सामना अग्रलेख – करकरे यांचे वीरमरण!

सामना अग्रलेख – करकरे यांचे वीरमरण!

हेमंत करकरे यांना वीरमरण आले व देशाला त्यांच्या हौतात्म्याचा गर्व आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना करकरे यांच्या हौतात्म्याचा संदर्भ दिला. भारतीय जनता पक्षाकडे सध्या कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांनी या विषयास फोडणी दिली. मुळात सध्या भाजपच्या गोटातील ‘स्टार प्रचारक’ हसन मुश्रीफ यांच्याच घरातून करकरे यांची बदनामी सुरू झाली. मुश्रीफ यांचे तेव्हा पोलीस खात्यात असलेले भाऊ एस. एम. मुश्रीफ यांनी करकरे यांच्या मृत्यूमागे रहस्य असल्याचे प्रश्न उपस्थित केले. करकरे हे देशासाठी शहीद झाले व देशाला या वीरपुत्राचा अभिमान आहे. शिवसेनेची तीच भूमिका आहे. हौतात्म्याचे धिंडवडे कोणीच काढू नयेत.

निवडणूक काळात कधी कोणत्या विषयाचा धुरळा उडवला जाईल व गाडलेले मुडदे उकरून काढले जातील त्याचा नेम नाही. ‘26/11’चा मुंबईवरील हल्ला हा दहशतवाद्यांचाच हल्ला होता व त्यामागे पाकिस्तानचेच षड्यंत्र होते. पाकिस्तानने समुद्रमार्गे पाठवलेल्या कसाब व त्याच्या टोळीने ताज महाल हॉटेल, कामा इस्पितळ, छाबड हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा सार्वजनिक ठिकाणी हल्ले केले. रक्ताचे सडे पाडले. मुंबईसह संपूर्ण देश हा हल्ला प्रत्यक्ष पाहत होता. मुंबईचे पोलीस दल बेसावध असताना हल्ला झाला. त्यामुळे एकच धावाधाव झाली. कसाब टोळीच्या हल्ल्यात तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह वीसेक पोलिसांना हौतात्म्य पत्करावे लागले. हे सर्व अधिकारी दहशतवाद्यांच्याच गोळय़ांना बळी पडले. त्यांच्या हौतात्म्याने देश हळहळला. मरीन लाइन्स येथे फौजदार तुकाराम ओंबळे यांनी पळून जाणाऱया कसाबला अडवले व झडप घातली. त्या झटापटीत ओंबळे हे जागीच शहीद झाले. कसाबच्या हल्ल्यात ओंबळे शहीद झाले हे त्या दिवशी जगाने पाहिले व ओंबळे यांच्या शौर्यास मानवंदना दिली. कामठे, करकरे, साळसकर शहीद झाले तर सदानंद दाते यांच्यासह इतर पोलीस अतिरेक्यांशी लढतानाच गंभीर जखमी झाले. अशोक कामठे यांच्यासोबत ‘चकमक’फेम विजय साळसकर यांनाही कामा इस्पितळाच्या अंधाऱ्या गल्लीत वीरमरण आले. अंधाराचा फायदा घेऊन अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला हे सत्य आहे. ‘26/11’च्या हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक पोलिसाला पाकड्या अतिरेक्यांचीच गोळी लागली, पण हेमंत करकरे यांना अतिरेक्यांची गोळी लागली नसून त्यांची

हत्या झाल्याची थिअरी

का सुरू झाली? हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामागे कोणाचे तंत्र आहे हे समजून घेतले पाहिजे. 26/11चा खटला चालवणारे उज्ज्वल निकम हे वकील भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर मुंबईत निवडणूक लढत आहेत. निकम हे छुपे संघवादी होते हे आता उघड झाले व त्यांनी कसाबच्या खटल्यातील अनेक सत्य दडवले व प्रचारात अनेक खोटे मुद्दे आणले. ते कशासाठी? कसाब हा एक भयंकर अपराधी होता व त्यास इतर सामान्य कैद्याप्रमाणेच ऑर्थर रोड तुरुंगात वागणूक मिळत होती. तरीही अॅड. निकम खोटे बोलत राहिले, पण महत्त्वाचा विषय आहे हेमंत करकरे यांचा. करकरे यांच्या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच भांडण सुरू होते. संघ परिवार करकरे यांच्या कार्यपद्धतीवर व त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर केलेल्या कारवाईवर खूश नव्हता. मालेगाव बॉम्बस्पह्टाचे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून हेमंत करकरे हाताळत होते. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद वगैरे संघ परिवाराशी संबंधित लोकांना करकरे यांनी अटक केली. मालेगावातील बॉम्बस्फोट हे संघाचे कारस्थान असल्याचे करकरे व त्यांच्या पथकाचे म्हणणे होते व तपासात त्यांनी तसे पुरावे समोर आणले. प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांचा कोठडीत छळ सुरू आहे व त्यांच्या तोंडून हवे ते काढून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संघाचे म्हणणे होते. मालेगावचा कट करकरे यांच्यामुळे उघडा पडला व देशात हिंदू-मुसलमान दंगे घडविण्याचा ‘डाव’ कसा खेळला जात आहे ते करकरे यांच्यामुळे उघड झाले. त्यामुळे

संघ परिवार व करकरे

यांच्यात ठिणगी पडली. करकरे यांच्या खेळीमागचे खरे सूत्रधार दुसरेच कोणी तरी आहेत, असे संघ वर्तुळात बोलले जात होते व त्याच वेळी मालेगावचा तपास करकरे अधिक खोलात जाऊन करू लागले. त्यातून इतर अनेक गोष्टी उघड्या होतील हे भय संघ परिवारास वाटू लागले व त्यांनी करकरे यांच्याविरुद्ध मोहीम सुरू केली. ही मोहीम रंग भरत असतानाच मुंबईवर 26/11चा हल्ला झाला व त्यात करकरे हे अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी गेले, हे वास्तव नाकारता येणार नाही. 26/11च्या हल्ल्यात इतर सर्व पोलीस दहशतवादाचे बळी पडले व एकटे करकरे हे संघाशी संबंधित पोलिसाच्या गोळीबारात मरण पावले हे तर्कसंगत नाही. हेमंत करकरे यांना वीरमरण आले व देशाला त्यांच्या हौतात्म्याचा गर्व आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना करकरे यांच्या हौतात्म्याचा संदर्भ दिला. भारतीय जनता पक्षाकडे सध्या कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांनी या विषयास फोडणी दिली. भाजपचा हा स्वभाव आहे. मुळात सध्या भाजपच्या गोटातील ‘स्टार प्रचारक’ हसन मुश्रीफ यांच्याच घरातून करकरे यांची बदनामी सुरू झाली. मुश्रीफ यांचे तेव्हा पोलीस खात्यात असलेले भाऊ एस. एम. मुश्रीफ यांनी करकरे यांच्या मृत्यूमागे रहस्य असल्याचे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी कागल येथे जाऊन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करावी. करकरे हे देशासाठी शहीद झाले व देशाला या वीरपुत्राचा अभिमान आहे. शिवसेनेची तीच भूमिका आहे. हौतात्म्याचे धिंडवडे कोणीच काढू नयेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केलेत. पहिलं म्हणजे 2019 ला स्थापन झालेली महाविकासआघाडी 2014 मध्येच बनवण्याचं ध्येय...
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?
Health : रोज सकाळी ब्रेड खात असाल तर सावधान, शरीराचं भयंकर नुकसान
जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरुद्ध महसूल विभागाची कारवाई, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
सगेसोयर्‍याची अंमलबजावणी न केल्यास समाजाला निवडणुकीत उतरविणार- मनोज जरांगे पाटील
कान्सच्या कार्पेटवर दिसणार मराठी अभिनेत्रीचा स्वॅग, वाचा बातमी