला आनंद होईल, असे मोदी म्हणाले. मग नवाज शरीफांच्या घरी न बोलावताच केक खायला कोण गेले होते?

अत्याचारी रेवण्णाला खेचत आणून मोदींच्या गळ्यात बांधू

बुरसटलेले थापेबाज मोदी सरकार देशात पुन्हा येणार नाही, पण आलेच तर महिलांवर अत्याचार करून फरार झालेला प्रज्ज्वल रेवण्णा याला भाजपवाले सन्मानाने पेंद्रात बोलवतील, सत्कार करतील आणि महिला व बाल कल्याणमंत्री करतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. अत्याचारी, बलात्कारी, पॉर्न फिल्मवाला प्रज्ज्वल रेवण्णा आज फरार आहे. पण इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर तो कुठेही असला तरी खेचत आणून मोदींच्या गळ्यात त्याची जबाबदारी बांधल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला मत म्हणजे मोदींना मत असे मोदी म्हणाले आहेत, असा स्पष्ट इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

तुझ्या रूपा आड येतं भाजपचं सोंग…

रामभक्त आम्हीही आहोत. अयोध्येच्या आंदोलनातील शिवसेनाप्रमुखांची भूमिका देशाला ठाऊक आहे, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी बहिणाबाई चौधरी यांनी भक्तीच्या आडून ढोंग करणाऱयांचा कसा समाचार घेतला आहे, हे सांगितले. ‘देवा पांडुरंगा तुझी भक्ती कशी करू सांग, तुझ्या रूपा आड येतं सावकाराचं रे सोंग’ या बहिणाबाईंच्या ओळी आहेत. फक्त त्यात थोडा बदल करतो ‘प्रभू रामचंद्रा कशी करू भक्ती सांग, तुझ्या रूपा आड येतं भाजपचं सोंग’ अशा शब्दात भाजपच्या ढोंगीपणाचा बुरखा उद्धव ठाकरे यांनी टराटरा फाडला.
देशभरात असंतोष पसरला आहे. महागाईने जनता बेजार आहे. शेतकरी सुखी नाही. बेरोजगारांचे तांडे कामाच्या शोधात फिरत आहेत. तरीही अंधभक्त ‘मोदी मोदी’ असा पंठशोष करत आहेत. या मोदीभक्तांवर उद्धव ठाकरे यांनी सोपानदेव चौधरी यांच्या कवितेतून जोरदार प्रहार केला… ‘येडय़ाच्या पार्श्वभागावर उगवलं बाभूळ, म्हणतो कसा सावलीला बरंय! पण अरे येडय़ा, त्याची मुळं कुठं घुसलीत कळतंय का तुला!’

सुरतच्या बिळात लपलात तरी शेपटय़ा धरून उलटे लटकवू

शिवसैनिकाच्या घरी, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या घरी तुम्ही रात्री-अपरात्री पोलीस पाठवता. अजूनही दमदाटी सुरू आहे. एकतर भाजपात ये, मिंध्यांकडे जा नाहीतर तुरुंगात जा, असे धमकावले जात आहे, असे नमूद करताना आता फक्त 4 जूनपर्यंत थांबा. 5 जून उजाडेल तेव्हा दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार आलेले असेल. मग कुठल्याही बिळात लपा. अगदी सुरतच्या बिळात लपलात तरी ती बिळे खणून काढून तुमच्या शेपटय़ा धरून तुम्हाला उलटे लटकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी तपास यंत्रणांच्या आडून विरोधकांची काsंडी करणाऱया मोदी सरकारला दिला.

दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटताहेत. त्यांना काय वाटते महाराष्ट्रात कुणी मर्द राहिलेले नाही? सर्व अंधभक्त मोदीभक्त झालेत? याद राखा, महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीतला पराक्रम अजून शिल्लक आहे. प्रेमाने आलिंगन देऊ, पण कुणी पाठीत वार केला तर हा महाराष्ट्र वाघनखे काढल्याशिवाय राहणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;