Mumbai News – गोवंडीमध्ये रोख रकमेच्या वादातून नारळ विक्रेत्याची हत्या, आरोपीला अटक
रोख रकमेच्या वादातून नारळ विक्रेत्याची हत्या केल्याची घटना मुंबईतील गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. मीर कासिम (25) असे हत्या झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. साजिद कुरेशी उर्फ मेहफूज उर्फ सैफू चिकना असे अटक आरोपीचे नाव आहे.
गोवंडी येथील शिवाजी नगरमधील रहिवासी मीर कासिम याचा नारळ पाण्याचा व्यवसाय करत होता. तो त्याचा मोठा भाऊ अल्ताफ नदाब आणि चुलत भावांसोबत राहत होता. नारळ ठेवण्यासाठी त्याने रोड क्रमांक 6 वर बीएमसी शाळेच्या गेटजवळ एक लहान गोदाम भाड्याने घेतले होते. मीर कासिम दररोज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास गोदामात माल उतरवत असे. मालासाठी ते तो दररोज 50000 ते 80000 रुपये रोख घेऊन जात असे.
नेहमीप्रमाणे कासिम 30 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.30 वाजता नारळ घेण्यासाठी घराबाहेर पडला. तासाभरानंतरही त्याने फोन न उचलल्याने त्याचा भाऊ अल्ताफ आणि चुलतभावांनी त्याचा शोध घेतला. त्यांना कासिम बीएमसी शाळेच्या गेटजवळ बेशुद्धावस्थेत आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. भावाने त्याला आधी नूर हॉस्पिटल आणि नंतर राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता साजिद कुरेशी हा कासिमचा पाठलाग करताना दिसून आला. कासिम शौच करण्यासाठी थांबला तेव्हा कुरेशीने चाकू काढला आणि त्याचा पाठलाग केला. नंतर कॅमेऱ्यात कासिम त्याच्या गोदामाकडे धडपडत आणि शाळेच्या गेटजवळ कोसळताना दिसला.
सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून पोलिसांनी कुरेशीचा सहभाग असल्याची पुष्टी करत त्याला अटक केली. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्याच्या कलम 103, 135 आणि 37(1)(अ) अंतर्गत हत्या आणि शस्त्र बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List