दिग्गजांना धक्का! नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, मुंबई महानगरपालिका प्रभागांची आरक्षण सोडत
मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत आरक्षण बदलल्याने सर्वच पक्षांतील अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यामुळे आता निवडणूक लढवायचीच असेल तर दिग्गजांना आपल्या प्रभागाच्या लगतच्या प्रभागात संधी शोधण्याची कसरत करावी लागणार आहे. मात्र हे आरक्षण बदलल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात शाळकरी मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठय़ा काढून वॉर्डनिहाय आरक्षण काढण्यात आले. यामध्ये एकूण 227 प्रभागांतील 114 प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी व अनुसूचित जातीसाठी एकूण 15 वॉर्ड राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी 8 वॉर्ड आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी दोन वॉर्ड राखीव असून त्यापैकी एका ठिकाणी महिला उमेदवारासाठी आरक्षण असेल, तर ओबीसींसाठी मुंबईतील 61 वॉर्ड राखीव असतील. यामध्ये 31 महिला ओबीसी उमेदवारांचा समावेश असेल, तर सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 61 वॉर्ड राखीव असून सर्वसाधारण प्रवर्गाच्या 31 महिला उमेदवारांचा समावेश असेल.
g ठाण्यात दिग्गज इच्छुकांचा हिरमोड
g कल्याण-डेंबिवलीत 46 प्रभाग राखीव
g मीरा-भाईंदरमध्ये कही खुशी कही गम
g उल्हासनगरात ‘एससी’चे प्रतिनिधित्व वाढले
g भिवंडीत 45 प्रभागांत महिलाराज
g नवी मुंबईत ओबीसी नगरसेवक घटणार
g वसईत अनुसूचित जमातीचे पाच नगरसेवक
20 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवा
आरक्षणानंतर आता 14 नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध होईल. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आरक्षण प्रारूपावर हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी निवडणूक प्रभागाशी संबंधित कार्यालयाचा पत्ता आणि इतर तपशील बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCGE2025 या लिंकवर उपलब्ध आहे. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
फटका
तेजस्विनी घोसाळकर, आशीष चेंबुरकर, सुरेश पाटील, दत्ता नरवणकर, यशवंत जाधव, नील सोमय्या, स्नेहल आंबेकर, विशाखा राऊत, सुजाता पाटेकर, सदानंद परब, रवी राजा, स्वप्नील टेंबवलकर, उकेंद्र सावंत, मंगेश सातमकर, अनिल पाटणकर, सुफियान वणू, मकरंद नार्वेकर.
सुटका
किशोरी पेडणेकर, उज्ज्वला मोडक, अनिल कोकीळ, शीतल म्हात्रे, सचिन पडवळ, संजय घाडी, सुहास वाडकर, राजूल पटेल, मेहर हैदर मोहसीन, अलका केरकर, प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे, राखी जाधव, गीता गवळी, हेमांगी वरळीकर, आकाश पुरोहित, सहिदा खान, अमेय घोले.
इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत आज इच्छुकांसह कार्यकर्त्यांमध्ये आशा, उत्सुकता, मिळालेली संधी आणि जोरदार जल्लोष, तर कधी संधी हुकल्याने निराशा असा खेळ दिसून आला. मात्र गेल्या तब्बल साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने आता इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी खऱ्या अर्थाने उमेदवारांच्या कामाला सुरुवात झाली आहे.
नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर पालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. आज आरक्षण जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच बालगंधर्व रंगमंदिर परिसरात इच्छुक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 11 वाजता आरक्षणाची लॉटरी सुरू झाली. आरक्षण जाहीर होताना जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
तगडा बंदोबस्त
दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही हाय अलर्ट आहे. मात्र पालिका आरक्षणाचा नियोजित कार्यक्रम असल्याने मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. बालगंधर्व रंगमंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी आणि तपासणी करण्यात येत होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List