पांढरा राइस की ब्राऊन राइस… डायबिटीजचे रुग्ण कोणता भात खाऊ शकतात? अन् कोणत्या भातामुळे शुगर वाढू शकते?
आताच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे डायबिटीज होणे अगदीच सामान्य झालं आहे. पण हा आजार तेवढाच गंभीरही होत चालला आहे. डायबिटीजच्या रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात. अनेक पदार्थ आणि पेये टाळावी लागतात. पण बऱ्याच डायबिटीजच्या रुग्णांना जेवताना भात खाण्याचा मोह मात्र आवरत नाही. पण भात हा नक्कीच डायबिटीजच्या रुग्णांसाठी धोकादायका मानला जातो. कारण त्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता असते. पण भातातही दोन प्रकार असतात पांढरा आणि ब्राऊन राइस. यांपैकी कोणता भात डायबिटीजचे रुग्ण खाऊ शकतात? हे जाऊन घेऊयात.
पांढरा कि ब्राऊन राइस
मधुमेहाच्या वाढत्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि याचे एक प्रमुख कारण म्हणजे खराब आहार आणि जीवनशैली. आपण आपल्या दैनंदिन आहारात वापरत असलेल्या भाताकडे लक्ष देणे विशेषतः महत्त्वाचे आहे.
पांढरा तांदूळ
शक्यतो भारतीय घरांमध्ये पांढऱ्या तांदळाचा भात खाल्ला जातो. डायबिटीज असलेल्या लोकांसाठी पांढरा भात सामान्यतः निषिद्ध असतो. कारण पांढऱ्या भातामुळे शुगर वाढते असे म्हटले जाते. पण यामागे नेमकं काय सत्य आहे हे जाणून घेऊयात.
पांढरा भात खरंच टाळला पाहिजे का?
तज्ज्ञांच्या मते, पांढरा तांदूळ किंवा पॉलिश केलेला तांदूळ यामध्ये फायबर आणि पोषक तत्वांचे प्रमाण कमी असते. ते तयार करताना, बाहेरील आवरण म्हणजे कोंडा काढून टाकला जातो. फक्त स्टार्च शिल्लक राहतो.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी पांढरा भात नुकसानकारक का आहे?
कारण या तांदळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो.
पांढरा भात लवकर पचतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवते.
सतत पांढरा भात खाण्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढू शकतो.
ब्राऊन राइस का चांगला आहे?
ब्राऊन राइस किंवा पॉलिश न केलेला तांदूळ, त्याचा कोंडा आणि जर्म लेयर टिकवून ठेवतो, ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. म्हणून, मधुमेहींसाठी ते खाणे फारसं नुकसानकारक नसते. ज्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी ब्राऊन राइस एक चांगला पर्याय आहे.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी ब्राऊन राइस चांगला पर्याय का ठरू शकतो?
ब्राऊन राइसमध्ये जीआय पांढऱ्या तांदळापेक्षा कमी असतो.
हा भात हळूहळू पचतो ज्यामुळे रक्तातील साखर स्थिर राहते.
यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
भात किती आणि कसा खावा?
तज्ज्ञांच्या मते, जर मधुमेहाच्या रुग्णांना हवे असेल तर ते त्यांच्या आहारात ब्राऊन राइस समाविष्ट करू शकतात. परंतु त्यांनी ब्राऊन राइस देखील जास्त प्रमाणात सेवन करू नये.
या चुका करू नका
फक्त ब्राऊन राइसवर अवलंबून राहू नका, तर तुमच्या आहारात विविध पदार्थ देखील समाविष्ट करा.
तळलेले पदार्थ किंवा तुपात शिजवलेले पदार्थ खाणे टाळा.
रात्री जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते, म्हणून रात्री भात खाणे टाळा किंवा कमी प्रमाणात खा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List