भावासोबतचे संबंध संपले, मी शेवटच्या श्वासापर्यंत RJD मध्ये परतणार नाही; तेज प्रताप यादव यांचे मोठे विधान
बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. एनडीए पुन्हा बाजी मारणार की तेजस्वी यादव मुसंडी मारून सत्तेत येणार याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेले असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी मोठे विधान केले आहे. भावासोबतचे संबंध संपले असून मी शेवटच्या श्वासापर्यंत RJD मध्ये परतणार नाही, असे तेज प्रताप यादव ‘एनडीटीव्ही’शी बोलताना म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीआधी तेज प्रताप यादव यांची घरातून आणि आरजेडी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर तेज प्रताप यांनी वेगळा मार्ग निवडत जनशक्ती जनता दल नावाचा पक्ष काढला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तेज प्रसात यादव स्वत: वैशाली जिल्ह्यातील महुआ मतदारसंघातून निवडणूक लढले आहेत. आज त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय भविष्य काय हे देखील निकालातून समोर येईल. तत्पूर्वी त्यांनी आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या.
लोक आदरासाठी जगतात आणि मरतात. कोणीही त्याबाबत तडजोड करत नाहीत. पण तेजस्वी यादवने माझा अपमान केला. आमच्यात जे काही झाले ते झाले. आता मी वेगळा मार्ग निवडला असून हिंमतीने पुढे जात आहे. आता मी शेवटच्या श्वासापर्यंत आरजेडीमध्ये परतणार नाही. माझे माझ्या भावाची असलेले संबंधही संपले असून तेजस्वी राघोपूर तर मी महुआतून निवडणूक लढत आहे. मी माझे कर्तव्य बजावले असून मी त्याचे काहीही देणे लागत नाही, असेही तेज प्रताप यादव म्हणाले.
आई-वडिलांचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत असतात. आपल्या मुलाचे भले व्हावे अशी पालकांची इच्छा असते, असेही तेज प्रताप म्हणाले. माझे माझ्या आई-वडिलांशी आणि भावंडांशी असलेले संबंध आणि राजकारण वेगळे आहे, असेही ते पुढे म्हणाले. तसेच निवडणुकीनंतर भाजपशी युती करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना तेज प्रताप यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे म्हटले.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 व 11 नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मिळून विक्रमी 67.13 टक्के मतदान झाले. पुरुषांच्या तुलनेत महिलांची मतदानाची टक्केवारी अधिक होती. 2020 च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 72 लाख मते अधिक पडली. त्याचा फायदा कोणाला झाला हे आज कळेल. निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List