मुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळाचा ‘पंचतारांकित’ आढावा! 120 मिनिटांच्या बैठक व पत्रकार परिषदेसाठी खाण्याची चंगळ

मुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळाचा ‘पंचतारांकित’ आढावा! 120 मिनिटांच्या बैठक व पत्रकार परिषदेसाठी खाण्याची चंगळ

दुष्काळाच्या भयंकर वडवानलात मराठवाडा होरपळून निघतोय. हंडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ लोकांवर आली आहे. माणसांबरोबर मुक्या जनावरांचेही चारापाण्याअभावी हाल होत आहेत. अशा भयावह परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील दुष्काळाचा ‘पंचतारांकित’ आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला पाच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी दांडी मारली. ‘चारापाणी मुबलक आहे, सगळे आबादीआबाद आहे’, असा दावा करून मुख्यमंत्र्यांचे विमान उडाले! तसेच या 120 मिनिटांच्या बैठक व पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांची ‘पंचतारांकित’ सरबराई केली गेली. मंत्र्यांसाठी खास सँडविचेस, पेस्ट्रीज, वेफर्स, केक, काजू, बदाम, पिस्ते मागवण्यात आले होते.

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांवर गेल्या वर्षी पावसाने अवकृपा केली. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरिपाचे वाटोळे झाले. त्यानंतर अवकाळी, गारपिटीने मराठवाड्यात थैमान घातले. अस्मानी संकटाने उरल्यासुरल्या खरिपाचा चिखल केला, तर येणार्‍या रब्बी हंगामालाही संकटात टाकले. दोन्ही हंगाम हातचे गेल्याने शेतकरी वार्‍यावर आला. अतिवृष्टी, गारपिटीचे पंचनामे करून मदत देण्याचा सरकारी शब्दही हवेतच विरला. पाऊसच कमी झाल्याने धरणे, तलावातही साठा जेमतेम झाला. हे पाणी जानेवारीपर्यंत कसेबसे पुरले. फेब्रुवारीपासूनच मराठवाड्याच्या अनेक भागात टँकर सुरू करण्याची वेळ आली. पाऊसच नसल्यामुळे चार्‍याची चणचणही निर्माण झाली. चारापाणी नसल्यामुळे उमदी जनावरे कसायाच्या किंवा बाजाराच्या वाटेला लागली. मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागली. मार्च, एप्रिल आणि आता संपत आलेला मे महिना असे तीन महिने राज्य सरकारला मराठवाड्याकडे बघण्याची उसंतच मिळाली नाही.

मुख्यमंत्र्यांची पंचतारांकित बडदास्त

दुष्काळाने मराठवाडा भुकेकंगाल झाला आहे. पाण्यासाठी सगळीकडून टाहो फोडण्यात येत आहे. हाताला काम नसल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सोयाबीन, कापूस घरातच पडून असल्याने शेतकरीही हवालदिल झाला आहे. पण ‘राजेशाही’ थाटात वावरणार्‍या विभागीय आयुक्तालयाने दुष्काळी मराठवाड्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांची ‘पंचतारांकित’ सरबराई केली. मराठवाडी जनतेला पिण्यासाठी पाणी नाही, पण बैठकीसाठी खास मिनरल वॉटरच्या बाटल्या मागवण्यात आल्या. खास कुरकुरीत बिस्किटे, खमंग कुरकुरे, वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस, पेस्ट्रीज, वेफर्स, केक, काजू, बदाम, पिस्तेही मागवण्यात आले होते.

मुख्यमंत्री आले, आढावा घेतला आणि निघून गेले

महाराष्ट्रातील मतदान संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मराठवाड्यात आले. दुपारी २ वाजता त्यांचे छत्रपती संभाजीनगरात आगमन झाले. मुख्यमंत्र्यांचा काफिला विभागीय आयुक्त कार्यालयात गेला. अवघ्या दोन तासात म्हणजेच १२० मिनिटात मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर तसेच धाराशिव या जिल्ह्यातील दुष्काळी फायलींवर नजर टाकून आणि त्यानंतर पत्रकारांना सगळे काही आबादीआबाद असल्याचे सांगून मुख्यमंत्री निघून गेले.

सावंत, महाजन आले… इतर पालकमंत्री गायब

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यात येणार असल्यामुळे आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य होती. परंतु धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत आणि नांदेड आणि लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन बैठकीला आले. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, परभणी आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी या बैठकीला दांडी मारली.

पॅकेज, मदत, पंचनामे… मुख्यमंत्री विसरले

आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ४५ हजार कोटींच्या पॅकेजविषयी विचारण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री शुन्यात गेले. अतिवृष्टी, गारपिटग्रस्तांना मदत मिळणार होती त्याचे काय झाले असे विचारले असता मुख्यमंत्री काही बोललेच नाहीत. चारा द्या, पाणी द्या असे म्हणत मुख्यमंत्री आले तसे भुर्रऽऽ उडाले!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ग्राहकाला गरम समोसा मागणे पडले महागात, दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके ग्राहकाला गरम समोसा मागणे पडले महागात, दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके
समोसे अनेकांचा आवडता खाद्यप्रकार आहे. स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारे समोसे गरमागरम मिळण्यासाठी खवय्यांचे प्राधान्य असते. परंतु आता जर तुम्ही...
Sanjay Raut : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर मोदी सरकार ‘या’ तीन पक्षांचा गेम करणार, पक्ष फोडण्याचं काम सुरू, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
वरूण धवण लेकीसोबत पहिला फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘मुलीचा बाप होण्याचा आनंद म्हणजे…’
धक्कादायक प्रकार उघड; रवींद्र वायकरांच्या मेहुण्याने वापरला EVM अनलॉक करणारा फोन
पीएम मोदी – मेलोनी यांच्या ‘मलोडी’ व्हिडीओवर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया
सलमान खानला व्हिडीओच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई…
मासिक पाळीचा ‘तो’ सीन शूट करताना कशी होती अविका गौरची अवस्था? म्हणाली, ‘दिग्दर्शकांनी मला विचारलं…’