पोलीस डायरी – पुण्यातील डोळस कुटुंब उद्ध्वस्त, बुवा व बायांपासून सावधान!

पोलीस डायरी – पुण्यातील डोळस कुटुंब उद्ध्वस्त, बुवा व बायांपासून सावधान!


>> प्रभाकर पवार 

संगणक अभियंता असलेले दीपक डोळस हे पुण्याच्या कोथरूड येथील उच्चभ्रू वस्तीत राहत होते. ते इंग्लंडमध्ये आयटी इंजिनीअर म्हणून १० वर्षे नोकरीला होते. दीपक डोळस हे अत्यंत सुखवस्तू कुटुंबातील! पैशांची त्यांना कधीच चणचण भासली नाही, परंतु त्यांच्या वयात आलेल्या दोन मुली मात्र कायम आजारी एक मुलगी तर मतिमंद आहे. त्यामुळे डोळस दांपत्य नेहमी बेचैन, उद्विग्न, खिन्न असायचे. या विमनस्क अवस्थेतून बाहेर पडावे म्हणून डोळस दांपत्य पुण्याच्या एका भजनी मंडळात सामील झाले. त्यासाठी त्यांनी इंग्लंडही सोडले. भजनी मंडळात डोळस यांची दीपक खडके नावाच्या भंपक बाबाशी ओळख झाली. (ही २०१८ सालची घटना आहे.) तेव्हापासून डोळस दांपत्याचा खडतर प्रवास सुरू झाला. दीपक खडकेने वेदिका कुणाल पंढरपूरकर व तिचा पती कुणाल यांच्याशी डोळस दांपत्याची ओळख करून दिली. “वेदिका ही सर्व संकटे दूर करते. तिच्या अंगात शिवशंकर महाराज संचारतात. तुमच्या मुली लवकर बऱ्या होतील, असेही दीपक खडकेने या दांपत्याला सांगितले. आपल्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या मुलींच्या भल्यासाठी डोळस दांपत्याने दीपक खडके या बाबाच्या मंत्रमुग्ध बोलण्यावर विश्वास ठेवला. ते मोहित झाले. त्यानंतर वेदिका या भोंदू, बेवकूफ बाईच्या ते पूर्णपणे जाळ्यात अडकले. ती जसे सांगत होती त्याप्रमाणे कोणताही प्रश्न न विचारता त्याचे डोळस दांपत्य पालन करीत होते. सावज टप्प्यात आले आहे, शिकार करण्यास योग्य आहे याची खात्री पटल्यावर वेदिकाने डोळस दांपत्याच्या पुणे व इंग्लंडमधील संपूर्ण मालमत्तेची, बँक खात्यात किती पैसे आहेत याची माहिती करून घेतली. “इंग्लंड व पुण्यातील आपल्या सर्व मालमत्तांमध्ये दोष आहेत. त्या आपणास विकाव्या लागतील, तरच तुमच्या मुली बऱ्या होतील,” असे डोळस दांपत्याला वेदिकाने सांगितले. डोळस दांपत्याने वेदिकाने सांगितल्याप्रमाणे सर्व मालमत्ता विकल्या. पुण्यातील राहते घरही त्यांनी ठेवले नाही. बेघर झालेल्या डोळस दांपत्याने भाड्याच्या घरात आसरा घेतला तरीही मुली काही बऱ्या झाल्या नाहीत. वेदिका या लबाड महिलेला या दांपत्याने मुली आजारातून का मुक्त होत नाहीत? असे विचारले तेव्हा वेदिका म्हणाली, आपल्या बँकेत जितकी रक्कम जमा झाली आहे. ती रक्कम आमच्या बँक खात्यात वळवा. तरच तुमच्या मुली ठणठणीत होतील. डोळस दांपत्याने भीतीपोटी तेही केले. तरीही मुलींच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. अखेर 14 कोटी रुपयांची मालमत्ता विकून उघड्यावर आलेल्या दीपक डोळस दांपत्याने पोलिसांकडे धाव घेतली. पुणे पोलिसांनी मांत्रिक बाबा दीपक खडके, त्याची शिष्या वेदिका कुणाल पंढरपूरकर हिच्यासह तिघांना गेल्या आठवड्यात अटक केली. वेदिकाची मोहिनी विद्या डोळस दांपत्यांवर प्रभावी ठरली, परंतु तिला व तिच्या बाबाला जेलमध्ये जावे लागले.

मांत्रिक महिलेच्या अंगात शिवशंकर महाराज संचारतात यावर पुण्याच्या उच्चशिक्षित अभियंत्याने आंधळा विश्वास ठेवावा याचे आश्चर्य वाटते. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचाच हा प्रकार होय. पुण्यातील डोळस कुटुंबीयांचे प्रकरण गाजत असतानाच मुंबईतील अॅन्टॉप हिल येथील तरुणीला एका मांत्रिकाने 33 लाख रुपयांना ऑनलाइन फसविल्याचे गेल्याच आठवड्यात उघडकीस आले आहे. पीडित तरुणीचे ब्रेकअप झाल्याने ती निराश झाली होती. यूट्यूब चॅनेल, इन्स्टाग्रामवर ती सक्रिय होती. अशा वेळी “टॅरो कार्डवर भविष्य पाहा. आपल्या सर्व समस्या दूर होतील” अशी जाहिरात प्रेमभंग झालेल्या या तरुणीने पाहिली. ही तरुणीही उच्चशिक्षित असून एका कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदावर काम करते. तीही अंधश्रद्धेला बळी पडली. ज्या मांत्रिकाने इन्स्टाग्रामवर जाहिरात दिली होती, त्या जाहिरातीवरील मोबाइलवर या तरुणीने फोन केला असता हा मांत्रिक म्हणाला, “आपल्यावर काळी जादू करण्यात आली आहे. काही विधी करावे लागतील.” मांत्रिकाच्या या भूलथापांवर वैफलग्रस्त तरुणीने विश्वास ठेवला. ऑनलाइन एका देवीची त्या मांत्रिकाने पूजा केली. त्या तरुणीला थेट व्हिडीओ कॉल करून दाखविले. पूजा संपल्यावर त्या तरुणीने त्या मांत्रिकाच्या ‘क्यूआर कोडवर पैसे पाठविले तरीही त्या तरुणीचे काही ब्रेकअप झालेल्या प्रियकराबरोबर जुळले नाही. तेव्हा त्या मांत्रिकाने त्या तरुणीला रोज नवनवीन विधी करायला सांगून तिच्याकडून तब्बल 33 लाख रुपये उकळले. आगीतून फुफाट्यात गेलेल्या या तरुणीची मानसिकता आणखी खालावली तेव्हा तिने पोलिसांत तक्रार केली. बुवाबाजी किंवा मंत्रातंत्रांचा वापर करून भक्तगणांना आकर्षित करण्यासाठी फार काही कौशल्य लागत नाही. बुवाबाजी हा बिनभांडवली धंदा आहे. त्यासाठी बुद्धीही लागत नाही. बरेच भोंदू बुवा हे बुद्धीची वाढ खुंटलेले ‘स्किझोफ्रेनिक’ पेशंट असतात. आपल्या जवळच्या आप्तेष्टांना ते आपल्या कथित चमत्कारांविषयी प्रचार करावयास लावून भक्त मंडळी गोळा करतात आणि गडगंज माया उभी करतात. दीपक खडके व वेदिका पंढरपूरकर यांनीही तेच केले आहे. पुण्यात या भोंदू मांत्रिकांनी भक्तगणांची दिशाभूल करून करोडोंची माया गोळा केली आहे. पूर्वी अशिक्षित व गरीब लोक भोंदूबाबांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवायचे, परंतु आता दीपक डोळससारखे उच्चशिक्षितही मंत्रतंत्रांवर विश्वास ठेवू लागले तर का नाही अंधश्रद्धा, बुवाबाजी वाढणार?

मानवी जीवन समृद्ध होईल असे एकही काम कुठल्या बाबाने केले नाही. उलट आपल्या चमत्काराची सर्वत्र भीती निर्माण केली. “बुवा, बाबा, महाराज म्हणजे वासनांचे, स्वार्थाचे, लोभीपणाचे, लंपटपणाचे, व्यभिचाराचे जणू धगधगते कुंडच,” असे आचार्य अत्रे म्हणायचे तेच खरे आहे. आसाराम बापू हे त्याचे एक ज्वलंत उदाहरण होय. आसाराम बापूने साम, दाम, दंडाने सर्व काही मिळविले. आपल्या मार्गात येणाऱ्यांचाही काटा काढला. म्हणूनच आसाराम बापू गेल्या १२ वर्षांपासून जेलमध्ये आहे. दीपक खडके व वेदिकाला वेळ मिळाला असता तर त्यांनीही डोळस दाम्पत्याला गायब केले असते. त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. त्यामुळे डोळस कुटुंबीयांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या दीपक खडके, वेदिका व त्यांच्या साथीदारांना जितकी कठोर शिक्षा देता येईल तितकी शिक्षा न्यायालयाने दिली पाहिजे, असे पुणेकर बोलत आहेत. विशेष म्हणजे अलीकडे बुवाबाबांच्या या अघोरी धंद्यात वेदिकासारख्या बायाही सामील होत आहेत. तेव्हा अशा नीच व कपटी बुवा-बायांपासून जनहो, सावधान!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात सिंघाडा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हिवाळ्यात सिंघाडा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
सिंघाडा हे एक अत्यंत पौष्टिक आणि निरोगी फळ आहे. हिवाळ्यात आपल्याला बाजारात सिंघाडे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. सिंघाड्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे...
हिवाळ्यातील हे आहे ‘गोल्डन सुपर सीड’, शरीराला उबदार तर ठेवेलच, रक्तातील साखरही नियंत्रित होईल, वाचा याचे आश्चर्यकारक फायदे
‘डोमेस्टिक क्रिकेट खेळा’ BCCI चा विराट कोहली आणि रोहित शर्माला सल्ला; रोहितने भूमिका केली स्पष्ट
Video दिल्ली बॉम्बस्फोटाचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, भर ट्राफिकमध्ये…
Delhi Blast Case : दिल्ली स्फोटाप्रकरणी सुरक्षादलाकडून मोठी कारवाई, जम्मू कश्मीरमधून आणखी एक डॉक्टर ताब्यात
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर रस्त्यात गाय आडवी आल्याने भीषण अपघात, दोनजण गंभीर तर गायीचा दुर्दैवी मृत्यू
भोपळा हे नाव ऐकताच, तुम्हीपण नाक मुरडताय का? वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे