तेरा तारखेला भाजपचे ‘तीन तेरा’ वाजवा! उद्धव ठाकरेंचे जळगावकरांना आवाहन

तेरा तारखेला भाजपचे ‘तीन तेरा’ वाजवा! उद्धव ठाकरेंचे जळगावकरांना आवाहन

जो सिंह आग्र्यापुढे झुकला नाही, त्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रावर चालून येणाऱ्यांना मोडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असा वज्रनिर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावात बोलून दाखवला. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचारार्थ आलेल्या उद्धव ठाकरे यांनी तेरा तारखेला मतदानाच्या दिवशी भाजपचे तीन तेरा वाजवा, असं आवाहनही जळगावकरांना केलं.

यावेळी झालेल्या विराट सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी जळगावसोबतचं आपलं नातं उलगडलं आणि भाजपच्या ढोंगावर फटकारेही मारले. ते म्हणाले की, शिवसेना काका-पुतण्याला एकत्र आणते. भाकड जनता पक्ष घरं आणि काका-पुतण्याला पण फोडतो. खान्देश म्हटला की मला माझं लहानपण आठवतं. सोपानदेव चौधरी आठवतात. बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. बहिणाबाई या खान्देशच्या खूप मोठ्या कवयित्री. इतक्या सोप्या भाषेत त्यांनी जीवन समजावून सांगितलं. आज भाजपवाले पराभवाच्या भुताच्या भीतीने अयोध्येला लोटांगण घालताहेत. पण मनी नाही भाव आणि देवा मला पाव.. असं असेल तर तो कसा पावणार? आम्हीही श्रीरामाचे भक्त आहोत. राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचं काय योगदान आहे. हे कुणी शिकवण्याची गरज नाही. तमाम जनतेला माहितीये. बहिणाबाई म्हणायच्या की, देवा पांडुरंगा, तुझी भक्ती कशी करू सांग. तुझ्या रुपाआड येतं सावकाराचं रे सोंग. तसंच मला आज प्रभू रामचंद्राला मला सांगायचंय. प्रभू रामचंद्रा, तुझी भक्ती कशी करू सांग.. कारण तुझ्या रुपाआड येतं भाजपचं रे ढोंग. सोपानदेव चौधरींच्या शब्दांत थोडं बदल करून इथे सांगतो. आम्ही लहान मुलं होतो, तेव्हा सोपानदेव आजोबांचे मित्र म्हणून आमच्या घरी यायचे. तेव्हा ते अस्सल अहिराणी भाषेत गमतीजमती सांगायचे. हे मी सांगतोय कारण, आजच्या परिस्थितीला ते चपखल बसतंय. आज देशात असंतोष पसरला आहे. चार जूनला लोकशाहीचा विजयोत्सव साजरा करणार आहोत. मोदी सरकारचं विसर्जन करणार आहोत. तरी देखील काही अंधभक्त मोदी मोदी करताहेत. त्यांना मला सोपानदेवांची कविता ऐकवायची आहे. ते म्हणायचे, येड्याच्या पार्श्वभागावर उगवलं बाभूळ, म्हणतो सावलीला बरं आहे. पण त्याची मुळं कुठे गेली आहेत, ते कळतंय का तुला. तसं हे बाभळीचं झाड जे त्यांच्या पार्श्वभागावर उगवलंय, मुळं किती खोल गेली आहेत, ते त्यांना कळत नाहीये. अजूनही जप सुरू आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘भाजपवाल्यांना एक विधान, एक निशान, एक प्रधान करायचं आहे. एक निशान म्हणजे भाजपचं फडकं नाही, तो माझ्या भारतमातेचा झेंडा आहे. एक विधान म्हणजे तुमच्या बुरसटलेल्या गोमुत्रधाऱ्यांनी लिहिलेलं विधान नसेल. तर ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान असेल. आणि एक प्रधान म्हणजे मोदी नाहीत, 140 कोटी जनता जो ठरवेल तो प्रधान असेल. चार दिवसांपूर्वी अमित शहा कोकणात आले आणि मला आव्हान देऊन गेले की कलम 370 वर बोलून दाखवा, राम मंदिराविषयी बोलून दाखवा. मी म्हणतो अमित शहा तुमच्यात हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नांना उत्तर देऊन दाखवा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्या.’ असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना केलं.

‘मोदींना वाटतं की महाराष्ट्रात भरपूर सभा घेतल्या की महाराष्ट्र फसेल. तर तसं नाहीये. महाराष्ट्र भोळा आहे, भाबडा आहे. पण, महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे, कणखर आहे. महाराष्ट्राची ओळख, राकट देशा, दगडांच्या देशा, मर्दांच्या देशा अशी आहे. ती लाचारांच्या, गद्दारांच्या, चोरांच्या देशा अशी आम्ही होऊ देणार नाही. मी ताठ मानेने उभा आहे. तुम्ही माझी साथ देणार की नाही? जो या महाराष्ट्राचा सिंह आग्र्यात जाऊनही झुकला नव्हता, त्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आजही ताठ मानेने उभा राहतोय. आम्ही शपथ घेतो की, महाराजांच्या नावाला कलंक लावणार नाही. आम्ही मोडणार नाहीच पण महाराष्ट्रावर चालून येणाऱ्यांना मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. आता मला एकच वचन हवं आहे. 13 तारखेला भाजपचे तीन तेरा वाजवायचे आहेत.’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी जळगावकरांना केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

… तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा … तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा
उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाचा भाजपला आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून...
पुढील पाच दिवस देशात उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा इशारा
Video एकाच व्यक्तीने 8 वेळा दिले भाजपला मत, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?
Health : रोज सकाळी ब्रेड खात असाल तर सावधान, शरीराचं भयंकर नुकसान